‘विनोद हे वंगणाचे काम करते’ –...

‘विनोद हे वंगणाचे काम करते’ – मुख्यमंत्र्यांकडून हास्यजत्राच्या टिमचे कौतुक (Chief Minister Praises Comedy Show ‘Maharashtrachi Hasyajatra’)

‘विनोद’ हा रोजच्या जगण्यातील निराशा दूर करून जीवनात सकारात्मकता निर्माण करतो. सध्या कोविड महामारीमुळे लोकांच्या मनात जगण्याविषयीची निराशा दाटली असताना अगदी योग्य वेळी ही निराशा दूर करण्याचे काम ‘हास्यजत्रा’ची टिम करत आहे, असे बोलत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या ‘माझा पुरस्कार’ च्या विजेत्या ‘हास्यजत्रा’ टीमचे कौतुक केले.

”तुम्ही मंडळी कोणते काम करता, त्याचे परिणाम काय होतात, हे महत्वाचे ठरते. संकटाचा काळ संपून गेल्यावर, मागे वळून पाहताना त्या कामाचे महत्व कळते. आता कोविडच्या संकटात दुसरी लाट ओसरतेय. तिसरी लाट येईल याची भिती आहे. दररोजच आम्ही त्याचा विचार करतो. निर्बंध कुणालाच आवडत नाही. पण निर्बंध, नियमावली यामुळे आणि आजारानंतर अनेकांना निराशा ग्रासते. त्यावेळी विनोदाचे महत्व पटते. यंत्राने आवाज करू नये. ते व्यवस्थित चालावे म्हणून वंगण घालतो. त्याचप्रमाणे आपल्या रोजच्या जगण्यात विनोद हे वंगणाचे काम करते. विनोद निर्मितीचे मोठे काम विनोदी लेखक, कलाकार करतात. सातत्याने हसविणे हे कठीण काम असते. नवनवीन सुचत राहणे अवघड असते. पण हे मोठे काम हास्य जत्राची टीम करते आहे. चांगले काम करणारे कलावंत आणि मनोरंजन क्षेत्राला नेहमीच पाठबळ दिले जाईल,” असेही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.

ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या ‘माझा पुरस्कार’साठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील कलाकारांची निवड करण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण वर्षा निवासस्थानी करण्यात आले. यावेळी पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, सिध्दीविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विजेत्यांचे कौतुक देखील केले. कलाकारांनी भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.