कॅन्सरच्या या १८ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष...

कॅन्सरच्या या १८ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष… (Cancer symptoms – 18 warning signs you should never ignore)

कॅन्सर म्हणजे मृत्यू हा समज आता मागे पडलेला आहे. कारण योग्य वेळी निदर्शनास आलेलं कॅन्सरचं निदान उपचाराने कॅन्सरला पूर्णपणे बरे करते. परंतु दुर्भाग्याने बहुतांशी लोक कॅन्सरच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. एकतर आपल्याला कॅन्सर झाला आहे, यावर त्यांचा विश्वास नसतो वा ते विश्वास ठेवू इच्छित नाहीत. आपल्याला हा आजार होऊच शकत नाही असा त्यांचा समज असतो. कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं भ्रामक असू शकतात, तरीही त्यांकडे लक्ष देणे गरजेचेच आहे. नाहीतर पुढे जीवावर बेतू शकते. पाहुया कॅन्सरची सुरुवातीची ही लक्षणं कोणती असतात?

स्तनांमध्ये बदल
जगात ब्रेस्ट कॅन्सर हा सामान्य कॅन्सर प्रकार आहे. स्त्री-पुरुष दोहोंनाही हा आजार होऊ शकतो. स्तनांमध्ये गाठ येणे, निपलचा रंग बदलणे, निपलमध्ये खाज येणे, रॅशेस, निपल आतल्या बाजूस वळणे ही ब्रेस्ट कॅन्सरची सुरुवातीला दिसून येणारी लक्षणं असली तरी यामुळे ब्रेस्ट कॅन्सर झालाच आहे हे शंभर टक्के खात्रीने सांगता येत नाही. काही वेळा हार्मोन्समध्ये बदल झाल्यामुळे वा शरीराच्या इतर समस्यांमुळेही अशाप्रकारची लक्षणं दिसून येतात. तेव्हा डॉक्टरांकडे जाऊन नीट तपासून यासंबंधीची शहानिशा करून घेणं गरजेचं आहे.

मल – मूत्रासह रक्त पडणं
मल वा लघवीसोबत जर रक्त पडत असेल तर लागलीच हॉस्पिटलमध्ये जाऊन तपासणी करा. कारण किडनी किंवा लघवीच्या पिशवीचा कॅन्सर होण्याचे हे लक्षण असू शकतं. या व्यतिरिक्त पचनासंबंधी वा शौचासंबंधीच्या सवयींमध्ये बदल होणं. जसे – खूप दिवसांची बद्धकोष्ठता, डायरिया वा जुलाब होणे ही कोलोन कॅन्सरची लक्षणं आहेत. तेव्हा डॉक्टरांना भेट देऊन तपासणी करून घ्या.

अचानक वजन घटणं
कोणत्याही प्रयत्नाशिवाय जर वजन अधिक प्रमाणात घटत असेल तर ही आनंदाची बाब नसून चिंतेची बाब आहे. अर्थात याला वेगळी कारणं असू शकतील पण पॅनक्रियाटिक, फुप्फुसाच्या वा पोटाच्या कॅन्सरची संभावनाही पूर्णतः नाकारता येत नाही.

तोंडात चट्टे येणे
सर्वसाधारणपणे तोंड आल्यास दोनेक आठवड्यात ते बरे होतात. परंतु जर ते बरे होण्यास जास्त दिवस लागले तर काळजी घ्यावयास हवी. या व्यतिरिक्त आवाजात बदल, गिळताना त्रास होणे, तोंडात लाल वा सफेद रंगाचे चट्टे पडणे ही सर्व तोंडाच्या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं असू शकतात.

ताप
अधिक काळ बरा न होणारा ताप ब्लड कॅन्सरचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं. तसं पाहता सर्वच कॅन्सर पिडितांना इम्युनिटी सिस्टीम कमजोर झाल्यामुळे ताप येतोच. म्हणूनच लवकरात लवकर डॉक्टरांना भेटून याची खोल तपासणी करून घ्या.

खोकला
एक महिन्यापेक्षा अधिक काळ खोकला, खोकल्यासोबतच रक्त पडणे, श्वास घेण्यास त्रास इत्यादी कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं आहेत. हा त्रास पुन्हा पुन्हा होऊ लागला तर डॉक्टरांकडे जाण्याची गरज आहे.

दुखणे
दुखणी अनेक कारणांनी होऊ शकतात, परंतु कोणत्याही कारणाशिवाय एक महिना वा त्यापेक्षा अधिक काळ जर दुखणं लांबलं तर ते हाडांच्या किंवा ब्रेनच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं. अशा दुखण्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांकडे जाऊन त्याचं कारण विचारलं पाहिजे. तसेच वारंवार होणारी डोकेदुखी ब्रेन ट्युमरचं लक्षण असू शकतं. तर कोलोन, रेक्टम किंवा गर्भाशयाचा कॅन्सर असेल तर पाठदुखीचा त्रास होतो. फुप्फुसाचा कॅन्सर झालेले रुग्ण छातीत दुखत असल्याची तक्रार करतात. कॅन्सर होऊन तो वाढत असताना सर्वसाधारणपणे अशाप्रकारची दुखणी सुरू होतात. म्हणूनच कोणतही दुखणं साधं समजू नका.

थकवा
दिवसभराच्या धावपळीनंतर, तणावानंतर शरीरास थकवा येणं ही सामान्य गोष्ट आहे. परंतु, काहीही काम न करता, तसेच व्यवस्थित खाणंपिणं झालं असतानाही बरेच दिवस जर थकवा जाणवत असेल तर ते ब्लड कॅन्सरचे लक्षण समजावे. या व्यतिरिक्त कोलोन वा पोटाचा कॅन्सर झाल्यानंतरही रक्ताची कमतरता दिसून येते. त्यामुळे थकवा येतो. थकवा येत असेल तर रोजचंच आहे असे म्हणून दुर्लक्ष करू नका. तर डॉक्टरांकडे जाऊन त्याबाबत खात्री करून घ्या.

रक्तस्त्राव
मासिक पाळी व्यतिरिक्त जर अचानक ब्लीडिंग होऊ लागलं तर कार्विनल कॅन्सरचा संशय येऊ शकतो. याशिवाय रेक्टम म्हणजे मलद्वारातून रक्तस्त्राव होणे हे कोलोन कॅन्सरचे लक्षण असू शकते. अशा प्रकारचा कोणताही त्रास झाल्यास मनात कोणताही संशय न बाळगता डॉक्टरांशी बोला. मासिक पाळी दरम्यानही सामान्य पातळीपेक्षा अधिक रक्तस्त्राव वा पोटदुखी होणं ही सामान्य लक्षणं नव्हेत. त्यावर उपचार केलेच पाहिजे.

पोट फुगणे
पोटफुगी ही सामान्य समस्या आहे. विशेषतः महिलांना अपचन, प्रीमेन्सुरल सिंड्रोम व प्रेग्नंसी यामुळे या त्रासाला सामोरे जावे लागते. पण पोट फुगण्याची ही समस्या दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ राहिली आणि सोबत ब्लीडिंग व वेटलॉसही झाला तर चिंतेचे कारण आहे, असे समजावे. ही लक्षणं गर्भाशयाच्या कॅन्सरची आहेत.

अंडकोषामध्ये बदल
पुरुषांच्या अंडकोषात म्हणजे टेस्टिकल्समध्ये गाठ, सूज, दुखणे वा इतर काही बदल दिसले तर लगेच डॉक्टरांकडे जावे. कारण टेस्टिकुलर कॅन्सर अतिशय वेगाने पसरतो. डॉक्टरांचं तर असं म्हणणं आहे की, १५ ते ५५ वर्षापर्यंतच्या पुरुषांनी १-२ महिन्यांमध्ये याची तपासणी करून घेतली पाहिजे.

युरिन पास होण्यासंबंधीची समस्या
वय वाढते तसे प्रोस्टेट ग्रंथी वाढतात आणि लघवीसंबंधीच्या समस्या उद्‌भवू लागतात. जसे – वारंवार लघवीस होणे. अशी समस्या निर्माण झाल्यास ती प्रोस्टेट कॅन्सरची सुरुवात असण्याची शक्यता असते. तरीही डॉक्टरांना भेट देऊन त्यांच्याशी बोलून त्यामागील कारणं जाणून घेतली पाहिजेत.

गिळताना घशाला त्रास होणे
कधी कधी घसा सुकतो वा घशाला सूज येते त्यामुळे जेवण वा पाणी गिळताना त्रास होतो. खरं तर इंफेक्शनमुळे घशाला असा त्रास होणे ही सामान्य बाब आहे. परंतु घसा वा तोंडाचा कॅन्सर होण्याचंही हे कारण असू शकतं. म्हणूनच जेवताना वा पाणी पिताना खूप दिवसानंतरही त्रास होत असेल तर चांगल्या डॉक्टरांना दाखविले पाहिजे.

चामखीळ वा तीळामध्ये बदल
त्वचेवरील तीळ, चामखीळ इत्यादीच्या रंग आणि आकारामध्ये अचानक बदल झाला तर ते स्किन कॅन्सरचं लक्षण आहे. त्याचबरोबर त्वचा पिवळी पडणे, खाज येणे किंवा अचानक केस वाढणे, त्वचा लाल होणे ही देखील कॅन्सरची लक्षणे आहेत. तेव्हा त्वचेमध्ये साधारणपणे कोणताही बदल दिसून आला की पहिलं डॉक्टरांकडे जायचे. कारण योग्य वेळी उपचार केले तर त्वचेचा कॅन्सर पूर्णपणे बरा होतो.

भूक न लागणे
हे गर्भाशयाच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते. काही न खाता-पिता बराच वेळ राहिल्यानंतरही जर आपल्याला भूक लागत नसेल तसेच काही न खाताही पोट भरलेले जाणवत असेल तर हे गर्भाशयाच्या कॅन्सरचं लक्षण समजा.

नखांत बदल होणे
नखांमध्ये अचानक दिसून येणारा बदल विभिन्न प्रकारच्या कॅन्सरची सूचना असू शकते. नखांवर काळी वा ग्रे रेष वा टिंब येणे स्किन कॅन्सर दर्शवितो तर सफेद वा पिवळी नखं फुप्फुसाच्या कॅन्सरची लक्षणं असू शकतात.

चेहरा सुजणे
फुप्फुसाच्या कॅन्सरने पिडित रुग्णाचा चेहरा सुजतो वा चेहऱ्यास लाल रंगाचे चट्टे येतात. असं होण्याचं कारण म्हणजे लंग ट्युमरचे छोटे सेल्स छातीच्या रक्त वाहिन्यांना ब्लॉक करतात. ज्यामुळे चेहऱ्यापासून डोक्यापर्यंतच्या रक्तप्रवाहामध्ये अडथळे येतात.

तोंडामध्ये सफेद डाग किंवा जीभेवर सफेद डाग येणे
तोंडामध्ये वा जिभेवर सफेद डाग दिसल्यास हे तोंडाच्या कॅन्सरचे लक्षण समजावे. धुम्रपान वा तंबाखू सेवन करणाऱ्यां व्यक्तींना तोंडाचा कॅन्सर होण्याचा धोका अधिक असतो. तेव्हा तोंडामध्ये कोणताही बदल दिसल्यास् लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा.
वर पाहिलेल्या लक्षणांव्यतिरिक्त तुमच्या शरीरामध्ये इतर काही असामान्य बदल जाणवले आणि ते बराच काळापर्यंत तसेच राहिले तर डॉक्टरांकडून तपासून घ्या. कॅन्सर नसला तरी जी काही समस्या आहे त्याचे कारण सांगून डॉक्टर त्यावर उपचार चालू करतील.