आर्यनच्या अटकेनंतर शाहरुख खान करत असलेल्या बायज...
आर्यनच्या अटकेनंतर शाहरुख खान करत असलेल्या बायजू’सच्या जाहिरातींवर बंदी… (Byju’s Pulls Down Shah Rukh Khan’s Ads After Aryan Khan’s Arrest)

मुंबई क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणात अडकलेला आर्यन खान सध्या १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणानंतर, किंग खान तणावात आहेच, शिवाय त्याला त्याच्या व्यावसायिक जीवनातही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शाहरुख खान सेलिब्रिटी म्हणून अनेक ब्रँडला प्रोत्साहन देतो, पण ड्रग प्रकरणात मुलगा आर्यनच्या नावामुळे त्याच्या ब्रँड अॅम्बेसेडर पदावरही परिणाम होत आहे. कदाचित याच कारणामुळे BYJU’S (बायजू’स) ने शाहरुखच्या सर्व जाहिरातींवर बंदी घातली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून शाहरुख खान लर्निंग अॅप ‘बायजू’स चा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. बायजू’स ची जाहिरात करण्यासाठी शाहरुखला दरवर्षी ३-४ कोटी रुपये दिले जातात. परंतु क्रूझ ड्रग्स प्रकरणात आर्यन खानचे नाव आल्यापासून शाहरुख खानसह, बायजू’सला देखील लोक सोशल मीडियावर सतत ट्रोल करत आहेत. ‘शाहरुखला आपला ब्रँड अॅम्बेसेडर बनवून कंपनी काय संदेश देऊ इच्छित आहे,’ असे म्हणत ट्रोलर्स कंपनीचे नाव मध्ये आणत आहेत. ‘सर्व कलाकार त्यांच्या मुलांना हेच शिकवतात का?’ असंही विचारलं जात आहे. एका ट्विटर युजरने लिहिले, ‘रेव्ह पार्टी कशी करावी? बायजू’सच्या ऑनलाईन वर्गात जोडला गेलेला नवा अभ्यासक्रम.’ ‘एवढेच नाही तर शाहरुख आणि बायजू’स यांच्याबद्दल अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामुळे सोशल मीडियावर कंपनीची प्रतिमा खराब होत होती. त्यामुळे कंपनीने शाहरुखच्या सर्व जाहिरातींवर काही काळासाठी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

शाहरुख खान सेलिब्रिटी म्हणून अनेक ब्रॅण्डला प्रोत्साहन देतो आणि त्याच्या सहभागामुळे ब्रँडला खूप फायदाही होतो. बायजू’सच्या व्यतिरिक्त, त्याने ह्युंदाई, एलजी, दुबई टुरिझम, आयसीआयसीआय आणि रिलायन्स जिओ कंपन्यांसह ४० ब्रॅण्ड्सचे समर्थन केले आहे. ब्रँड व्हॅल्यूच्या बाबतीत शाहरुख चौथ्या क्रमांकावर आहे आणि मालमत्तेच्या बाबतीत तो भारतातील अव्वल अभिनेता आहे. परंतु असे म्हटले जात आहे की, ड्रग्स प्रकरणात मुलगा आर्यन खानच्या अटकेमुळे शाहरुख खानचे मोठे नुकसान होऊ शकते. कारण सोशल मीडियावर लोक शाहरुखला तसेच तो जाहिरात करत असलेल्या ब्रॅण्डला सतत ट्रोल करत आहेत.

शुक्रवारी जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आर्यनला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या तो मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये आहे. आर्यनला आता सोमवारपर्यंत तुरुंगात राहावे लागेल. शनिवार आणि रविवारी सत्र न्यायालय बंद असल्याने जामीन अर्ज देखील दाखल करता येत नाही.