जिओ स्टुडिओजची पहिली विनोदी वेब सिरीज ‘एका काळे...

जिओ स्टुडिओजची पहिली विनोदी वेब सिरीज ‘एका काळेचे मणी’ येणार : प्रशांत दामले प्रमुख भूमिकेत (Comedy Web Series Of Crazy Middle Class Family Ready For Release : Prashant Damle To Play Lead Role)

जिओ स्टुडिओजने मराठी डिजिटल विश्वात ‘एका काळेचे मणी’ ही एक धमाल वेबसिरीज आणली आहे. एका चित्र-विचित्र फॅमिलीची आगळीवेगळी कहाणी, कधी कधी वाटतात थोडी क्रेझी पण सगळीचं आहेत मात्र फूल टू शहाणी! यात एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबाची हटके, विनोदी कथा आणि पात्र आपल्याला भेटणार आहेत.

ज्येष्ठ दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनी या मालिकेची निर्मिती केली असून या वेबसिरीजचे दिग्दर्शन अतुल केतकर यांनी केले आहे. या मालिकेची संकल्पना ऋषी मनोहर याची असून ओम भूतकर याने याचे लिखाण केले आहे.

या मालिकेचे मुख्य आकर्षण म्हणजे मराठी नाटकक्षेत्राचे सुपरस्टार प्रशांत दामले मुख्य भूमिकेत असणार आहेत.

त्यांच्याबरोबर हृता दुर्गुळे, वंदना गुप्ते, पौर्णिमा मनोहर, ऋषी मनोहर, रुतुराज शिंदे इत्यादी प्रतिभावान कलाकारांचा समावेश आहे. आणि यातील अजून एक मुख्य आकर्षण म्हणजे सध्याचे कॉमेडीस्टार समीर चौगुले आणि विशाखा सुभेदार देखील यात सहभागी असणार आहेत.

निर्माते महेश मांजरेकर म्हणतात, “मला आनंद आहे की आम्ही ‘एका काळेचे मणी’ या वेबसिरीजची निर्मिती केली आहे. प्रत्येक पालकांची इच्छा असते की त्यांच्या मुलांनी त्यांच्यासारखे मोठे व्हावे आणि आपल्या जीवनाची दिशा ठरवावी. पण या मालिकेत इथेच खरी गंमत सुरु होते. कारण सध्याच्या जनरेशनच्या आवडीनिवडी या भन्नाट, वेगळ्या असतात आणि त्यामुळेच आपल्या दैनंदिन आयुष्यात एक विरोधाभास आणि धमाल निर्माण होते. आणि हीच जुन्या विरूद्ध नव्या विचारांची गंमत जंमत या मालिकेत आपल्याला दिसणार आहे”.