जगभरातील स्थळांना दिली आहे ...

जगभरातील स्थळांना दिली आहे बॉलिवूड कलाकारांची नावं (Bollywood Celebs Who Have Places Named After Them)

बॉलिवूड कलाकारांचे चाहते जगभर आहेत. ही चाहते मंडळी त्यांच्यावर भरभरून प्रेम करतात नि सन्मानही करतात. इतके की त्यांनी काही रस्ते, धबधबे आणि रेस्टॉरंट यांना त्यांची नावे बहाल करून टाकली आहेत.

अमिताभ बच्चन

बिग बीचे चाहते जगभर आहेत. त्याचा अभिनय, संवादफेक, डान्स करण्याची शैली, त्याची जीवनशैली याबद्दल त्याचे चाहते दिवाने झाले आहेत. त्याची लोकप्रियता इतकी अफाट आहे की, उत्तर सिक्कीममधील एका धबधब्याला त्याचे नाव देण्यात आले आहे. शिवाय २००४ साली सिंगापूरमधील एका ऑर्किडला त्याचे नाव देण्यात आले आहे. डेंड्रोबिम अमिताभ बच्चन असे नामकरण करण्यात आले आहे.

शाहरूख खान

पहिल्या चित्रपटापासून शाहरूखने लोकांची मने जिंकली आहेत. त्याचेही चाहते जगभर पसरले आहेत. त्याचा सन्मान करण्यासाठी न्यूयॉर्क येथील लुनार जिओग्राफिकल सोसायटीने एका लुनार क्रेटरला त्याचे नाव दिलेले आहे. अर्थात्‌ चंद्रावरील एका विवराला त्याचे नाव देण्यात आले आहे.

ऐश्वर्या राय

ऐश्वर्या रायने आपल्या सौंदर्याने जगभरातील चाहत्यांना मोहित केले आहे. आधी तिने मिस वर्ल्ड हा किताब मिळविल्याने ती जगात परिचित झाली होतीच. त्यात तिच्या चित्रपट कारकिर्दीची भर पडली. हॉलंड मधील ट्यूलिप फुलाच्या एका जातीला ऐश्वर्याचे नाव देण्यात आले आहे. ट्यूलिपची ही जात अतिशय सुंदर दिसते. म्हणून सौंदर्यवती ऐश्वर्याचे नाव त्या फुलास देण्यात आले आहे.

सलमान खान

बॉलिवूडचा भाईजान म्हणून कीर्ती पावलेल्या सलमान खानचे नाव तुर्की येथील एका कॅफेस देण्यात आले आहे. त्याचं असं झालं की सलमान तुर्कीमध्ये बरेच दिवस एका चित्रपटाचे शूटिंग करत होता. तेथील एका कॅफेमध्ये तो जवळपास दररोज जाऊन चहापान करायचा. त्याचे त्या हॉटेलशी लागेबांधे इतके जुळले की, त्याच्या मालकाने आपल्या कॅफेचे नामकरण सलमान खान कॅफे असे करून टाकले. शिवाय मुंबईतही एका रेस्टॉरंटचे नाव भाईजान असे ठेवण्यात आले आहे.

राज कपूर

बॉलिवूडचा शोमॅन म्हणून ख्यातकीर्त झालेल्या राज कपूरचे हिंदी सिनेमातील योगदान फार मोठे आहे. त्याच्या चित्रपटांनी देशातील नव्हे, तर परदेशातील प्रेक्षकांवर गारूड केले आहे. त्याचा बहुमान करण्यासाठी कॅनडा मधील एका रस्त्याला त्याचे नाव देण्यात आले आहे. ब्रॅम्पटन शहरात असलेल्या या रस्त्याचे नाव राज कपूर क्रिसेन्ट असे ठेवण्यात आले आहे.

शाहिद कपूर

एका पाठोपाठ एक यशस्वी चित्रपटात उत्तम अभिनय करून शाहिद कपूरने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. त्याची ही लोकप्रियता पाहून, ओरियन कॉन्स्टेलेशनमधील एका स्टारला त्याचे नाव देण्यात आले आहे. अर्थात्‌ नक्षत्रामध्ये असलेल्या तारकापुंजातील एका ताऱ्याला त्याचे नाव देण्यात आले आहे.

ए. आर. रहमान

ऑस्कर पारितोषिक विजेता, संगीतकार ए. आर. रहमान याने आपल्या संगीतावर, जगभरातील सिनेशौकिनांना ताल धरायला लावला आहे. त्याचे देश-विदेशात भरपूर चाहते आहेत. त्याच्या संगीतसेवेचा सन्मान म्हणून कॅनडा मधील ओन्टेरियो येथील एका रस्त्याला त्याचे नाव देण्यात आले आहे. अल्ला रखा रहमान स्ट्रीट अशी पाटी त्या रस्त्यावर झळकते आहे.

यश चोप्रा

सुप्रसिद्ध निर्माते व दिग्दर्शक यश चोप्रा यांना हिंदी सिनेमाचे किंग ऑफ रोमांस, असे गौरविण्यात आले आहे. कारण त्यांचे जवळपास सर्वच चित्रपट रोमॅन्टिक आहेत. त्यांचे भव्य, यशस्वी चित्रपट परदेशातही गाजले आहेत. आपल्या बव्हंशी चित्रपटांचे शूटिंग त्यांनी स्वित्झर्लंडमध्ये केले आहे. त्यामुळे तिकडच्या लोकांना ते आपल्यापैकीच एक वाटत होते. त्यांच्या सन्मानार्थ तेथील एका तलावाचे नाव यश चोप्रा लेक असे ठेवण्यात आले आहे.

माधुरी दीक्षित

बॉलिवूडची गुणी अभिनेत्री व उत्कृष्ट नर्तकी असलेली माधुरी दीक्षित आजही आपली लोकप्रियता व सौंदर्य राखून आहे. तिच्या सन्मानार्थ ओरियन कॉन्स्टेलेशन मधील एका स्टारला तिचे नाव देण्यात आले आहे. अर्थात मृग नक्षत्रामध्ये असलेल्या तारकापुंजातील एका ताऱ्याला माधुरीचे नाव देण्यात आले आहे. अतीव लोकप्रियता आणि चाहत्यांचे अलोट प्रेम याला म्हणता येईल.

मनोजकुमार

अभिनयाबरोबरच दिग्दर्शनातही आपला ठसा उमटविणारा मनोजकुमार त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांनी चाहत्यांचा आवडता आहे. तो शिरडीच्या साईबाबांचा निस्सिम भक्त आहे. त्यांच्यावरील श्रद्धेपोटी मनोजने शिर्डी के साईबाबा हा उत्कृष्ट चित्रपट बनविला होता. ज्याची पारायणे आजही टेलिव्हिजन मार्फत होत असतात. शिर्डी संस्थानात त्याला मान आहे. म्हणूनच श्री साईबाबा संस्थानाने शिर्डी येथील एका रस्त्याला मनोजकुमार गोस्वामी रस्ता, असे नाव देऊन त्याचा सन्मान केला आहे.