बॉलिवूडच्या ‘ड्रीम गर्ल’ हे...

बॉलिवूडच्या ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनी यांनी करोना रूग्णांसाठी पुरवले ऑक्सिजन मशीन्स (Bollywood’s ‘Dream Girl’ Hema Malini provides oxygen machines to corona patients)

अलिकडे करोना संबंधित बातम्यांमध्ये आपण रोज पाहतोय की, करोनाशी लढत असताना देशातील आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत असून बेड, ऑक्सिजन सिलेंडर्स आणि औषधे यांसारख्या आवश्यक गोष्टींचा तुटवडा जाणवत आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या प्रचंड रुग्णसंख्येला ऑक्सिजन पुरवणे हे मोठं आव्हान निर्माण झालं असून, ऑक्सिजनअभावी रोज अनेक रुग्ण मरण पावत आहेत. अशा परिस्थितीत अनेक बॉलिवूड अभिनेते पुढे आले, अनेक उद्योगपती, राजकारण्यांनी पुढे येऊन सरकारला जमेल तेवढी मदत केली. बॉलिवूडच्या ‘ड्रीम गर्ल’ आणि भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांनीही करोनाबाधितांसाठी मदतीचा हात पुढे केलाय.

अभिनेत्री हेमा मालिनी या मथुरामधल्या भाजपच्या खासदार आहेत. तेथील करोनाबाधितांसाठी हेमा मालिनी यांनी ७ ऑक्सिजन मशीन्स पुरवल्या असून, ही माहिती हेमा मालिनी यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. सोबतच याचे फोटोज देखील त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केलेत.

हे फोटोज शेअर करताना अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांनी एक कॅप्शन देखील लिहिली आहे. यात त्यांनी लिहिलंय, “ब्रजवासियांची सेवा करण्यासाठी मथुरा जिल्ह्यात ७ ऑक्सिजन मशीन्स बसवताना पाहून धन्यता वाटत आहे. पुढील काही दिवसांत आणखी ऑक्सिजन मशीन्स आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. सोबत ६० ऑक्सिजन बेड्स देखील उपलब्ध होणार आहेत.”

हेमा मालिनी यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. त्यांच्या चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी त्यांच्या या ट्विटला लाइक आणि कमेंट्स करत, त्यांनी केलेल्या मदतीबाबत त्यांचं भरभरून कौतूक केलं आहे. विदेशातून डॉक्टरकीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सध्या करोना रूग्णांवर उपचारासाठी मथुरेत बोलवण्यात आलं असल्याचं देखील हेमा मालिनी यांनी सांगितलं आहे.