परदेशात बंदी घातलेले बॉलिवूडचे यशस्वी चित्रपट (...
परदेशात बंदी घातलेले बॉलिवूडचे यशस्वी चित्रपट (Bollywood Movies Which Achieved Big Success In India, But were Banned Abroad)

बॉलिवूडचा खिलाडी अशी ओळख असलेला यशस्वी अभिनेता अक्षय कुमारचा अलिकडेच ‘बेल बॉटम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटास प्रेक्षकांचा तसेच चित्रपट समिक्षकांचा देखील उत्तम प्रतिसाद मिळाला आहे, तर दुसरीकडे परदेशात मात्र अनेक ठिकाणी या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार सोबत हुमा कुरैशी आणि वाणी कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. सांगायचं कारण असं की, परदेशात बंदी घालण्यात आलेला हा काही पहिला चित्रपट नाही. याआधी देखील भारतात बॉक्स ऑफिसवर दणक्यात चाललेले अनेक चित्रपट परदेशात मात्र बंदी घालण्यात आले. चला तर अशा चित्रपटांबद्दल जाणून घेऊया.
बेल बॉटम

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम
अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ हा चित्रपट १९ ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला होता. परंतु, आता या चित्रपटावर सौदी अरब, कुवैत आणि कतार येथे बंदी घालण्यात आली आहे. १९८० साली झालेल्या विमान अपहरणाच्या घटनेवर आधारित या स्पाय थ्रिलर चित्रपटामध्ये काही ऐतिहासिक तथ्यांचं उल्लंघन झालं असल्याचं सेन्सॉर बोर्डाचं म्हणणं आहे.
नीरजा

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
नीरजा भनोटच्या जीवनावर आधारित ‘नीरजा’ या चित्रपटामध्ये सोनम कपूर मुख्य भूमिकेत होती. मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या पॅन एएम फ्लाइटमध्ये क्रू मेंबर असलेल्या नीरजा भनोटची कथा दाखवणाऱ्या या चित्रपटावर पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आली होती. वास्तविक, ३६० जणांचे प्राण वाचवणाऱ्या नीरजा भनोट यांना विमान अपहरणादरम्यान कराची विमानतळावर दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार केले होते, त्यामुळे पाकिस्तानमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती.
पद्मावत

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम
चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ चित्रपटाबद्दल भारतात खूप वाद झाले होते, पण जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा त्याने बॉक्स ऑफिसवर कमाल केली. तथापि, मलेशियाच्या राष्ट्रीय सेन्सॉरशिप बोर्डाने या चित्रपटावर बंदी घातली आणि असा युक्तिवाद करण्यात आला की या चित्रपटाने इस्लामची संवेदनशीलता दुखावली आहे, जी मलेशियासारख्या मुस्लिम बहुल देशासाठी चिंतेची बाब आहे.
ओह माय गॉड

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम
अक्षय कुमार आणि परेश रावल यांचा ‘ओह माय गॉड’ हा चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर भलताच यशस्वी ठरला, पण या चित्रपटासंदर्भात अनेक वाद निर्माण झाले. वास्तविक, धर्माशी संबंधित अंधश्रद्धेवरून चित्रपटात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते, त्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा दाखला देत मध्य पूर्वेकडील देशांमध्ये चित्रपटावर बंदी घालण्यात आली.
द डर्टी पिक्चर

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम
बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनच्या ‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटात तिची बोल्ड अदा पाहायला मिळाली. चित्रपटात तिने साकारलेली सिल्क स्मिताची व्यक्तिरेखा दर्शकांच्या चांगलीच पसंतीस आली होती. हा चित्रपट भारतात सुपरहिट ठरला. पण एका अहवालानुसार, कुवैतसह अनेक देशांमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती.
डेल्ही बेली

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम
२०११ साली प्रदर्शित झालेल्या ‘डेल्ही बेली’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनव देव याने केले होते आणि यात इमरान खान मुख्य भूमिकेत होता. या ब्लॅक कॉमेडी ड्रामा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धम्माल उडवली, परंतु नेपाळमध्ये यावर बंदी घातली गेली. चित्रपटातून अश्लील दृश्ये काढली गेली नाहीत असा युक्तिवाद नेपाळ सेन्सॉर बोर्डाने केला होता.
फिजा

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम
करिश्मा कपूर आणि ऋतिक रोशन यांचा ‘फिजा’ चित्रपट प्रदर्शित होताच वादात सापडला होता. वास्तविक, चित्रपटात मुस्लीम माणसाची भूमिका साकारणारा हृतिक रोशन नंतर दहशतवादी बनतो, असं दाखविण्यात आलं असल्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होताच अनेक ठिकाणी त्याला तीव्र विरोध झाला. मलेशिया सरकारने यास विरोध करत एक निवेदन जारी केले होते की, मुस्लिम हा दहशतवादी असू शकत नाही. त्यामुळे या देशात बंदी घालण्यात आली.