कोरियोग्राफर गणेश आचार्य यांच्या विरोधात गुन्हा...

कोरियोग्राफर गणेश आचार्य यांच्या विरोधात गुन्हा दाखल, लैंगिक छळ, विनयभंग असे अनेक आरोप (Choreographer Ganesh Acharya charged with stalking, harassment, voyeurism, Chargesheet Filed Against Choreographer)

‘पुष्पा’ चित्रपटातील ‘ओ अंतवा’ या गाण्यावर धमाकेदार डान्स बसवून सगळ्यांना आपल्या तालावर नाचायला लावणारा बॉलिवूडचा प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य सध्या अडचणीत सापडला आहे. एका महिला कोरिओग्राफरने त्याच्यावर लैंगिक छळ, पाठलाग, विनयभंग आणि पाळत ठेवणे यांसारखे अनेक आरोप केले आहेत.

हे प्रकरण २०२० सालचे आहे, जेव्हा एका महिलेने गणेश आचार्य यांच्यावर अनेक आरोप करत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी आता कोरिओग्राफरवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या महिला कोरिओग्राफरने तक्रारीत म्हटले होते की, गणेश ऑफिसमध्ये काम करत असताना तिच्यावर घाणेरड्या कमेंट करत असे आणि तिला अश्लील व्हिडिओ पाहण्यास सांगत. महिला कोरिओग्राफरचे म्हणणे आहे की, जेव्हा तिने त्यांना विरोध केला तेव्हापासून त्याने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन कोरिओग्राफर असोसिएशनने तिचे सदस्यत्वही रद्द केले होते. या महिलेच्या तक्रारीनंतर आता गणेश आचार्य यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

इतकंच नाही तर या ३५ वर्षीय महिला कोरिओग्राफरने एका मिटींगमध्ये गणेश आचार्य यांना विरोध केला होता आणि त्यामुळे तिला मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आली होती, असाही आरोप तिने केला होता. यानंतर तिने पोलिसात तक्रार करण्याचा निर्णय घेतला मात्र पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिल्याने तिने वकिलाची मदत घेऊन गुन्हा दाखल केला.

गणेश आचार्य आणि त्यांच्या सहाय्यकाविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४-ए (लैंगिक छळ), ३५४-सी (एकटक पाहणे), ३५४-डी (पाठलाग करणे), ५०९ (कोणत्याही महिलेच्या प्रतिष्ठेचा अपमान करणे), ३२३(दुखापत करणे), कलम ५०४ (शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान), ५०६ (गुन्हेगारी धमकी) आणि ३४ (गुन्हा करण्याचा सर्वसाधारण हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मात्र सध्या गणेश आचार्य यांनी याप्रकरणी कोणतही विधान केलं नसून काहीही बोलण्यास नकार दिला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढच होताना दिसत आहे. आता तर त्यांच्या अनेक सहकर्मचाऱ्यांनी देखील गणेश आचार्य यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. मात्र गणेशने हे सर्व आरोप खोटे आणि बिनबुडाचे असल्याचे म्हटले होते.