कोवळ्या वयातच लग्नाच्या बेडीत अडकलेल्या अभिनेत्...

कोवळ्या वयातच लग्नाच्या बेडीत अडकलेल्या अभिनेत्री : एक तर १६ वर्षांची होती… (Bollywood Actresses Who Got Married At a Young Age)

बॉलिवूडमध्ये काही अभिनेत्री अशा आहेत, ज्यांनी कोवळ्या वयातच लग्न केले होते, करिअरला चांगली सुरुवात झाली असतानाच त्यांनी हे उतावीळ कृत्य का केले? इतक्या लहान वयातच त्यांना लग्न करण्याची गरज का भासली? या अभिनेत्रींच्या लग्न-कथा आता तुम्हाला ऐकवत आहोत. त्यांच्या लग्नाचं वय पाहून तुम्हीही चकीत व्हाल…

भाग्यश्री

‘मैंने प्यार किया’ या सुपरहिट चित्रपटाची नायिका भाग्यश्रीला कोण ओळखत नाही? कारण या भाग्यश्रीने लवकरच आपल्या लग्नापायी बॉलिवूडचा निरोप घेतला होता. तिने ‘मैंने प्यार किया’ चित्रपटाच्या दुसऱ्याच वर्षी बिझनेसमन हिमालय दासानीशी लग्न केलं होतं. सांगण्याची गोष्ट म्हणजे भाग्यश्री व हिमालयचं प्रेमप्रकरण बरीच वर्षे चालू होतं. तिनं लग्न केलं तेव्हा ती फक्त १९ वर्षांची होती. करिअर आणि प्रेम यामध्ये तिनं प्रेमाची निवड केली. अन्‌ संसारात रमली.

डिंपल कापडिया

‘बॉबी’ या आपल्या पहिल्याच चित्रपटाने बॉलिवूडमध्ये खळबळ माजविणाऱ्या डिंपल कापडियाने सुपरस्टार राजेश खन्नाशी लग्न केलं. तेव्हा ती फक्त १६ वर्षांची होती. दोघांच्या वयात खूप अंतर होतं. तरी पण ते लग्न करून बसले. त्यांना दोन मुली झाल्या. नंतर मात्र त्यांच्यात मतभेद झाले, अन्‌ तिने राजेश खन्नापासून वेगळं राहायला सुरुवात केली. दोन्ही मुलींचे पालनपोषण डिंपलने केले. त्यांची मोठी मुलगी ट्विंकलने अक्षयकुमारशी लग्न केले.

दिव्या भारती

चित्रसृष्टीतली चुलबुली आणि गोड चेहऱ्याची अभिनेत्री दिव्या भारतीच्या स्मृती आजही कायम आहेत. बॉलिवूडमध्ये प्रवेश करताच दिव्या भारतीची गणना अभिनेत्रींमध्ये होऊ लागली. दिव्या भारतीने १८ व्या वर्षी निर्माता साजिद नाडियादवालाशी लग्न केले. मात्र लग्नानंतर वर्षभरातच तिचा मृत्यू झाला. इतक्या यशस्वी अभिनेत्रीने आपला जीव काय घालवला, याबाबत लोकांच्या मनात आजही शंका आहे. कारण तिनं या जगाचा लहान वयातच निरोप घेतल्याने प्रेक्षकांना भारी दुःख झाले.

उर्वशी ढोलकिया

‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतून कमोलिकाची भूमिका करून उर्वशी ढोलकिया नावारूपास आली. प्रेक्षक तर तिला आजही त्याच नावाने ओळखतात. त्यामध्ये उर्वशीने खलनायिका अशा ढंगात वठविली होती, की तिच्या खासगी जीवनात बरेच चढउतार आले. मिळालेल्या माहितीनुसार उर्वशीचे लग्न १५ व्या वर्षीच झाले होते. अन्‌ पुढच्याच वर्षी, म्हणजेच १६ व्या वर्षी ती सागर आणि क्षितीज या जुळ्या मुलांची आई झाली. एवढंच नव्हे तर उर्वशीने मोठ्या हिमतीने दोन्ही मुलांचे भरणपोषण केले. पण ती शुटिंगला जायची तेव्हा ही मुले लहान होती. त्यांच्या संगोपनासाठी उर्वशीने फार कष्ट उपसले. आज ती दोन्ही मुले मोठी झाली आहेत. हे सांगण्याचं कारण असं की लग्नानंतर दीड वर्षातच उर्वशी आपल्या पतीपासून वेगळी झाली होती.