विजेशी खेळणारी वाघीण (Brave Wire Girl)

विजेशी खेळणारी वाघीण (Brave Wire Girl)

मराठवाड्यातील बीड जिल्हा. त्यातील आष्टी तालुक्यातील एका गावी राजेंद्र जैन नावाचे गृहस्थ
राहतात. काही कारणांनी त्यांच्या घरातील वीज बिलाची थकबाकी राहिली होती. त्यांनी बिल न
भरल्याने महावितरण (महाराष्ट्र राज्य वीज महामंडळाचा विभाग) महामंडळाचा एक तंत्रज्ञ त्यांचा
वीज पुरवठा बंद करण्यासाठी आला. त्याला बघून त्यांची बायको धावतच घरात आली. अन्
म्हणाली, “अहो लवकर बाहेर या. आपले इलेक्ट्रिक कनेक्शन तोडण्यासाठी चक्क एक महिला
विजेच्या खांबावर चढली आहे…”
जैन बाहेर आले, अन् त्यांना दिसले की, खरोखरीच एक बाई त्यांची वीज लाइन बंद करण्यासाठी
खांबावर चढली आहे, अन् वायर कापण्याचे काम करते आहे. जैन हे पत्रकार आहेत. त्यांनी तिला
अटकाव न करता आपला कॅमेरा आणला व तिचे फोटो काढले. सर्वसाधारण माणसाप्रमाणे
तिच्याशी हुज्जत न घालता, अथवा कोणतीही तक्रार न करता, त्यांनी ती खाली आल्यावर तिची
मुलाखत घेतली आणि स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध केली. अन् या धाडसी महिलेची अविश्वसनीय
कर्तबगारी प्रकाशझोतात आली…


तिचं नाव उषा जगदाळे
आष्टी तालुक्यातील महावितरण संस्थेत हे धाडसी काम करणारी तंत्रज्ञ, खांबावर चढून थकबाकी
असलेल्या ग्राहकांचे कनेक्शन तोडण्याचे कठोर कर्तव्य करण्याबरोबरच, तुटलेल्या वा जळलेल्या
तारा जोडून गावे प्रकाशमान करण्याचे सत्कृत्य करणारी कर्तव्यदक्ष कर्मचारी.
वीज पुरवठा करणाऱ्या खांबांच्या तारांमधून वीजप्रवाह खेळता असतो. त्यांना हात घालण्याचं
धाडस करणं, ही खरं पाहता पुरुषांची मक्तेदारी. ती मोडून उषा जगदाळे या धाडसी, निडर
तरुणीनं इतिहास घडवला आहे. पदरी पडलेलं काम अजिबात न घाबरता धैर्याने पार पाडलं
पाहिजे, याची शिकवण तिने करिअर सन्मुख तरुणींना दिली आहे.

पदरी कसं पडलं?
पण हे काम पदरी कसं पडलं, याची पार्श्वभूमी रोचक आणि प्रेरक आहे. उषाचा जन्म शेतकरी
कुटुंबात झाला. तिचे वडील भाऊसाहेब जगदाळे खेडेगावात राहणारे. दुष्काळी भागात त्यांची
जमीन. तीन एकराच्या या जमिनीत ते कोरडवाहू शेती करून प्रपंच चालवायचे. घरात पत्नी, २
मुली व १ मुलगा आणि आई. असं मोठं कुटुंब चालवताना त्यांची ओढाताण व्हायची. अशा
परिस्थितीत उषाचं शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं. शाळेत तिला खेळाची आवड लागली.
मैदानी खेळात ती जास्त रमू लागली. तिचं हे कसब पाहता शिक्षकांनी तिला चांगलेच प्रोत्साहन
दिले. पुढील शिक्षणात ती खेळात खूपच पटाईत झाली. उषाच्या अंगी साहस, धैर्य, चिकाटी आणि
खिलाडू वृत्ती पुरेपूर होती. त्याच्या जोरावर तिने खो-खो मध्ये प्रावीण्य मिळविले. घरच्या परिस्थितीमुळे तिला जास्त शिक्षण घेता आले नाही, परंतु खेळाने भरपूर काही मिळविले.
आत्तापर्यंत उषाने ११ सुवर्ण पदके मिळविली आहेत. हिमाचल प्रदेश, पंजाब, पतियाला, जालंदर,
इंदूर, हैदराबाद येथील राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमधून तिने ही मानाची पदके मिळविली आहेत.
महाराष्ट्र राज्याची ती कर्णधार देखील होती.


खेळाने साथ दिली
भारत सूर्यभान केरुळकर या तरुणाशी उषाचे लग्न झाले. तेही पिढीजात शेतकरी आहेत. त्यांचा
दुधाचा व्यवसाय आहे. त्यात उषाने त्यांची साथ दिली. ती जुळ्या मुलांची आई आहे. सुखाचा
संसार चालला असतानाच २०१३ साली तिला क्रीडा कोट्यातून महावितरण महामंडळात तंत्रज्ञाची
नोकरी मिळाली. खेळामधील प्रावीण्याच्या जोरावर मिळालेल्या या नोकरीत जोखीम असल्याची
जाणीव तिला पुढे झाली. पण अंगी धाडस, चपळाई असल्याने तिने निडरपणे ती अंगावर घेतली.
ट्रेनिंगमधून परतल्यावर उषाने फिल्ड वर्क करायला सुरुवात केली अन् वीजेची लाइन टाकणे,
त्यासाठी खांबावर चढणे, जनरेटर दुरुस्त करणे, अशी अवघड कामे फक्त ६ महिन्यात शिकून
घेतली.

सन्मान व प्रमोशन
आता खारीच्या चपळाईने ती सरसर खांबावर चढते अन् आपली कामगिरी फत्ते करते. आष्टी
तालुक्यातील कडा या गावी तिची नियुक्ती झाली आहे. ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडित होणं
ही नित्याची बाब आहे. एकीकडे कोरोनाचं महासंकट तर दुसरीकडे कडक उन्हाळा. उन्हाळ्यात
बीडचे तापमान ४२ डिग्री असते. त्यामुळे वीजेशिवाय मिनिटभरही राहू शकत नाही, अशी लोकांची
अवस्था असते. पण तो वीज पुरवठा सुरळीत राहावा म्हणून कर्मचारी काम करतात.
त्यांच्यासोबत उषा न डगमगता उन्हात राबत होती. विशेष म्हणजे या दिवसात एकही दिवस
सुट्टी न घेता उषा आपले कर्तव्य करीत राहिली. तिची कर्तबगारी पाहून महावितरणाची वाघीण,
दामिनी, बिजली गर्ल, वायर वूमन, हिरकणी अशी बिरुदं तिला मिळाली आहेत. ‘लोकमत सखी
मंच’ आणि ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ असे सन्मान तिला लाभले आहेत. तर महावितरणाच्या
मुख्य अभियंत्याच्या हस्ते तिला प्रजासत्ताक दिनी सन्मानित करण्यात आले आहे. शिवाय आता
तिला वरिष्ठ तंत्रज्ज्ञ म्हणून प्रमोशन देण्यात आले आहे. यू ट्यूबवर तिचे हे व्हिडिओ व्हायरल
आहेत, त्यामध्ये चपळाईने खांबावर चढणे-उतरणे अचंबित करणारे आहे.