हृदयविकार असणाऱ्यांनी, गर्भवती महिलांनी व्हॅक्स...

हृदयविकार असणाऱ्यांनी, गर्भवती महिलांनी व्हॅक्सिन घेणे योग्य आहे का? (Can Heart Disease Patients And Pregnant Woman Take The Covid Vaccine?)

व्हॅक्सिनचे डोस देण्याची प्रक्रिया देशभर सुरू आहे. त्याच्यात अपुरा पुरवठा असल्याने बाधा येत आहे. त्याचप्रमाणे लसीकरणाविषयी अफवांचा महापूर आलेला दिसून येत आहे. लस घेतल्यानंतर ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, अथवा जे मानसिकरित्या दुर्बल आहेत. त्यांना ताप येणे, अशक्तपणा येणे अशा प्रतिक्रिया दिसून येत आहेत. हे सर्व नैसर्गिक आहे, असं डॉक्टर्सनी निक्षून सांगितलं तरी काही लोक लसीकरणाच्या विरुद्ध प्रचार करत आहेत. सर्वसाधारण लोकांना गोंधळात पाडत आहेत. मुळातच ज्या काही लोकांना हृदयविकार आहे, त्यापैकी अत्यंत अल्प प्रमाणात लोकांचे रक्त साकळण्याचे प्रकार घडत आहेत. पण त्यामुळे सरसकट लसीकरण वाईट आहे, असं समजता कामा नये. त्यातूनच हृदयविकार असलेल्या पेशंटनी लस टोचून घ्यावी की नाही, याबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्याचप्रमाणे ज्या लोकांना छातीत दाटून येण्याच्या किंवा फुप्फुसाची क्षमता कमी असल्याचा विकार आहे, त्यांनी लस घ्यावी की नाही, यावरही काही जण खल करताना आढळतात.

या शंकांचे निरसन तज्ज्ञ मंडळींनी, याला लसीकरण जबाबदार असल्याचा संशय खोडून काढला आहे. रक्त गोठण्याच्या प्रतिक्रिया काही लोकांमध्ये दिसून आल्या तरी त्याचे प्रमाण अल्प आहे. त्यामुळे या गोष्टीची धास्ती न बाळगता हृदयविकार असणाऱ्यांनी व फुप्फुसाचा जुनाट विकार असणाऱ्यांनी देखील लसीकरण करणे गरजेचे आहे, असं या तज्ज्ञ डॉक्टर्सनी ठामपणे सांगितलं आहे. ब्रिटन, अमेरिका आणि इस्राएल या देशांमधील माहिती गोळा केली असता, असं लक्षात आलं आहे की, करोना विषाणू विरोधक लस घेतल्याने त्याची बाधा होण्याचे प्रमाण बरेच कमी झाले आहे.

गर्भार स्त्रियांनी किंवा बाळंत झालेल्या स्तनपान देणाऱ्या मातांनी देखील लस घ्यावी की नाही, यावर विनाकारण चर्चा करून लोक प्रश्न उपस्थित करत आहेत. याबाबत अधिकृत माहिती किंवा अशा अवस्थेतील स्त्रियांवर प्रयोग करण्याची जोखीम घेतली नसल्याने त्याची माहिती उपलब्ध नाही. सबब इच्छुक मातांनी किंवा बाळंतिणींनी ही लस घेऊ नये, असे वैद्यकीय क्षेत्रातील लोकांचे स्पष्ट मत आहे. कारण अशा स्त्रियांनी लस घेणे सुरक्षित आहे, असे खात्रीलायक सांगता येणार नाही.