फुलांचा बहर आणि नशिबाचा कहर (Colourful Flowers ...

फुलांचा बहर आणि नशिबाचा कहर (Colourful Flowers Can Bring Good Fortune To You)

फुलांची साथ आपल्याला जागोजागी लागते. घराचे अंगण, गच्ची, बाल्कनी आणि घरातील फुलदाण्यांमध्ये डंवरलेली फुले पाहून मन प्रसन्न होते. मोठाली उद्याने, बागबगिचे येथील फुलांचे ताटवे पाहून मन प्रफुल्लित होते. फुलांचा गंध मनाला ताजेतवाने ठेवतो, धुंद करतो. पण हिच फुले आपले भाग्य बदलू शकतात. कसे ते पाहा! अर्थात् हे अर्थ काढले आहेत, काही वास्तू तज्ज्ञांनी!

सुखशांती आणि समृद्धीसाठी
जे लोक सर्जनशील क्षेत्राशी संबंधित आहेत- जसे की, लेखक, मार्केटिंग प्रोफेशनल्स्, कला निर्मिती – अशा लोकांनी आपल्या कामाच्या टेबलावर पांढर्‍या फुलांना जागा द्यावी. अर्थात् टेबलाच्या पश्चिम दिशेला छानशी पांढरी फुले ठेवावीत. क्रिएटिव्हीटी वाढेल. नवनव्या कल्पना सुचतील.
तुमचं मन चंचल असेल. सैरभैर होत असेल तर, जांभळ्या रंगाची ऑर्किडची फुले घरात ठेवा. घरातील दिवाणखान्यात, देवघरात अथवा ऑफिसातील टेबलावर या जांभळ्या फुलांना स्थान द्या. तुमचं मन स्थिर राहील. घरात शांती नांदेल. घरातील माणसे समजुतदारपणे वागतील.
घराच्या मुख्य दरवाजाजवळ किंवा दिवाणखान्यात लिलीच्या पांढर्‍या फुलांना ठेवा. लिलीच्या या फुलांनी घरातील वातावरण चांगले राहील. घरात सुखशांती नांदेल.
आपल्या घरात सुखशांती आणि समृद्धी राहावी, असं वाटत असेल तर घरात नेहमी उमलणारी फुले ठेवावीत. त्यामुळे छोटी बोन्सायची अथवा मिनी झाडेझुडपे ठेवू नयेत. या खुज्या झाडांनी व त्यावर येणार्‍या फुलांनी विकासाची गती थांबते.
आपण फुले विकत आणतो. किंवा आपल्याला कोणी पुष्पगुच्छ भेट देतो. ते आपण आनंदाने घरात सजवून ठेवतो. ती फुले 2-3 दिवस टिकतात. मात्र ती कोमेजली तरी आपण काढून टाकण्याचा आळस करतो. अशा कोमेजलेल्या फुलांना त्वरित घराबाहेर काढावे. कारण अशा फुलांनी घरात नकारात्मकता येते.
गुलाबांची फुले आपल्याला आवडतात. त्यांचा रंग व गंध मोहक असतो. पण ही गुलाबांची फुले फ्लॉवरपॉटमध्ये सजवण्याआधी त्याच्या दांडीवरील काटे काढून टाका. कारण हे काटे घरातील सकारात्मक ऊर्जा शोषून घेतात. त्यामुळे विकासाचा मार्ग खुंटतो.
बेडरुमचे वातावरण रोमॅन्टिक राखण्यासाठी काही लोकांना तिथे फुलांची सजावट करायला आवडते. पण बेडरुममध्ये खरी फुले ठेवू नयेत. कारण आपली बेडरुम जास्त करून बंद असते. त्यामुळे ते लवकर कोमेजतात. अन् त्यातून ऑक्सिजन निघत नाही. असे दुषित वातावरण आरोग्याला योग्य नसते. त्यामुळे बेडरुममध्ये गुलाबी रंगाची आर्टिफिशियल फुले ठेवावीत.

करिअर जोपासण्यासाठी
जे लोक आपल्या करिअर बाबत सदैव जागरूक असतात, त्यांनी आपल्या डेस्कवर नरगिस आणि पिवळ्या डॅफोडिल्सची फुले ठेवावीत. अभ्यास करणार्‍या मुलांच्या डेस्कवर देखील आग्नेय दिशेला ही फुले ठेवावीत. त्यामुळे त्यांची एकाग्रता वाढेल. अन् उत्साह राहील. यामुळे करिअरमध्ये प्रगती होईल. वकील, ब्युटिशियन, उंची कपड्यांचे दुकानदार, फॅशन डिझायनिंगशी संबंधित जे लोक असतात, त्यांनी आपल्या टेबलावर दक्षिण दिशेला लाल रंगाची फुले ठेवावीत. त्यांचे करिअर बहरेल.