बॉलिवूडचे डबाबंद झालेले, रखडलेले दुर्दैवी चित्र...

बॉलिवूडचे डबाबंद झालेले, रखडलेले दुर्दैवी चित्रपट (Bollywood Films Which Got Canned Due To Lack Of Fund And Some Controversy)

करोनाच्या महामारीमुळे चित्रसृष्टीला मोठा फटका बसला आहे. कितीतरी लहानमोठे चित्रपट, प्रदर्शित होऊ शकलेले नाहीत. त्यामध्ये निर्मात्यांचे करोडो रुपये अडकले आहेत. हे कारण सबळ आहे. परंतु चित्रसृष्टीच्या इतिहासात कित्येक चित्रपट वेगवेगळ्या कारणांनी रखडले आहेत. शूटिंग सुरू होऊन डबाबंद झाले आहेत. अशा बंद झालेल्या चित्रपटांच्या कहाण्या सुरस आणि चमत्कारिक आहेत.

अशा दुर्दैवी चित्रपटांमधील एक चित्रपट ‘शू बाईट’. महानायक अमिताभ बच्चन त्यात प्रमुख भूमिकेत. हा चित्रपट तर पूर्ण तयार आहे. २०१८ साली अमिताभने सोशल मीडियावर असे दिले होते की, हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. पण असं ऐकिवात आहे की, कायद्याच्या कचाट्यात हा चित्रपट सापडल्याने प्रदर्शित होऊ शकलेला नाही.

Bollywood Films, Controversy
Bollywood Films, Controversy

सलग तारखा देऊन चित्रपट पूर्ण करण्याबाबत निर्मात्यांना सहकार्य देण्याबाबत अक्षय कुमार ख्यातनाम आहे. असं असलं तरी त्याचे काही चित्रपट डबाबंद झालेले आहेत. १९९३ साली ‘परिणाम’ हा चित्रपट अक्षय कुमारने स्वीकारला होता. त्याची नायिका म्हणून दिव्या भारतीला घेण्यात आलं होतं. पण तिचे दुःखद निधन झाले म्हणा किंवा अन्य काही कारणाने म्हणा, हा चित्रपट तयार होऊ शकला नाही.

Bollywood Films, Controversy

‘चांदभाई’ असा अक्षय कुमारचा आणखी एक चित्रपट बराच रखडला. २०१२ साली तो प्रदर्शित करण्याची योजना होती. त्यात अक्षयची नायिका विद्या बालन होती. दिग्दर्शन निखील अडवाणी यांचं होतं. गँगस्टर होण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या एका नवतरुणाची कथा त्यात होती. दुर्दैवाने हा चित्रपट पूर्ण झाला नाही.

Bollywood Films, Controversy

कतरिना कैफची बहीण इझाबेल २०१८ सालीच एका चित्रपटाची नायिका म्हणून पदार्पण करणार होती. त्याचं नाव होतं ‘टाइम टू डान्स’. तिचा नायक होता सूरज पंचोली. नृत्य-संगीतमय असा हा चित्रपट होता. तो पूर्ण तयार देखील झाला. परंतु त्यातील काही भाग पुन्हा चित्रित करण्याचे ठरले. ते झालं नाही. अन्‌ चित्रपट डबाबंद झाला. आता इझाबेल ‘क्वाथा’ या चित्रपटातून पदार्पण करील. यात तिचा नायक आहे आयुष शर्मा.

Bollywood Films, Controversy

शेखर कपूरने १९९२ साली ‘टाइम मशीन’ नावाचा चित्रपट बनवायला घेतला. आमीर खान, रविना टंडन, रेखा, नसीरुद्दीन शहा असे मोठे कलावंत त्यात होते. चित्रपट जवळपास पूर्ण होत आला होता. पण आर्थिक अडचणींमुळे चित्रपट अर्धवट सोडावा लागला. त्यानंतर शेखर कपूर अमेरिकेस गेला. अन्‌ ‘टाइम मशीन’ बाद झाला.

Bollywood Films, Controversy

‘चल मेरे भाई’ या चित्रपटानंतर सलमान खान व संजय दत्त यांनी मुकुल आनंद यांचा ‘दस’ हा तित्रपट करारबद्ध केला. १९९७ साली या दोघांना घेऊन त्याचे बरेचसे शूटिंग झाले. पण मुकुल आनंद यांचं आकस्मिक निधन झालं. अन्‌ हा चित्रपट रखडला. हा चित्रपट पूर्ण झाला नाही. पण त्याचं ‘दस बहाने’ हे एक गाणं खूप गाजलं होतं.

Bollywood Films, Controversy
Bollywood Films, Controversy

राजकुमार संतोषी यांनी अक्षय कुमार आणि अजय देवगण असे दोघांना घेऊन ‘सामना’ चित्रपट सुरू केला. त्यात रितेश देशमुख, नाना पाटेकर, उर्मिला मातोंडकर, महिमा चौधरी असे नामांकित कलाकार त्यांनी घेतले होते. २००६ साली हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. पण कुठे माशी शिंकली कुणास ठाऊक. या चित्रपटाला रुपेरी पडदा काही दिसला नाही.

Bollywood Films, Controversy

सागरी साहसावर आधारित असलेला ‘ब्लू’  हा चित्रपट २००९ साली प्रदर्शित झाला. अक्षय कुमार आणि संजय दत्त त्यात होते. समुद्राच्या खालची मनोहारी दृश्ये या चित्रपटात चित्रीत करण्यात आली आहे. ‘ब्लू’चा पुढचा भाग म्हणता येईल, असा ‘आसमान’ नावाचा चित्रपट तयार करण्याची जोरदार तयारी झाली. अक्षय आणि संजय सोबत लारा दत्ता, कतरिना कैफ, जायेद खान होते. शिवाय जॉन अब्राहम, सोनल चौहान, नेहा ओबेरॉय यांना पण घेण्यात आलं. पण या चित्रपटाची फारशी प्रगती झालीच नाही.

Bollywood Films, Controversy

देव आनंदच्या ‘गाईड’ या सुपरहिट चित्रपटाचे गोडवे आजही गायले जातात. त्याचा रिमेक करण्याची घोषणा ऋतुपर्णो घोष यांनी केली. त्याचं नाव ‘राहगीर’ ठेवण्यात आलं. अक्षय कुमार आणि विद्या बालन यांना घोषबाबूंनी करारबद्ध केलं. पण या चित्रपटास खीळ बसली. असं म्हणतात की, ‘गाईड’ चा रिमेक होऊ नये, असं देव आनंदला मनापासून वाटत होतं. त्यानेच या ‘राहगीर’ ला मोडता घातला असावा, असा कयास आहे.

Bollywood Films, Controversy

एखाद्या चित्रपटाची निर्मिती करणे आणि तो प्रदर्शित करणे, यासाठी खूप पैसे लागतात. अन्‌ कसून मेहनतही करावी लागते. त्यामुळे प्रदर्शित झालेला चित्रपट खूप यशस्वी झाला, तर निर्माता फायद्यात असतो. पण असे चित्रपट रखडले तर त्याला तोटा होतो.