बॉलिवूड कलाकार नाश्त्यामध्ये काय खातात? (Breakf...

बॉलिवूड कलाकार नाश्त्यामध्ये काय खातात? (Breakfast Menu Of Bollywood Stars)

बॉलिवूडमधील कलाकारांच्या फिटनेसचा त्यांच्या चाहत्यांवर इतका प्रभाव असतो की, हे कलाकार एवढे फिट कसे राहतात, हे जाणून घेण्यास ते उत्सुक असतात. आपले आवडते कलाकार काय खातात आणि एवढी ऊर्जा कुठून आणतात, याचं त्यांना कौतुक वाटतं. म्हणूनच आज आपण तुमच्या आवडत्या कलाकारांच्या फिटनेसचे रहस्य, अर्थात हे कलाकार नाश्त्यामध्ये काय खातात ते जाणून घेणार आहोत.

करीना कपूर खान

शुटिंगचं टाइट शेड्यूल असो वा गर्भारपणाचं निमित्त, करीनाने कधीही आपल्या आरोग्याबाबत तडजोड केली नाही. ब्रेकफास्ट कधीही चुकवायचा नाही, असं तिचं स्पष्ट मत आहे. करीना नेहमी हेल्दी नाश्ता करते. तिच्या दिवसाची सुरुवात एक कप कॉफी आणि एका केळ्याने होते. त्यानंतर घरी बनवलेला तुपाचा पराठा – दही किंवा पोहे, उपमा खाणे ती पसंत करते.

रणबीर कपूर

बॉलिवूडचा हँडसम हंक रणबीर कपूर स्वतःच्या डाएटची विशेष काळजी घेतो. रणबीर हेल्दी आणि भरपेट नाश्ता खातो, ज्यात बदाम, ब्राऊन ब्रेड, प्रोटीन शेक आणि तीन अंडी यांचा समावेश असतो.

दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण दाक्षिणात्य असल्याने नाश्त्यामध्येही तिला दाक्षिणात्य पदार्थ खाण्यास आवडतात. सकाळी नाश्त्यामध्ये ती उपमा, डोसा, इडली किंवा पोहे खाते. या व्यतिरिक्त व्हाइट एग वा आमलेट देखील तिच्या नाश्त्यामध्ये असतं.

हृतिक रोशन

हृतिक रोशनच्या फिटनेसचे करोडो दिवाने आहेत. हेवी वर्कआऊटसोबतच हृतिक आपल्या डाएटचीही काळजी घेतो. त्याच्या नाश्त्यामध्ये ४-५ एग व्हाइट, २ बाऊन ब्रेड आणि ताज्या फळांचा समावेश असतो.

प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्राने बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत मजल मारली असली तरी तिच्या खाण्या-पिण्याच्या सवयी मात्र त्याच आहेत. आजही प्रियंकाला भारतीय पदार्थ अन्‌ तेही घरी बनवलेले खायला आवडतात. सकाळी नाश्त्यामध्ये ती चपाती – भाजी नाही तर भरपूर लोणी लावून पराठा खाणे पसंत करते. संपूर्ण दिवस काम करण्यासाठी ऊर्जा हवी असेल तर हेवी नाश्ता करणे आवश्यक आहे असे ती म्हणते.

अक्षय कुमार

हेल्दी लाइफस्टाइल आणि डाएटमुळे अक्षय कुमार बॉलिवूडमधील सगळ्यांत फिट अभिनेता म्हणून ओळखला जातो. अक्षय कुमारला घरी बनवलेले पदार्थ खायला आवडतात. सकाळच्या नाश्त्यामध्ये तो पराठा आवडीने खातो. सोबत दूध प्यायला विसरत नाही.

आलिया भट्ट

आलिया भट्टचा नाश्ता अँटीऑक्सीडंट युक्त पदार्थ आणि मौसमी फळांनी युक्त असतो. बेरी, पपई यांसारखी फळं ती खाते. दिवसाची सुरुवात ती हर्बल टी किंवा बिन साखरेच्या कॉफीने करते. त्यानंतर ती पोहे वा एग सँडविच खाते.

शिल्पा शेट्टी

फिटनेस आयकॉन शिल्पा शेट्टीच्या परिपूर्ण शरीरयष्टीचं रहस्य सांगायचं तर, ती स्वतःच्या आहाराची विशेष काळजी घेते. तिचा नाश्ता अतिशय हेल्दी आणि पोषणमुल्यांनी भरलेला असतो. सकाळी ती बदामाचं दूध, केळं, ओट्‌स आणि मध यांपासून बनवलेली स्मुदी पिते. याशिवाय सफरचंद, ब्लू बेरी आणि मधासोबत गुळ खाते. यानंतर सकाळी १० ते साडे दहाच्या दरम्यान ती एव्हाकोडो, होल व्हिट टोस्ट सोबत बटर खाणे पसंत करते.

टायगर श्रॉफ

टाइगर श्रॉफची परफेक्ट बॉडी आणि स्टंट्‌सने लोकांना वेडे केले आहे. टायगर फिट असण्याचे कारण तो त्याच्या डाएटची व्यवस्थित काळजी घेतो. तुम्हाला खरं वाटणार नाही पण टायगर पूर्णपणे शाकाहारी आहे. त्याच्या नाश्त्याबाबत सांगायचं म्हणजे तो सकाळी ८-१० एग व्हाइट आणि एक बाऊल ओट्‌स खातो.

मलायका अरोरा

वयाच्या ४७व्या वर्षी देखील मलायकाच्या हॉट फिगर आणि फिटनेसकडे पाहिलं की हैराण व्हायला होतं. मलायकाच्या फिटनेसचं रहस्य म्हणजे नियमित योग – एक्सरसाईज आणि संतुलित आहार आहे. मध आणि लिंबू रस घातलेले एक ग्लास कोमट पाणी पित मलायकाची सकाळ होते. नाश्त्यामध्ये तिला एक वाटी मिक्स फळं, इडली, उपमा, पोहे वा एग व्हाइट तसेच मल्टीग्रेन टोस्टही खायला आवडतात. याशिवाय मलायका व्हेजिटेबल ज्यूस आणि स्मूदी देखील पिते