बॉलिवूडमधील या अभिनेत्रींनी आई झाल्यानंतर केला ...

बॉलिवूडमधील या अभिनेत्रींनी आई झाल्यानंतर केला यशस्वी करियरचा त्याग (Bollywood Actresses Who Bid Goodbye To A Promising Career After Becoming Mother)

बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी यशोशिखरावर असताना आपल्या मुलांच्या संगोपनासाठी चित्रपटांतून ब्रेक घेतला. परंतु तरीही चाहत्यांच्या मनातील त्यांचं स्थान कायम आहे. पाहूया या अभिनेत्री कोण आहेत.

माधुरी दीक्षित

धक धक गर्ल माधुरी दीक्षित ही बराच काळ बॉलिवूडची नंबर वन अभिनेत्री राहिली आणि तिच्या फॅन्सची संख्याही प्रचंड आहे. परंतु लग्नानंतर आणि आई झाल्यानंतर माधुरीने बॉलिवूडचा निरोप घेतला होता. मुलं मोठी झाल्यानंतर आता माधुरीने चित्रपटांत कमबॅक केला आहे. सध्या ती अनेक डान्स शोज्‌ची परीक्षक आहे.

शर्मिला टॅगोर

६०-७० च्या दशकात शर्मिला टॅगोर बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री होती. परंतु लग्नानंतर मुलं झाली आणि शर्मिलाने अभिनयास रामराम ठोकला. शूटिंगच्या व्यस्त शेड्यूलमुळे आपण मुलांना वेळ देऊ शकत नाही हे लक्षात आल्यानंतर तिने आपले यशस्वी करिअर सोडून दिलं आणि पूर्णवेळ आई बनून मुलांचं संगोपन केलं.

काजोल

काजोलने आपल्या मुलांचं ज्या पद्धतीने संगोपन केलं आहे, ते कौतुकास्पद आहे. करियरमध्ये यशोशिखरावर असतानाच काजोलनं करिअरपेक्षा आपल्या मुलांच्या संगोपनास अधिक प्राधान्य दिलं. नंतर जेव्हा तिची मुलं शाळेत जाऊ लागली, तेव्हा तिनं चित्रपटात कमबॅक केलं आणि ब्रेकनंतरचं तिचं कमबॅकही धमाकेदार होतं.

ट्विंकल खन्ना

सुपरस्टार राजेश खन्नाची मुलगी आणि अक्षय कुमारची बायको ट्विंकल खन्नाने अनेक सुपरस्टार्स सोबत काम केलं आणि तिचं करिअर देखील व्यवस्थित सुरू होतं. तरीही अक्षयशी लग्न केल्यानंतर मुलांच्या पालनासाठी तिने स्वतःला चित्रपटांपासून दूर केलं आणि आपला संपूर्ण वेळ कुटुंबासाठी दिला.

ऐश्वर्या राय बच्चन

अभिषेक बच्चन सोबत लग्न झालं त्यावेळेस ऐश्वर्या अतिशय यशस्वी अभिनेत्री होती. तरीही आई झाल्यानंतर तिनं आपलं करिअर होल्डवर ठेवलं. चाहत्यांनी आग्रह करूनही आराध्या मोठी होईपर्यंत ऐश्वर्याने एकही चित्रपट स्वीकारला नव्हता. त्यानंतर तिनं कमबॅक करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु दुसऱ्या पर्वामध्ये तिला म्हणावं तसं यश मिळालं नाही.

नीतू सिंह

७०-८० त्या दशकातील अतिशय सुंदर आणि प्रभावी अभिनेत्री नीतू सिंह लहानपणीच चित्रसृष्टीत आली आणि २१ व्या वर्षी त्यांचं ऋषी कपूर यांच्यासोबत लग्न झालं. त्यानंतरही त्यांनी अनेक यशस्वी चित्रपटांत काम केलं. परंतु रणबीर कपूर आणि रिद्धिमा कपूर यांच्या जन्मानंतर त्यांनी बॉलिवूडपासून स्वतःला दूर ठेवलं. पुढे मुलं मोठी झाल्यानंतर नीतू सिंह यांनी कमबॅक केलं आणि आता अनेक चित्रपटांमध्ये त्यांचा सहभाग आहे.

सोनाली बेंद्रे

सोनाली बेंद्रेने देखील आपल्या मुलांच्या पालनासाठी आपलं यशस्वी करिअर मध्येच सोडून दिलं. गोल्डी बहलसोबत लग्न आणि मुलांच्या जन्मानंतर तिने बॉलिवूडपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. नंतर मुलं थोडी मोठी झाल्यावर तिने रिॲलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून काम केलं. तर काही चित्रपटांत कॅमियो रोल करण्यास तिने सुरुवात केली होती.

जेनेलिया डिसूजा

अतिशय सुंदर आणि क्यूट जेनेलिया डिसूजाचे आजही जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. अभिनेत्री म्हणूनही ती सगळ्यांची आवडती होती. २०१२ साली तिने रितेश देशमुख सोबत लग्न केलं आणि त्यानंतर ती दोन मुलांची आई बनली. आई झाल्यानंतर जेनेलिया कधीही चित्रपटांत दिसली नाही. ती आपल्या कुटुंबासह आनंदी आहे.