सलमान खानच्या ‘दबंग’ चित्रपटाची ॲनिमेटेड सीरिज ...

सलमान खानच्या ‘दबंग’ चित्रपटाची ॲनिमेटेड सीरिज प्रदर्शित; चुलबुल पांडे दिसणार कार्टून अवतारात (Chulbul Pandey Will be Seen in Cartoon Avatar, Salman Khan Film Dabangg Animated Series is Released)

सलमान खानच्या ‘दबंग’ या चित्रपटाने लोकांचं भरपूर मनोरंजन केलं. या चित्रपटातील सलमानची, इन्स्पेक्टर चुलबुल पांडेची भूमिकाही खूप गाजली. या चित्रपटामध्ये लव्ह, इमोशन, ड्रामा, ॲक्शन आणि जबरदस्त गाणी पाहावयास मिळाली होती. आता लहान मुलांच्या मनोरंजनासाठी हाच चित्रपट ॲनिमेटेड करण्यात आला असून यात चुलबुल पांडे कार्टुन अवतारात दिसणार आहे.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

‘दबंग’ चित्रपटातील सलमान खानच्या चुलबुल पांडेने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. या चित्रपटाची ॲनिमेटेड सिरिज लवकरच प्रदर्शित होणार असल्याची घोषणा स्वतः सलमान खान यांनी अलिकडेच केली होती. त्यावेळेस सलमान खानने ट्वीट करत लिहिले होते की – ”मुलांवरून लक्षात आलं… स्वागत नाही करणार आमचं. डिज्नी प्लस एचएस व्हीआयपी वर चुलबुल पांडे लँड होत आहेत… तिच ॲक्शन… तिच मस्ती. पण नवीन अवतारात… आता आमचं स्वागत करा.”

या चित्रपटाची ॲनिमेटेड सिरिज बनविण्यासाठीचे सारे हक्क ॲनिमेटेड स्टुडिओ कॉसमॉस – माया यांना देण्यात आले आहेत. या सिरिजमध्ये चुलबुल पांडे व्यतिरिक्त सोनाक्षी सिन्हाची रज्जो आणि सोनू सूदचा छेदी सिंह देखील कार्टुन अवतारात दाखवण्यात आले आहेत. दबंग चित्रपटाचे फ्रंचायची निर्माता अरबाज खान यांनी दबंग हा मनोरंजनात्मक चित्रपट असल्यामुळे त्यास ॲनिमेटेड वर्जनमध्ये प्रदर्शित करण्याची परवानगी दिली असल्याचे सांगितले आहे.

‘दबंग’ची ॲनिमेटेड सिरिज डिज्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपी वर प्रदर्शित झाली असून आज ३१ मे पासून दररोज १२ वाजता कार्टून नेटवर्कवर देखील पाहता येणार आहे. या सिरिजच्या प्रोमोमध्ये कार्टुन अवतारातील चुलबुल पांडे मुलांसोबत खेळताना, नाचताना – गाताना आणि व्हिलनची धुलाई करताना दाखवला आहे.

सलमान खानच्या अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘राधे: योर मोस्ट वांटेड भाई’ या चित्रपटावर बरीच टीका झाली. सोशल मीडियावर देखील विनोदी मीम्सचा मारा झाला. दरम्यान सलमान खान यांचे पिता सलीम खान यांनी एका मुलाखतीमध्ये ‘राधे’ हा ‘बजरंगी भाईजान’ व ‘दबंग ३’ च्या तुलनेत फारसा चांगला चित्रपट झाला नसल्याचे कबुल केले.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

सलमानच्या आगामी चित्रपटांबद्दल सांगायचं तर तो ‘टाइगर 3’ मध्ये कतरीना कैफ आणि इमरान हाशमी सोबत काम करत आहे. याशिवाय जॅकलिन फर्नांडिस सोबत ‘किक 2’ आणि ‘कभी ईद कभी दिवाली’ मध्ये पूजा हेगडेसोबत दिसणार आहे.