अभिनेत्री रंभाच्या गाडीचा अपघात, मुलगी साशा रुग...

अभिनेत्री रंभाच्या गाडीचा अपघात, मुलगी साशा रुग्णालयात दाखल (Bollywood Judwaa Actress Rambha Car Accident Daughter Sasha Injured )

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री रंभाबाबत एक दुःखद गोष्ट समोर आली आहे. तिच्या गाडीला अपघात झाला असल्याची माहिती तिने स्वतःच सोशल मीडिया अकाऊंटद्वारे फोटो शेअर करत दिली आहे. रंभाबरोबर गाडीमध्ये तिची मुलं तसेच मुलांना सांभाळणारी नॅनी होती. अपघात झालेल्या गाडीचे फोटोही तिने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे पोस्ट केले आहेत. रंभा व तिच्या मुलांसाठी चाहतेही प्रार्थना करत आहेत.

रंभाच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटी आणि चाहते कमेंट करत आहेत आणि रंभा आणि तिच्या मुलीसाठी प्रार्थना करत आहेत. अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मुलांना शाळेतून आणत असताना आमच्या गाडीला दुसऱ्या गाडीने धडक दिली. यावेळी गाडीत माझ्यासोबत मुलं आणि मदतनीस होत्या. आम्ही सर्व सुरक्षित आहोत. किरकोळ जखमा झाल्या आहेत. माझी छोटी साशा अजूनही हॉस्पिटलमध्ये आहे. कृपया आमच्यासाठी प्रार्थना करा. तुमच्या प्रार्थनेची सर्वाधिक गरज आहे.’

रंभाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या गाडीचंही बरंच नुकसान झालेलं दिसत आहे. शिवाय गाडीची अवस्था पाहिल्यानंतर हा अपघात मोठा होता हे दिसून येतं. रंभाने रुग्णालयामधील तिच्या मुलीचाही फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्या मुलीवर उपचार होत असल्याचं दिसत आहे.

नव्वदच्या दशकामधील सुप्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये तिचंही नाव होतं. ‘जुडवा’, ‘घरवाली बाहरवाली’, ‘क्यूंकी में झुठ नहीं बोलता’ यांसारख्या हिंदी सिनेमांमध्ये रंभाने काम केले असून तेलगू, तमिळ, कन्नड, मल्याळम, बंगाली, भोजपुरी आणि इंग्रजी चित्रपटांमध्येही तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.