मूलबाळ नसलेली नामांकित जोडप...

मूलबाळ नसलेली नामांकित जोडपी ( Bollywood Celebrity Couples Who Did Not Have Their Own Kids)

बॉलिवूडमध्ये अशा अनेक सेलिब्रेटी जोड्या आहेत की, त्यांच्या लग्नगाठी या सिनेसृष्टीमध्येच
जुळलेल्या आहेत. त्यांनी आपल्या क्षेत्रातीलच जीवनसाथी शोधला आहे. दिलीप कुमार-सायरा बानू
असो जावेद अख्तर-शबाना आ़झमी किंवा मग किशोर कुमार-मधुबाला, या सगळ्यांनाच आपल्या
आवडीचा जीवनसाथी येथे बॉलिवूडमध्येच मिळालेला आहे. यामध्ये अशी काही जोडपी आहेत की
ज्यांना लग्नानंतर स्वतःचं मूल झालं नाही. जी मुलं आहेत ती पहिल्या लग्नाची आहेत. बरं यात
अशीही जोडपी आहेत की ज्यांना वैद्यकीय कारणांमुळे मूल झालं नाही तर काहींनी मुद्दाम
ठरवून मूल होऊ दिलं नाही. पाहुया ही जोडपी कोणती आहेत?
दिलीप कुमार – सायरा बानू
५० आणि ६० च्या दशकामध्ये दिलीप कुमार हे बॉलिवूडचे मोस्ट एलिजिबल बॅचलर होते.
मधुबालाशी प्रेमसंबंध तुटल्यानंतर त्यांची सायरा बानूशी ओळख झाली. सायरा सिनेसृष्टीमध्ये
नवखी असतानाच त्यांनी आपल्यापेक्षा २२ वर्षांनी मोठ्या असलेल्या ट्रॅजेडी किंग दिलीपजींशी
लग्न केलं. लग्नानंतर त्या गरोदर राहिल्या होत्या परंतु त्यांचा गर्भपात झाला. त्यानंतर त्या
पुन्हा कधीच गरोदर राहू शकल्या नाहीत. परंतु असे असतानाही दोघांनी देवाची मर्जी असे
समजून परिस्थितीशी जुळवून घेतले. आजही हे जोडपं बॉलिवूडमधील सर्वाधिक रोमँटिक आणि
यशस्वी जोडपं मानलं जातं.

मीना कुमारी- कमाल अमरोही
कमाल अमरोही हे त्यांच्या काळातील नावाजलेले दिग्दर्शक होते आणि मीना कुमारी रुपेरी
पडद्यावरील ट्रॅजेडी क्वीन. दोघंही एकमेकांना चित्रपटांच्या सेटवर भेटले आणि प्रेमात पडले.
कमाल हे मीना कुमारीपेक्षा १५ वर्षांनी मोठे होते आणि विवाहित होते. त्यांना मुलंही होती. असं
म्हणतात की, आपण आपलं मूल होऊ द्यायचं नाही या अटीवरच त्यांनी मीना कुमारी यांच्याशी
लग्न केलं होतं. लग्न झाल्यानंतरही त्यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत गेला आणि त्यांना
एकटेपणा आला. तशातच लिव्हर सोरायसिसच्या कारणाने १९७२ मध्ये त्यांचा मृत्यू झाला.

साधना – आर. के. नय्यर
एव्हरग्रीन अभिनेत्री साधना शिवदासानी आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक आर. के. नय्यर यांची जोडी
ही बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अशी जोडी होती. १९६६ मध्ये दोघांनी लग्न केलं. साधना
त्यावेळेस करियरच्या सुवर्णकाळातून जात होत्या आणि नय्यर साहेबही त्यावेळच्या मोठ्या
दिग्दर्शकांमध्ये गणले जात होते. दोहोंमध्ये अतिशय प्रेम होते परंतु त्यांना स्वतःचे अपत्य होऊ
शकले नाही.


आशा भोसले – आर. डी. बर्मन
सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले आणि सगळ्यांचे आवडते संगीत दिग्दर्शक पंचमदा म्हणजेच
आर. डी. बर्मन या सेलिब्रेटी जोडप्यासही मूल झालं नाही. पंचमदांच्या आधी आशाजींचं लग्न
गणपतराव भोसले यांच्याशी झाले होते आणि त्यांना तीन मुलंही आहेत. लग्नानंतर ११ वर्षांनी ते
वेगळे झाले. १९८० मध्ये आशाजी आणि पंचमदा यांनी लग्न केले. दोघांनी एकमेकांशी बोलून
एकमेकांच्या परवानगीने मुलांपेक्षा आपल्या गाण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले.

मधुबाला – किशोर कुमार
मुमताज जहान दहलवी ऊर्फ मधुबाला ही बॉलिवूडमधील सर्वाधिक सुंदर अभिनेत्रींपैकी एक होती.
अनेकांना तिच्या सौंदर्याने वेड लावले होते. तर दुसरीकडे गायक किशोरदाही चाहत्यांच्या
गळ्यातला ताईत होते. दिलीप साहेबांशी प्रेमभंग झाल्यानंतर मधुबालाच्या आयुष्यात किशोरदा
आले आणि दोघांनी १९६० मध्ये लग्न केले. किशोरदांना एक मुलगा होता, जो त्यांच्या पहिल्या
बायकोचा होता. लग्नानंतर मधुबालाला हृदयरोग झाला आणि डॉक्टरांनी त्यांना मुलाबद्दल
विचारही करू नका, असा सल्ला दिला. त्यानंतर १९६९ साली त्यांचा मृत्यू झाला


शबाना आझमी – जावेद अख्तर
जावेद अख्तर यांनी १९७२ साली पहिल्यांदा अभिनेत्री हनी इराणी यांच्याशी लग्न केले. त्यांना
फरहान आणि झोया अशी दोन मुलंही झाली. काही वर्षांनी त्या दोघांनी घटस्फोट घेतला आणि
जावेदजींनी शबाना आझमी यांच्याशी विवाह केला. शबानाजींनी दोन्ही मुलांना आपल्या
मुलांप्रमाणेच मानले. शबाना आणि जावेदजी दोघंही आपल्या कामात व्यस्त होते त्यामुळे त्यांनी
स्वतःच्या मुलाबद्दल कधी विचारही केला नाही.


अनुपम खेर – किरण खेर
अनुपम खेर आणि किरण यांची भेट ८०च्या दशकात चंदीगढ येथे झाली. त्यावेळेस ती दोघं
नाटकांत काम करत होते. किरण यांचं लग्न झालं होतं आणि त्यांना सिकंदर हा मुलगाही होता.
परंतु, पतीशी त्यांचं जमेनासं झालं आणि त्यांनी घटस्फोट घेऊन अनुपम खेर यांच्याशी विवाह
केला. त्यानंतर ती दोघं मुंबईला आले. दोघांना स्वतःचं मूल हवं होतं, परंतु काही वैद्यकीय
कारणामुळे त्यांनी मूल होऊ द्यायचं नाही असा निर्णय घेतला. पण सिकंदर, अनुपम खेर यांचंच
आडनाव लावतो.


संगीता बिजलानी – मोहम्मद अझरुद्दीन
मोहम्मद अझरुद्दीन हा भारतीय क्रिकेट संघाचा सर्वाधिक यशस्वी कप्तान होता आणि संगीता
एक यशस्वी मॉडेल आणि अभिनेत्रीही होती. नव्वदच्या दशकात ते दोघे भेटले. अझरुद्दीनने
आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला आणि १९९६ मध्ये अझरुद्दीन आणि संगीता बिजलानी
यांनी लग्न केले. अझरुद्दीनची पहिल्या बायकोची दोन मुलं आहेत, पण संगीता आणि अझर
यांना स्वतःचं मूल नाही.