चाहत्यांची प्रार्थना फळाला आली, तब्बल 15 दिवसां...

चाहत्यांची प्रार्थना फळाला आली, तब्बल 15 दिवसांनी राजू श्रीवास्तव यांना आली शुद्ध (Comedian Gains Consciousness After Fifteen Days At AIIMS (New Delhi))

लोकप्रिय कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत नुकतीच एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. अखेर चाहत्यांच्या प्रार्थनांना यश आले आहे. 15 दिवसांपासून दिल्लीच्या एम्स रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असलेल्या राजू श्रीवास्तव यांना अखेर शुद्ध आली आहे. चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना १० ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार 58 वर्षीय लोकप्रिय कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना जिममध्ये वर्कआउट करताना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर लगेचच त्यांना ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स), नवी दिल्ली येथे भरती करण्यात आले.

राजू यांचे कुटुंबीय आणि चाहते 15 दिवसांपासून जीवन आणि मृत्यूच्या कचाट्यात सापडलेल्या राजू यांना लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना करत होते. अखेर सर्वांच्या प्रार्थनेला यश मिळाले आणि राजू यांना पुन्हा शुद्ध आली. एम्सच्या डॉक्टरांची टीम  सतत त्यांची देखरेख करत आहेत. एवढेच नाही तर हळूहळू त्यांची प्रकृती सुधारत आहे. राजू श्रीवास्तव यांच्या पर्सनल सेक्रेटरीने एएनआय या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली.

राजू श्रीवास्तव यांचे मित्र अन्नू अवस्थी यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी कॅप्शन लिहिले की, राजू भैया शुद्धीवर आले आहेत, तुमच्या प्रार्थना कामी आल्या आहेत. अन्नू अवस्थी यांनी असेही सांगितले की, शुद्धीवर आल्यानंतर राजू श्रीवास्तव यांनी त्यांच्या कुटुंबीयांशीही चर्चा केली.