बॉलिवूडच्या पडद्यावर पाहायला मिळणार संभाजी महार...

बॉलिवूडच्या पडद्यावर पाहायला मिळणार संभाजी महाराजांचे शौर्य, प्रमुख भूमिकेत दिसणार अभिनेता विकी कौशल (Bollywood Film To Explore The Gallantry Of Sambhaji Maharaj : Actor Vicky Kaushal To Play The Role)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची, त्यांच्या आयुष्याची भुरळ ही मराठीसोबतच इतर भाषिक प्रेक्षकांनाही आहे. त्यामुळेच सध्या महाराजांच्या आयुष्याशी संबंधित अनेक चित्रपट मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीत प्रदर्शित होत आहेत. अजय देवगणच्या तानाजी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. या चित्रपटात तानाजी मालुसरेंची यशोगाथा दाखवण्यात आली होती. आता पुन्हा एकदा शिवकालीन इतिहास प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. शिव छत्रपती पुत्र संभाजी महाराजांच्या पराक्रमांवर बॉलिवूड चित्रपट येणार आहे. लोकप्रिय बॉलिवूड दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर चित्रपट काढणार आहेत.

विशेष म्हणजे या चित्रपटात अभिनेता विकी कौशल संभाजी महाराजांची प्रमुख भुमिका साकारणार आहे. उतेकरांच्या मनात जेव्हा बॉलिवूडमध्ये हा चित्रपट तयार करण्याविषयी आले, तेव्हा त्यांनी सर्वप्रथम विकी कौशलला पसंती दिली होती. मात्र संभाजी महाराजांची भूमिका साकारणे भयंकर आव्हानात्मक असल्यामुळे विकी कौशलने त्यास होकार दिला नव्हता.

त्याच्या मनावर महाराजांबद्दल प्रचंड दडपण आल्याचे त्याने म्हटले होते. पण आता विकी कौशलकडून या भूमिकेसाठी ग्रीन सिग्नल आला आहे. तसेच अभिनेत्री सारा अली खान या चित्रपटात महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटाची कथा तयार असून लवकरच शूटींगलाही सुरुवात होणार आहे.