मेंदीने केसांना डार्क ब्राउन रंग येईल का? (Can ...

मेंदीने केसांना डार्क ब्राउन रंग येईल का? (Can Mehendi Turn Hair To Dark Brown Colour?)

माझे जवळजवळ 70 टक्के केस पांढरे झाले आहेत. त्यामुळे केसांना रंगवण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. मात्र बाजारात मिळणारे हेअर कलर मला आवडत नाहीत. आपली देशी मेंदीच बरी असं वाटतं. परंतु, यातही एक समस्या आहे. एकदा मी स्वतः घरात मेंदी तयार करून लावली होती. त्यामुळे केस चांगले झाले, मात्र केसांना लालसर केशरी रंग आला. मला माझ्या केसांना डार्क ब्राउन किंवा मरुन रंग हवा आहे. घरच्या घरी मेंदीचा वापर करून ते करणं शक्य आहे का? कृपया मार्गदर्शन करा.

  • नमिता, गोवा
    मेंदीचा वापर करून केसांना डार्क ब्राउन किंवा मरुन रंग करणं नक्कीच शक्य आहे. केसांना डार्क ब्राउन रंग येण्यासाठी साधारण तीन कप पाण्यात 2 चमचे कॉफी पावडर घालून उकळवा. कॉफी चांगली उकळवली की, आच बंद करून मिश्रण पूर्णतः थंड होऊ द्या. या कॉफीच्या पाण्यात 2 चमचे आवळा पावडर, 1 चमचा मंडूर पावडर, 1 चमचा शिकेकाई पावडर, 1 चमचा ब्राह्मी पावडर आणि 1 चमचा जास्वंदी पावडर घालून चांगलं एकजीव करा. शेवटी त्यात मेंदी पावडर घालून दाटसर एकजीव मिश्रण तयार करा. रवीचा वापर करून मिश्रण चांगलं घुसळल्यास, व्यवस्थित एकजीव होतं आणि रंगही चांगला येतो. हे मिश्रण लोखंडी कढईत चार ते पाच तासांकरिता भिजत ठेवा. मेंदीला मरुन रंग हवा असल्यास, कॉफी पावडरऐवजी बिटाच्या रसाचा वापर करा.

माझे डोळे मोठे आणि घारे आहेत. त्यात त्वचा रंग गोरा आहे. गोर्‍या रंगामुळे डोळ्यांना काजळ जरी लावलं तरी, मोठे डोळे अधिकच मोठे दिसतात. त्यामुळे डोळ्यांचा मेकअप कसा करू काही कळतच नाही.

  • राधा, सोलापूर
    राधा, गोरी कांती आणि घारे डोळे हे कॉम्बिनेशन खरंच छान आहे, मात्र त्यासोबत काळ्या रंगापेक्षा तपकिरी अर्थात, ब्राउन रंग नक्कीच शोभून दिसतो. त्यामुळे काजळ लावण्यापेक्षा, ब्राउन रंगाच्या आयपेन्सिलची अगदी बारीक रेघ डोळ्यांच्या आतील कडेवर लाव. सोबत पापण्यांवर ब्राउन रंगाचं आयलायनर मध्यम जाड लाव. हल्ली आयलायनर नानाविध प्रकारे लावलं जातं. अशा विविध प्रकारे तू स्वतःही आपल्या डोळ्यावर आयलायनर लावून पाहा. म्हणजे त्यातील तुझ्या डोळ्यांवर कोणतं शोभून दिसतं, हे तुझ्या लक्षात येईल.