बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी नवी दिल्ली...

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी नवी दिल्ली येथील गुरुद्वारा ‘कोविड केअर सेंटर’ला केली २ कोटींची मदत (Bollywood Superstar Amitabh Bachchan Donates Rs 2 Crore To New Delhi’s Gurudwara ‘COVID CARE CENTRE’)

करोनाच्या महामारीमुळे देशाची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. सामान्य माणसाच्या बेड, ऑक्सिजन सिलेंडर्स आणि औषधं यांसारख्या आवश्यक गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी कोणत्या ना कोणत्या स्वरुपात मदत करत आहेत. मदत करणाऱ्या कलाकारांच्या मांदियाळीमध्ये आता महानायक अमिताभ बच्चन यांनीही सहभाग घेतलेला आहे. अमिताभ बच्चन यांनी करोनाग्रस्त रुग्णांच्या मदतीसाठी कोविड सेंटर बनवण्यास २ कोटींचे योगदान दिले आहे.

नवी दिल्ली येथील रकाब गंज गुरूद्वाराच्या व्यवस्थापक मंडळाने याबद्दलची माहिती दिली आहे. बॉलिवूडचे अभिनेते अमिताभ बच्चन यांनी कोविड सेंटर बनवण्याकरिता २ करोड रुपयांची मदत केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ३०० बेडची सुविधा असलेल्या या कोविड सेंटरला ‘श्री गुरू तेग बहादुर कोविड केअर फॅसिलिटी’ असं नाव देण्यात आलं आहे.

दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष मनजिंदर सिंह सिरसा यांनी ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे.

शिरोमणी अकाली दलचे राष्ट्रीय प्रवक्ता मनजिंदर सिंह सिरसा यांनी आपल्या ट्वीट मध्ये लिहिलंय, “ श्री गुरु तेग बहादुर कोविड केयर सेंटर बनवण्यासाठी अमिताभजींनी योगदान दिलं, त्यावेळेस त्यांनी शीख महान आहेत, शीखांच्या सेवेस सलाम… असे शब्द उच्चारले. करोनाच्या दुसऱ्या लाटे दरम्यान जेव्हा दिल्लीमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा पडत होता, त्यावेळेस अमिताभजी मला रोज फोन करून सेंटरच्या निर्मितीचे काम कसे चालले आहे, याबद्दल चौकशी करायचे.”

३०० बेड्‌सच्या या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांच्या देखभालीकरता बेड्‌स, डॉक्टर्स, रुग्णवाहिका, ऑक्सिजन कंसन्ट्रेटर्स सारख्या सर्व सोयी उपलब्ध होणार आहेत. हे कोविड सेंटर आजपासून करोनाची लागण झालेल्या रुग्णांसाठी उघडलं जाणार आहे. येथे करोनाच्या रुग्णांना या सर्व सुविधा अगदी मोफत दिल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

अमिताभजींच्या आधी कोविड सेंटरमधील २५० बेडसाठी फिल्ममेकर रोहित शेट्टी यांनीही डोनेशन दिले असल्याचे यावेळी मनजिंदर सिंह यांनी सांगितले. ”रोहित शेट्टी पडद्यावर खतरों के खिलाडी असले तरीही खऱ्या जीवनामध्ये ते अतिशय संवेदनशील आणि दयाळू स्वभावाचे आहेत. ते नेहमीच गरजवंतांची मदत करतात. कोविड केअर फॅसिलिटी साठी योगदान दिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. रोहितजी, तुम्हाला तुमच्या या सेवेचे फळ आशीर्वादाच्या रुपाने मिळो!”