घटस्फोट घेतल्यानंतर या बॉलिवूड कलाकारांना मुलां...

घटस्फोट घेतल्यानंतर या बॉलिवूड कलाकारांना मुलांचा ताबा मिळवण्यासाठी माराव्या लागल्या कोर्टाच्या खेपा (Bollywood Stars Who Went To Courts For The Custody Of Their Children)

असे अनेक बॉलीवूड स्टार्स आहेत ज्यांचे लग्न फार काळ टिकले नाही आणि त्यांनी घटस्फोट घेऊन त्यांचे नाते संपुष्टात आणले. परंतु यापैकी अनेक जोडप्यांना घटस्फोटानंतर आपल्या मुलांच्या ताब्यासाठी कोर्टाच्या बऱ्याच खेपा घालाव्या लागल्या. अशाच काही कलाकारांबद्दल जाणून घेऊया.

करिश्मा कपूर

करिश्मा कपूर आणि तिचा माजी पती संजय कपूर यांचा घटस्फोट होऊन त्यांच्यातील नातेही संपले. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार खडाजंगी झाली. मुलांचा ताबा मिळावा यासाठी दोघांनीही न्यायालयात प्रदीर्घ लढा दिला. मुलगी समायरा आणि मुलगा कियान या दोन्ही मुलांचा ताबा मिळावा यासाठी संजयने याचिका दाखल केली होती. संजयने करिश्मावर आरोप केला होता की, करिश्माने त्याला मुलांना भेटू दिले नाही, पण अखेर करिश्माचा विजय झाला. कोर्टाने मुलांचा ताबा करिश्माकडे दिला आणि संजयला वीकेंडला मुलांना भेटण्याचा अधिकार दिला.

महिमा चौधरी

परदेस गर्ल महिमा चौधरीने २००६ मध्ये बिझनेसमन बॉबी मुखर्जीसोबत लग्न केले, मात्र काही वर्षांनी त्यांच्यात मतभेद सुरू झाले. अखेर २०१३ मध्ये महिमा बॉबी मुखर्जीपासून विभक्त झाली. दोघेही परस्पर संमतीने वेगळे झाले होते, त्यामुळे घटस्फोटासाठी त्यांना संघर्ष करावा लागला नाही, पण मुलगी एरियानाच्या कस्टडीसाठी या जोडप्याने न्यायालयात प्रदीर्घ लढा दिला आणि अखेर महिमाला एरियानाचा ताबा मिळाला.

श्वेता तिवारी

टेलिव्हिजनची यशस्वी अभिनेत्री श्वेता तिवारीने दोन विवाह केले आणि दोन्ही लग्ने यशस्वी झाली नाहीत. एवढेच नाही तर दोघांच्या लग्नाचा शेवट बराच वादग्रस्त ठरला. दोन्ही लग्नांतून तिला एकेक मूल असून दोन्ही वेळेस मुलांच्या ताब्यासाठी तिला कोर्टाच्या अनेक फेऱ्या माराव्या लागल्या. खूप कौटुंबिक ड्रामा झाला, तिच्यावर अनेक आरोपही झाले, पण शेवटी ती लढाई जिंकली आणि दोन्ही मुलांचा ताबा तिला मिळाला. सध्या ती आपल्या दोन्ही मुलांसोबत खूप आनंदात आहे.

पूनम ढिल्लन

अशोक ठकेरिया यांनी त्यांच्या काळातील बॉलिवूड अभिनेत्री पूनम ढिल्लनसोबत लग्न केले होते. या लग्नापासून त्यांना पलोमा आणि अनमोल अशी दोन मुले झाली. पण पतीच्या विवाहबाह्य संबंधामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात दुरावा आला. अशोकच्या फसवणुकीने व्यथित झालेल्या पूनमने अशोकला घटस्फोट दिला आणि न्यायालयाकडून दोन्ही मुलांचा ताबाही स्वतःकडे घेतला.

सारिका-कमल हसन

कमल हसन आणि सारिका यांचा २००४ मध्ये घटस्फोट झाला. त्यांना श्रुती हसन आणि अक्षरा हसन या दोन मुली आहेत, ज्यांच्या कस्टडीसाठी दोघांनी कोर्टात धाव घेतली. अखेर न्यायालयाने दोन्ही मुलींचा ताबा सारिकाला दिला. मात्र, मोठी झाल्यानंतर श्रुती स्वतः वडिलांच्या कमल हसन यांच्या घरी शिफ्ट झाली आहे.