आलियाच्या गुड न्यूजवरुन कंडोम कंपनीने केली अनोख...

आलियाच्या गुड न्यूजवरुन कंडोम कंपनीने केली अनोखी जाहिरातबाजी तर उत्तराखंड पोलीसांनी पण घेतली मजा (Condom Brand’s Funny Post For Alia Bhatt-Ranbir Kapoor’s Pregnancy News Goes Viral, Also Uttarakhand Police Tweet Will Leave You In Splits)

अभिनेत्री आलिया आणि रणबीरच्या लग्नामुळे त्यांच्या चाहत्यांना खूप आनंद झाला होता. त्यांच्या लग्नाला 2 महिने पूर्ण होताच या सेलिब्रेटी कपलने त्यांच्या चाहत्यांना आणखी एक आनंदाची बातमी देऊन सगळ्यांना खुश केले आहे. अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या इन्स्टाग्रामवर हॉस्पिटलमधला एक फोटो शेअर करत ती आई होणार असल्याची गोड बातमी तिच्या चाहत्यांना दिली. या फोटोत आलिया हॉस्पिटलमध्ये बेडवर झोपली आहे आणि रणबीर तिच्या शेजारी बसला आहे. ते दोघेही  अल्ट्रासाउंड मशीनकडे बघत आहे. त्या मशीनच्या मॉनिटरवर ह्रदयाचा इमोजी देण्यात आला आहे. या फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये आलियाने, ‘’आमचे बाळ…..लवकरच येत आहे’’, असे लिहिले आहे. आलियाची ही पोस्ट अवघ्या काही मिनिटांतच तुफान व्हायरल झाली. आणि मग नातेवाईक, मित्रमंडळी, चाहते यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला.

काही कंपन्यांनी देखील आलिया रणबीरला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यातीलच कंडोम ड्यूरेक्स ब्रॅण्ड हे त्यांच्या वेगवेगळ्या जाहिरातींसाठी प्रसिद्ध आहे. यावेळी या ब्रॅण्डने रणबीर आलियाला शुभेच्छा देत त्यांचे मार्केटिंग करण्यासाठी अनोखी जाहिरातबाजी केली आहे. त्यांच्या मार्केटिंगची पद्धत इतकी मजेशीर होती की ती पोस्ट लगेच व्हायरल झाली.

कंडोम ड्यूरेक्स ब्रॅण्डने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक पोस्ट शेअर केली त्यात “महफिल मे तेरी, हम तो क्लियरली नहीं थे” असे म्हणत रणबीर आलियाला शुभेच्छा दिले आहे. ही ओळ म्हणजे रणबीरच्या ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटातील एका गाण्याची ओळ आहे. त्या गाण्याच्या ओळीत थोडा बदल करुन हे अनोखे मार्केटिंग करण्यात आले आहे.

तर दुसरीकडे उत्तराखंड पोलिसांनी सुरुक्षित वाहतुकीच्या जागरुकतेसाठी मजेशीर पद्धतीने एक ट्विट केले. त्यात त्यांनी “कार हळू चालवा नाहीतर तुम्ही रणबीर आलिया व्हाल ” असे म्हटले आहे. उत्तराखंड पोलिसांचे हे ट्विट लोकांना खूप आवडले असून ते खूप व्हायरल होत आहे. त्यावर वेगवेगळ्या प्रकराच्या मीम्स सुद्धा बनत आहेत.

रणबीर आलियाचे चाहते एकीकडे खूप खूश आहेत तर दुसरीकडे लग्नाला अडीच महिने झाल्यावर लगेच त्यांच्याकडून इतक्या लवकर गुड न्यूज मिळेल असे कधीच वाटले नसल्याने त्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.