या बॉलीवूड सेलेब्सनी स्वतःच्या वडिलांच्या नावाव...
या बॉलीवूड सेलेब्सनी स्वतःच्या वडिलांच्या नावावरून ठेवली आपल्या मुलांची नावं(Bollywood Celebs Who Named Their Son After father’s name)

बॉलिवूडमध्ये अशा अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी आपल्या वाडवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली आहे. एवढंच नाही तर या कलाकारांनी आपल्या वडिलधाऱ्यांच्या प्रेमाखातर आपल्या मुलांना वडिलांचं वा आजोबांचं नाव दिलं आहे. जाणून घेऊया या कलाकारांबद्दल…
करण जोहर

निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यानं सरोगसी पद्धतीनं पिता बनण्याचा निर्णय घेतला, त्याच वेळेस त्यानं आपल्या मुलांची नावं त्याच्या आई-वडिलांच्या नावावरून ठेवण्याचंही ठरवून ठेवलं होतं. त्याला एक मुलगा अन् एक मुलगी अशी जुळी मुलं असून त्याने रुही आणि यश जोहर अशी त्यांची नावं ठेवली आहेत. करणच्या आईचे नाव हिरू जोहर आहे. हे नाव उलट करून त्याने आपल्या मुलीचे रुही असं नामकरण केलं आहे आणि मुलाला आपल्या स्वर्गीय पित्याचे अर्थात यश नाव दिले आहे.
रणबीर कपूर

रणबीर कपूरच्या जन्माआधी राज कपूर यांना आजोबा म्हणणारा कोणीच नातू नव्हता. त्यामुळे ऋषि कपूर आणि नीतू कपूर यांना जेव्हा मुलगा झाला, तेव्हा संपूर्ण कपूर कुटुंबियांना बेहद आनंद झाला. विशेषतः राज कपूर आपल्या नातवाला पाहून अत्यंत खुश झाले. हाच आनंद साजरा करण्याकरता ऋषि कपूर याने आपल्या मुलाला त्याच्या आजोबांचं अर्थात राज कपूर यांचं नाव ठेवलं. राज कपूर यांचं खरं नाव रणबीर राज कपूर होतं, जे नंतर त्यांच्या नातवाला दिलं गेलं.
करिश्मा कपूर

कपूर खानदानाची ही परंपरा करिश्माने पुढे नेली आहे. करिश्माने आपल्या मुलाचं नाव तिच्या आजोबांच्या अर्थात राज कपूर यांच्या नावावरून ठेवलं आहे. तिच्या मुलाचं नाव कियान आहे, परंतु ती आपल्या मुलाचं पूर्ण नाव कियान राज कपूर असं लिहिते. कियान अतिशय हा रुबाबदार आहे आणि यदाकदाचित तो चित्रसृष्टीत आलाच तर उत्तम अभिनयाने आपल्या खानदानाचं नाव निश्चितच मोठं करेल.
एकता कपूर

अभिनेता जितेंद्र आणि शोभा कपूर यांची मुलगी आणि ‘टीव्ही क्वीन’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या एकता कपूरने छोट्या पडद्यापासून बॉलिवूडमध्येही खूप नाव कमावले आहे. एकता कपूरचे अद्याप लग्न झालेले नाही, पण ती एका सुंदर मुलाची आई आहे. एकता कपूरने सरोगसीने एका मुलाला जन्म दिला आहे आणि त्याचं नाव रवी कपूर असं ठेवलं आहे. रवी कपूर हे तिच्या वडिलांचं म्हणजेच जितेंद्र यांचं खरं नाव आहे.
बॉबी देओल

बॉबी देओलने त्याला पहिला मुलगा झाला त्यावेळेस त्याचे नाव धरम सिंह असे ठेवायचे ठरवले होते, परंतु कुटुंबिय यासाठी तयार झाले नाहीत व त्याने आपल्या मुलाचं नाव आर्यमन देओल असं ठेवलं. परंतु त्याला दुसरा मुलगा झाल्यानंतर मात्र त्याने त्यास वडिलांचे खरे नाव धरम सिंह आपल्या मुलाला ठेवले.