बॉलिवूडची तेजस्वी प्रकाश आता मराठी सिनेमात : ‘म...

बॉलिवूडची तेजस्वी प्रकाश आता मराठी सिनेमात : ‘मन कस्तुरी रे’ मधून तिची अभिनय बेर्डेशी जमली जोडी (Bollywood Actress Tejaswi Prakash Makes Debut In Marathi Film ‘Man kasturi Re’)

नवरात्री म्हटलं की नवचैतन्य, जोश, उल्हास. हेच सुंदर वातावरण अधिकच बहारदार आणि रंगमय करण्यासाठी मुंबई मुव्हिस स्टुडिओज्‌ घेऊन आले आहे ‘मन कस्तुरी रे’चे नवे पोस्टर. नवरात्रीच्या निमित्ताने हे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून यात तेजस्वी प्रकाश आणि अभिनय बेर्डे प्रेमाच्या रंगात दंग होऊन नाचताना दिसत आहेत. संकेत माने दिग्दर्शित ‘मन कस्तुरी रे’ हा चित्रपट येत्या ४ नोव्हेंबर रोजी सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांचा मराठी सिनेमांसाठीचा रस वाढत असतानाच तेजस्वी प्रकाश हिने ‘मन कस्तुरी रे’ या मराठी सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. यानिमित्ताने तेजस्वीने सोशल मीडियावर नवरात्रीच्या शुभेच्छा देत आपल्या या पोस्टरबाबत खूप उत्सुक असल्याचे सांगितले. तिचा हा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे.

मराठमोळ्या तेजस्वीची पहिल्यांदाच मराठी सिनेमातील दमदार झलक पाहायला सर्वच प्रेक्षकवर्ग आतुर असतानाच आता तेजस्वी प्रकाश आणि अभिनय बेर्डेचे नाचतानाचे एक जबरदस्त पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. पोस्टरमधील या दोघांची कमाल केमेस्ट्री प्रेक्षकांची सिनेमासाठीची उत्सुकता अधिकच वाढवत आहे. पोस्टरवरून ही एक सुंदर प्रेमकहाणी असल्याचे दिसत आहे. त्यामुळे यंदाच्या नवरात्रीत अभिनय आणि तेजस्वीच्या ‘मन कस्तुरी रे’ चा सुगंध सर्वत्र दरवळणार, हे नक्की!

नितीन केणी यांच्या नेतृत्वाखाली मुंबई मुव्ही स्टुडिओज प्रस्तुत, व्यंकट अत्तिली, मृत्यूंजय किचंबरे यांच्या आयएनइएनएस डायमेंशन एन्टरटेनमेंट ॲण्ड आर्ट्स निर्मित या चित्रपटाचे सहनिर्माते ड्रॅगन वॅाटर फिल्म्सचे निशीता केणी आणि करण कोंडे आहेत. वितरणाचे काम युएफओ सिने मीडिया नेटवर्कने पाहिले आहे.