गर्भाशयाच्या क्षयरोगामुळे वंध्यत्त्व येते का? (...

गर्भाशयाच्या क्षयरोगामुळे वंध्यत्त्व येते का? (Can The Tuberculosis Of Uterus May Cause Infertility?)

माझी भाची 26 वर्षांची आहे. तिच्या लग्नाला 3 वर्षे झाली. अजून मूल नाही म्हणून तपासण्या केल्या. त्यात गर्भाशयाच्या क्षयरोगाचे निदान झाले. क्षयरोगामुळे वंध्यत्त्व येते का?
संजना, सातारा
शरीरामधील कोठल्याही अवयवाला क्षयरोग होऊ शकतो. गर्भाशयाच्या क्षयरोगामध्ये मुख्यत्त्वे गर्भाशयाच्या आतील आवरण खराब होते. त्यामुळे गर्भधारणा होऊ शकत नाही. गर्भाशयाबरोबर गर्भनलिका, बीजांडे, गर्भाशयाचे मुख यांनाही क्षयरोगाची लागण होऊ शकते. त्यामुळे गर्भनलिका बंद होणे, बीजांडातील स्त्रीबीजांची संख्या कमी होणे, गर्भाशयाच्या आजूबाजूला पडदे (अधेजन) निर्माण होणे, या सर्व समस्यांमुळे वंध्यत्त्व येऊ शकते.

क्षयरोगामुळे आलेल्या वंध्यत्त्वावर काही उपचार आहेत का?
ममता, रत्नागिरी

क्षयरोगाची औषधे नियमित पूर्ण कालावधीसाठी घेणे आवश्यक असते. त्यानंतर गर्भधारणा होत नसल्यास टेस्ट ट्यूब बेबी पद्धतीने प्रयत्न करावे लागतात.

माझ्या मैत्रिणीला गर्भारपणामध्ये क्षयरोग झाला. तिला चिंता आहे की गर्भातील बाळाला जन्मजात क्षयरोग होऊ शकतो का?
भारती, विरार

गर्भारपणामध्ये स्त्रीला क्षयरोग झाला तर क्वचित प्रसंगी गर्भातील बाळाला जन्मजात क्षयरोग होऊ शकतो. तो लवकर ओळखून उपचार करणे गरजेचे असते. नाहीतर बाळ दगावण्याचा संभव असतो.

आमच्या ओळखीत एका दाम्पत्याला वंध्यत्त्व आहे. त्यातील यजमानांना क्षयरोग झाला होता. त्यांना काय उपचारपद्धती घेता येईल?
नयना, नाशिक

यजमानांनी क्षयरोगाचे उपचार पूर्ण व्यवस्थित घ्यावेत. त्यानंतर त्यांच्या वीर्याची तपासणी करून उपचार ठरविता येतील. यामध्ये कधीकधी वृषणामधून शुक्रजंतू मिळवावे लागतात व टेस्ट ट्यूब बेबीच्या तंत्रज्ञानाने गर्भधारणेचा प्रयत्न करावा लागतो.