करोनाच्या विळख्यातून बाहेर आलेल्या कलाकारांचे अ...

करोनाच्या विळख्यातून बाहेर आलेल्या कलाकारांचे अनुभव : खबरदारी घेण्याचा सल्ला (Bollywood Celebs Who Recovered From Covid, Share Their Experience, Say, Don’t Take It Lightly, Be Careful)

जगभरात करोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. त्यामध्ये बॉलिवूड आणि टी.व्ही. क्षेत्रातील कलाकारांनी त्याचा वाईट अनुभव घेतला आहे. त्यातील बरेचसे कलाकार बरे झालेले आहेत. बऱ्या झालेल्या काही कलाकारांनी आपले वाईट अनुभव प्रसारित केले आहेत. त्याबरोबरच सर्व लोकांना खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.

अर्जुन रामपाल

करोनावर मात केलेल्या अर्जुन रामपालने इन्स्टाग्रामवर आपल्या अनुभवाची पोस्ट शेअर केली आहे. ” मी लवकर बरा झालो. तेव्हा माझ्या डॉक्टरांनी सांगितलं की, मी व्हॅक्सिनचा पहिला डोस घेतल्याने लवकर बरा झालो. करोना व्हायरसचा माझ्यावर कमी परिणाम झाला. मी लोकांना विनंती करतो की, लवकरात लवकर व्हॅक्सिन टोचून घ्या. पॉजिटिव्ह राहा, पण पॉजिटिव्ह होऊ नका. हे वाईट दिवस पण जातील.”

निक्की तांबोळी

बिग बॉस १४ची एक स्पर्धक निक्की तांबोळीने पण करोनावर मात केली आहे. ”जीवनातला हा वाईट अनुभव होता,” असं सांगून ती पुढे म्हणते, ”करोनाची बाधा झाल्यानंतर जे लोक बरे झालेत, त्यांना असं वाटतं की; आपल्याला पुन्हा करोना होणार नाही. पण असं काही नाही. त्यांनी आणखी सावध राहायला पाहिजे. सगळ्यांनीच सावधानी बाळगली पाहिजे. अन्‌ समजा रिपोर्ट पॉजिटिव्ह आला तरी घाबरून जाऊ नका.”

राजेश कुमार

‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या मालिकेचा एक कलाकार राजेश कुमारला गेल्या वर्षी करोनाची बाधा झाली होती. त्यातून तो बरा झाला. सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळण्याचे आवाहन त्याने लोकांना केले आहे. वेळ अशी आली आहे की, लोकांपासून अंतर ठेवले पाहिजे. अगदी आवश्यक काम असेल तर घराबाहेर पडा. अन्यथा नको. सावधान राहा, घाबरू नका. आपल्या इम्युनिटीची काळजी घ्या. आनंदी राहा. गरज भासल्यास आपल्या डॉक्टरांकडे जरूर जा. करोनाला कमी समजू नका.

हिमानी शिवपुरी

सिने आणि टी. व्ही. क्षेत्रातील ज्येष्ठ कलावती हिमानी शिवपुरी म्हणते, ”एकदा झाल्यानंतर करोना दुसऱ्यांदा होणार नाही, असं समजू नका. करोनास सहजतेने घेऊ नका. सर्व प्रकारे खबरदारी घ्या. घराबाहेर पडताना मास्क जरूर लावा. शक्य असेल तर डबल मास्क लावा. जेणेकरून तुम्ही स्वतः आणि आसपासचे लोक सुरक्षित राहतील.”

आफताब शिवदासानी

आफताबने करोनाचा पराभव केलेला आहे. तो म्हणतो, ”करोनाशी यशस्वी झुंज दिली असली तरी मी सर्वतोपरी काळजी घेतो आहे. घराबाहेर पडताना मास्क लावायला विसरत नाही. सॅनिटायजर जवळ बाळगतो. या व्हायरसपासून सुरक्षित राहणं आपल्याच हाती आहे.”

सतीश कौशिक

अभिनेता व दिग्दर्शक सतीश कौशिक आपले अनुभव सांगतो, ” मी, माझी ८ वर्षांची मुलगी वंशिका आणि ३ नोकर, असे एकूण ५ जण करोना पॉजिटिव्ह झालो होतो. फक्त माझ्या बायकोचा रिपोर्ट निगेटिव्ह होता. आमच्या कुटुंबासाठी १ महिन्याचा काळ खूपच कठीण गेला. माझं लोकांना सांगणं आहे की, सुरक्षित राहा. मुलांची काळजी घ्या. कारण ही दुसरी लाट मुलांवर जास्त परिणाम करते आहे. दर तासाने हात सॅनिटाईज करा. मास्क घाला. ब्रेक द चेन फॉलो करा. तेव्हाच आपण करोनामुक्त राहू.”