खाण्याची तल्लफ भागवा पण गल्लत करू नका (Change Y...

खाण्याची तल्लफ भागवा पण गल्लत करू नका (Change Your Eating Habits To Remain Healthy)


तल्लफ येते म्हणून जिभेचे चोचले पुरवण्यासाठी तुम्ही वारंवार आरोग्याला अपायकारक पदार्थ खात असाल, तर त्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळू शकतं. तेव्हा तुम्हाला आपली ही सवय लवकरात लवकर बदलायला हवी. त्यासाठी या काही टिप्स-
कधी कुणाशी बोलताना एखाद्या पदार्थाचा उल्लेख होतो, कधी मॉनिटर-लॅपटॉप-मोबाईलच्या स्क्रीनवर एखादा पदार्थ नजरेस पडतो किंवा कधी तर बसल्या बसल्या अचानक जिभेवर एखाद्या पदार्थाची चव तरळते आणि जोपर्यंत तो पदार्थ खरंच जिभेवर पोहोचत नाही, तोपर्यंत मन कासावीस होऊ लागतं. एखादा पदार्थ खाण्याची इच्छा… नाही तल्लफ म्हणा किंवा जिभेचे चोचले… हे असं प्रत्येकालाच होतं. ही तल्लफ इतकी तीव्र असते की, तिला दडपणं जवळजवळ अशक्यच असतं.
खरं तर, ही तल्लफ म्हणजे काय असतं, तर मीठ किंवा साखर खाण्याची इच्छा. हे सामान्य आहे. कारण ही इच्छा म्हणजे शरीराचे संकेत असतात की, शरीरात यांची कमतरता झाली आहे, तेव्हा शरीरात हा घटक पुन्हा रिचार्ज करायला हवा. ठीक. पण तो घटक कशा प्रकारे शरीरात जायला हवा, हे ठरवणं महत्त्वाचं असतं. नेमकं इथेच आपण गल्लत करतो. जिभेच्या नखर्‍यांना बळी पडून चुकीचे निर्णय घेतो. आपण काय करतो, तर साखरेचे संकेत आले की, जे एखादी फळाची फोड खाऊनही भागू शकतं, त्यासाठी संपूर्ण चॉकलेट, मिठाई किंवा आइस्क्रीम खातो. मिठाचे संकेत आले की, शेंगदाणे-सुकामेवा यांना बगल देत, वेफर्सवर ताव मारतो. अर्थात, शरीराच्या महत्त्वाच्या संकेतांसाठी आपण चुकीचे पर्याय निवडतो आणि आरोग्याचं नुकसान करून घेतो.

पर्याय निवडा योग्य


अशा प्रकारे तल्लफ येते म्हणून जिभेचे चोचले पुरवण्यासाठी तुम्ही वारंवार आरोग्याला अपायकारक पदार्थ खात असाल, तर त्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळू शकतं. तेव्हा तुम्हाला आपली ही सवय लवकरात लवकर बदलायला हवी. त्यासाठी आपण खाताना स्वास्थ्याचा विचार न करता शरीरास बाधक पदार्थ खातोय, जे चुकीचं आहे, हे सर्वप्रथम स्वतःशीच मान्य करायला हवं. एकदा का आपली निवड चुकतेय हे मान्य केलं की, आपसूकच योग्य पर्यायाची निवड करण्याकडे कल जाईल. आणि आपली तल्लफ आरोग्याचा विचार करून कशी भागवायची यासाठी आरोग्यदायी निवड केली जाईल. त्यासाठी या काही टिप्स-
साध्य होऊ शकतील, अशीच ध्येयं समोर ठेवा. आणि पहिल्याच खेपेस नाही जमलं, तरी हरकत नाही. प्रयत्न करत राहा. हार मानू नका.
आपल्या आहाराच्या सवयी चुकीच्या आहेत, म्हणून एकदम सर्व काही बदलण्याचा अट्टहास धरू नका. हळुवार सुरुवात करा. एकावेळी एका पदार्थावर लक्ष केंद्रित करा. आता मिष्टान्न तुमचा विक पॉइंट असेल, तर त्यातही कोणत्या पदार्थापुढे तुमचं काहीच चालत नाही, ते शोधा. म्हणजे, चॉकलेट, आइस्क्रीम… असं काय आहे, जे खाण्याची तुम्हाला वारंवार इच्छा होते? त्या पदार्थापासून बदलाला सुरुवात करा.
आहाराचं पूर्वनियोजन करा. दुपार-रात्रीचं जेवण, मधल्या वेळेतला नाश्ता, असं दिवसभरात आपण काय पौष्टिक खाणार आहोत, हे आगाऊच नक्की केलं आणि त्याप्रमाणे पदार्थ हाताशी ठेवले, तर लक्ष विचलित होणार नाही. भूक लागल्यावर ङ्गकाहीहीफ पोटात जाणार नाही. आपल्याला गोड आवडतं, तर गोड खाण्याची इच्छा झाल्यास, कोणता गोड पौष्टिक पदार्थ आपण खाऊ शकतो, याची यादी तयार करा. फळं, पौष्टिक लाडू असं बरंच काही या यादीत स्थान मिळवू शकतं. चॉकलेट खायला आवडत असेल, तर डार्क चॉकलेटचा पर्याय निवडता येईल. मात्र जे काही खाल, ते अत्यल्प प्रमाणात खा.
पहिला पदार्थ सर झाला की, आहारातून असाच एखादा आरोग्याला अपायकारक ठरणारा दुसरा पदार्थ वर्ज्य करण्यास सुरुवात करा. थोड्या थोड्या काळाने अशा प्रकारे एकेक अपायकारक पदार्थ आहारातून वजा करण्यास आणि पौष्टिक पदार्थाचा आहारात समावेश करण्यास सुरुवात करा.
बरेच जण ताण आला की खातात. तुम्ही असं मुळीच करू नका. सर्वप्रथम स्वतःवरील ताण कमी करा. आणि दुसरं म्हणजे, ताण आला की, तो घालवण्यासाठी आणखी काय करता येईल, त्याचे आरोग्यदायी मार्ग शोधा. ताण कमी करण्याचे बरेच आरोग्यदायी मार्ग आहेत. जसं- दीर्घ श्‍वसन, ध्यानधारणा, एखादा फेरफटका, संगीत ऐकणं, नाचणं, एखाद्या छंदात गुंतणं, मित्र-मैत्रिणी किंवा कुटुंबीयांशी मनमोकळ्या गप्पा मारणं इत्यादी. तेव्हा पुढच्या वेळी स्ट्रेस आलाय म्हणून काहीतरी खाण्यापूर्वी यापैकी एखादा पर्याय अवलंबून पाहा.
निरोगी राहण्यासाठी दररोज नियमितपणे योग्य प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे, हे तर तुम्हाला माहीत असेलच. परंतु, पाणी पिण्याचा आणखी एक फायदा म्हणजे, त्यामुळे पोट भरलेलं राहतं आणि भूक कमी लागते. शक्य असेल तर जवळ कायम एखादी भरलेली पाण्याची बाटली ठेवा. दिवसभरात थोड्या थोड्या वेळाने त्यातील थोडं थोडं पाणी पीत राहा.
आहारात प्रथिनांचं प्रमाण वाढवा. त्यासाठी पनीर, अंड्यातील पांढरा बलक, शेंगदाणे, सुकामेवा, चीज इत्यादी प्रथिनांनी युक्त पदार्थांचा आहारात आवर्जून समावेश करा. भूक लागल्यावर यातील काहीतरी हाताशी पटकन मिळेल, असं पाहा.
तुम्हाला मोहात पाडणारे पदार्थ जिथे मिळू शकतील, अशा ठिकाणापासून दूर राहा. किराणा मालाचं दुकान, केक शॉप, बेकरी, हॉटेल असा जिथे कुठे आपला जिभेवरील ताबा सुटण्याची भीती असेल, तिथे जाणं टाळा. आपल्या स्वयंपाकघरातही अशा पदार्थांना थारा देऊ नका. म्हणजे पदार्थ समोर दिसलेच नाहीत, तर अर्धा गड सर होईल.
जास्त वेळ उपाशी राहू नका. तसंच बराच वेळ काही खाल्लं नसेल, तर अरबट-चरबट पदार्थ सहज मिळतील अशा ठिकाणी जाऊ नका. उपाशी पोटी घराबाहेर पडणं टाळा. कारण अशा बिकट वेळी हाताला मिळेल ते, तोंडात जाण्याचा धोका जास्त असतो. तसंच हॉटेलात किंवा मित्रमैत्रिणींसोबत फिरायला जात असाल, तर आरोग्यदायी पदार्थ खाण्यावर भर द्या. आणखी एक करता येईल, अशा वेळीही घरातून बाहेर पडण्यापूर्वी काहीतरी पौष्टिक खा, म्हणजे भरल्या पोटी तुम्ही घराबाहेर काहीही जास्त खाणार नाही.


पुरेशी झोप होत नसेल, तर आपला मेंदू नीट काम करत नाही. दिवसभर ताजंतवानं वाटत नाही. आळस राहतो. आणि अशा वेळी काहीतरी गोड किंवा खारट खाण्याची तीव्र इच्छा होण्याची शक्यता अधिक असते. कारण अशा पदार्थांमुळे थोड्या वेळासाठी का होईना, तरतरी आल्यासारखं वाटतं. तेव्हा झोपेशी तडजोड करू नकाच. मात्र कधी तरी काही कारणामुळे पुरेशी
झोप मिळाली नाहीच, तर तरतरी येण्यासाठी गोड किंवा खारट पदार्थांचा आधार घेण्यापेक्षा प्रथिनांनी युक्त पदार्थ खा. प्रथिनांमुळेही शरीराला ऊर्जा मिळते आणि महत्त्वाचं म्हणजे, ही ऊर्जा अधिक काळ टिकून राहते.
कधी तरी तल्लफ आली आहे म्हणून, थोडी पेस्ट्री, वेफर्स खाण्यास हरकत नाही. अर्थात, त्याचं प्रमाण अत्यल्पच असायला हवं. मात्र अशी तल्लफ रोजच येत असेल आणि त्यास बळी पडून आपण रोजच आरोग्यास अपाय करणारे पदार्थ खात असू, तर ते नक्कीच धोकादायक आहे. कारण अशा आहाराच्या सवयी मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब इत्यादींपासून अगदी कर्करोगापर्यंत विविध आजारांना आमंत्रण देऊ शकतात. तेव्हा वेळीच सावध झालेलं बरं.
निरोगी राहण्यासाठी, आरोग्यदायी जीवनशैली मनःपूर्वक स्वीकारा. आपल्या आवडीचा एखादा पदार्थ आरोग्यासाठी कशा प्रकारे चांगला नाही, हे जाणून घ्या. म्हणजे, तो खाण्याची तीव्र इच्छा होणार नाही. तसंच आहारात कोणत्या पोषणमूल्यांची आवश्यकता आहे, ती पोषणमूल्यं कोणत्या घटकांपासून मिळतील आणि त्या घटकांपासून कोणते स्वादिष्ट पदार्थ बनवता येतील, हे जाणून घ्या. अर्थात, पौष्टिक म्हणजे बेचव हे समीकरण मनातून पूर्णतः काढून टाका. मनाचं ऐकून एखादा आरोग्यास अपायकारक पदार्थ खाल्ल्यावर शरीराचं नुकसान होऊ शकतं हे जसं खरं आहे, तसंच मन मारून खाल्लेल्या पौष्टिक पदार्थाचा फायदा होणार नाही, हेही खरं आहे. तेव्हा जे काही कराल, त्यासाठी स्वतःला सर्वप्रथम मनापासून तयार करा, म्हणजे जीभ बंड करणार नाही.