बॉलिवूड कलाकारांच्या अंधश्रद्धा : रणवीर सिंह पा...

बॉलिवूड कलाकारांच्या अंधश्रद्धा : रणवीर सिंह पायात काळा दोरा बांधतो, तर शिल्पा शेट्टी २ घड्याळे घालते…(Bollywood Celebrities And Their Superstitions)

प्रसिद्धी आणि पैसा या गोष्टी अमाप असल्या तरी बॉलिवूड सिताऱ्यांच्या मनात एक सामान्य माणूस दडलेला असतोच. त्यामुळे कारकिर्दीत यश मिळवण्यासाठी अथवा आपला सिनेमा चालावा म्हणून हे काय काय प्रकार करत असतात. तेव्हा ते कोणकोणत्या गोष्टींचा सहारा घेतात, ते पाहूया.

  • पायात काळा दोरा बांधतो रणवीर सिंह

आपल्या सुरक्षिततेसाठी रणवीर सिंह पायात काळा दोरा बांधतो. काही वर्षांपूर्वी रणवीर, शूटिंग दरम्यान आजारी पडायचा किंवा त्याला काही इजा तरी व्हायची. अशा गोष्टी घडू नये म्हणून त्याने पायाला काळा दोरा बांधायला सुरुवात केली.

  • शिल्पा शेट्टी २ घड्याळे घालते

आयपीएल क्रिकेट सामन्यांमध्ये शिल्पी शेट्टीची राजस्थान रॉयल्स ही टीम खेळते. या टीमची मॅच असते तेव्हा ती हातात २ घड्याळे घालते. असं केल्याने टीम जिंकते, असा तिचा विश्वास आहे. शिल्पा शेट्टी बरीच अंधश्रद्धाळू आहे. म्हणून ती देवळात जाते. विशिष्ट प्रकारच्या अंगठ्या घालते.

  • अमिताभ क्रिकेट सामना लाईव्ह पाहत नाही

बिग बी अमिताभ बच्चनला क्रिकेटचा भारी शौक आहे. पण तो भारतीय संघ खेळत असलेला सामना कधीच लाइव्ह पाहत नाही. आपण टी. व्ही. समोर बसून लाइव्ह सामना पाहिला, तर भारतीय संघाचे गडी बाद होऊ लागतात, असा त्याचा समज आहे.

  • सिद्धीविनायक मंदिरात दीपिका पादुकोण जाते

आपला चित्रपट यशस्वी व्हावा म्हणून दरवेळी दीपिका पादुकोण, मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात जाते. देवासमोर नतमस्तक होणे, याला अंधश्रद्धा म्हणता येणार नाही. पण दीपिका, आपला चित्रपट प्रदर्शित होण्याआधी सिद्धीविनायकाला साकडे घालतेच.

  • सलमान घालतो फिरोजा ब्रेसलेट

बॉलिवूडमध्ये प्रचंड यश मिळविलेला सलमान खान प्रत्यक्ष जीवनात कमालीचा अंधश्रद्धाळू आहे. त्याच्या उजव्या मनगटात तुम्ही निळा खडा असलेले फिरोजा ब्रेसलेट पाहिले असेल. सलमानला हे ब्रेसलेट, त्याचे पिताजी सलीम खान यांनी दिले आहे. अन्‌ सलमान, आपल्या खुशालीसाठी ते सदैव मनगटात घालतो.

  • कतरिना कैफ अजमेरच्या शरीफ दर्गाला जाते

‘नमस्ते लंडन’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी कतरिना कैफ अजमेर येथील शरीप दर्ग्याला गेली होती. आणि तो चित्रपट चांगला यशस्वी झाला होता. तेव्हापासून कतरिनाची श्रद्धा या दर्ग्यावर बसली आणि आपला प्रत्येक चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी ती या शरीफ दर्ग्याला भेट देऊन चित्रपटाला यश मिळावं म्हणून साकडे घालते.

  • शाहरुख खानने मोटारींचे नंबर ५५५ ठेवले आहेत

माझा अंधश्रद्धेवर अजिबात विश्वास नाही, असं शाहरूख खान नेहमी बोलत असतो. पण तो न्यूमरॉलॉजीवर चांगलाच विसंबून आहे. या अंकज्योतिषावर त्याचा एवढा विश्वास आहे की, त्याने आपल्या सर्वच मोटारगाड्यांचे आकडे ५५५ असे ठेवले आहेत. एवढंच नव्हे तर मध्यंतरी आयपीएल मध्ये क्रिकेट खेळणारी कोलकाता नाईट रायडर्स ही टीम सारखी हरायला लागली. तेव्हा एका ज्योतिषाच्या सांगण्यावरून त्याने या टीमच्या खेळाडूंच्या टी शर्टचा रंग बैंगनी केला होता.

  • ज्योतिषाशिवाय एकता कपूरचं पान हलत नाही

छोट्या पडद्यावरील मालिकांची क्वीन समजली जाणारी एकता कपूर चांगलीच अंधश्रद्धाळू आहे. कोणतंही काम सुरू करण्याआधी ती ज्योतिषांचा सल्ला घेते. तिचा हा अंधविश्वास इतका बळावला आहे की शूटिंगची तारीख कोणती असावी आणि कोणत्या जागी ते सुरू करावं, याबाबत देखील ती ज्योतिषांवर अवलंबून असते. शिवाय तिच्या बोटात कितीतरी अंगठ्या आहेत. गळ्यात व मनगटात विविध प्रकारचे गंडेदोरे ती घालते.

  • आमीर खान चित्रपट डिसेंबरात प्रदर्शित करतो

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट देखील या अंधश्रद्धेत मागे नाही. डिसेंबर महिना  आपल्याला फार लकी आहे, अशी त्याची श्रद्धा आहे. त्यामुळे तो आपला दरेक चित्रपट डिसेंबर महिन्यात प्रदर्शित करतो.

  •  करण जोहरचे चित्रपट ‘क’ आद्याक्षराचे असतात

‘क’ या आद्याक्षरापासून सुरु होणारे चित्रपटाचे शीर्षक असेल तर तो यशस्वी होतो, अशी करण जोहरची धारणा आहे. म्हणूनच त्याच्या बऱ्याच चित्रपटाच्या शीर्षकाची आद्याक्षरं ‘क’ आहे. मी लहानपणी अंधविश्वास दाखवायचो, पण आता तो सोडला आहे, असंही तो एकीकडे म्हणतोय.