अमिताभ बच्चन यांच्यावर या कारणामुळे रागवतात जया...

अमिताभ बच्चन यांच्यावर या कारणामुळे रागवतात जया बच्चन (Bollywood’s Angry Woman Jaya Bachchan loses her temper on Amitabh Bachchan too, Big B himself reveals about funny situation)

अमिताभ बच्चन आपला शो कौन बनेगा करोडपती 14 मध्ये स्पर्धकांसोबत गेम खेळत असताना त्यांच्याशी खूप गप्पा मारतात. अनेकदा ते तिथे आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही अनेक गोष्टींचा खुलासा करतात. यावेळी त्यांनी जया बच्चन यांच्याशी संबंधित एक मजेदार खुलासा केला. केबीसीच्या नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये बिग बींनी ते आपल्या पत्नीला म्हणजेच जया बच्चनला किती घाबरतात ते सांगितले.

बी-टाऊनमध्ये जया बच्चन रागीट स्वभावाच्या म्हणून ओळखल्या जातात. त्या कधी चाहत्यांच्या गर्दीवर तर कधी पापाराझींवर ओरडताना दिसतात. त्यासाठी त्यांना प्रचंड ट्रोल देखील केले जाते. पण जया फक्त बाहेरच्यांवरच रागवतात असे नाही. त्या अमिताभ बच्चनवर सुद्धा रागवतात. या गोष्टींचा खुलासा स्वत: बिग बींनी केला.

 KBC 14 मध्ये गुजरातचे भूपेंद्र चौधरी हॉट सीटवर बसले होते. त्यावेळी गप्पांच्या ओघात त्यांनी बिग बींना सांगितले की पत्नीच्या फोन कॉल्ससाठी मी वेगळी रिंग टोन सेट केली आहे. कारण तिचा आलेला फोन चुकवणं मला खूप महागात पडतं. यावर बिग बी म्हणाले, “ही फक्त तुमची समस्या नाही, जेवढे पुरुष आहेत, त्या प्रत्येकाची समस्या आहे… तिथून कॉल आला आणि तुम्ही तो उचलला नाही, मग तुम्ही गेलात कामातून.” बिग बी पुढे म्हणाले, “कसयं ना बायकांना याची कल्पना नसते की आपण काम करत असतो किंवा व्यस्त असतो त्यामुळे फोन घेत नाही, आपण नेहमी कॉल घेतलाच पाहिजे अशी त्यांची इच्छा असते.”

बिग बी यांनी सांगितले की, मी या समस्येवर उपाय देखील शोधला आहे, परंतु समस्येच्या त्या उपायात देखील समस्या आहे. “यावर एक उपाय आहे (हसत), तुमच्या सहकाऱ्याला किंवा सेक्रेटरीला या नंबरवरून फोन करायला सांगून तुम्ही व्यस्त असल्याचे सांगायला लावायचे. पण तसे केल्यास त्या असे देखील म्हणतात की, आता तुमच्याशी बोलायला तुमच्या सेक्रेटरीशी बोलाव लागेल का?”

बिग बींच्या या मजेशीर गोष्टी ऐकून सगळ्यांनाच हसू फुटलं. अनेकांच्या मते अमिताभ बच्चन यांचे आयुष्यही सामान्य माणसांसारखे आहे. त्यांनासुद्धा पत्नीची भीती वाटते. जया बच्चन यांच्या रागाचे बळी फक्त चाहते आणि मीडियाच नाही तर बिग बीसुद्धा पडतात.