बॉलिवूडच्या किंग खानला बुर्ज खलिफावरून वाढदिवसा...

बॉलिवूडच्या किंग खानला बुर्ज खलिफावरून वाढदिवसाच्या शुभेच्छा (Burj Khalifa Has The Most Iconic Wish For Shah Rukh Khan On His Birthday)

दुबई हे अनेक सेलिब्रिटींसाठी, विशेषतः शाहरुख खानसाठी नेहमीच आवडते हॉटस्पॉट राहिले आहे. जगातील सर्वात उंच बिल्डिंग असलेल्या दुबईतील बुर्ज खलिफावर किंग खानचा 57 वा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. काल 2 नोव्हेंबर रोजी जग त्याचा खास दिवस साजरा करत असताना, बुर्ज खलिफाची  इमारत ‘हॅपी बर्थ डे पठाण’ प्रदर्शित करताना रोषणाईने पूर्णपणे उजळून निघाली होती.


बुर्ज खलिफाच्या अधिकृत ट्विटर हँडलने याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये  दुबईच्या प्रतिष्ठित इमारतीवर ‘हॅपी बर्थ डे शाहरूख खान. हॅपी बर्थ डे पठान. वुई लव्ह यू.’ असे लिहिले होते अन्‌ यासोबतच, व्हिडिओमध्ये बॉलिवूडच्या बादशाहच्या फोटोसह त्याच्या सर्वात हिट गाण्यांपैकी एक ‘तुझे देखा तो’हे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगेचे संगीत ऐकावयास मिळते. आपल्या लाडक्या अभिनेत्याला अशाप्रकारे वाढदिवसाच्या शुभेच्छा देत चाहत्यांनी त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, मन्नत येथे त्याची एक झलक पाहण्यासाठी सुपरस्टारच्या चाहत्यांनीही फलक लावले होते. चाहत्यांनी मध्यरात्री अभिनेत्याच्या  निवासस्थानी भेट देऊन त्याला शुभेच्छा दिल्या. तर दुसरीकडे, चाहत्यांना रिर्टन गिफ्ट म्हणून, शाहरूखच्या आगामी चित्रपटाचा, पठाणचा टीझर रिलीज केला गेला. या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित, हा एक अॅक्शन एंटरटेनर आहे ज्यामध्ये शाहरुख खान एका गुप्तहेराच्या भूमिकेत आहे आणि 25 जानेवारी 2023 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.