अभिनेत्री दिया मिर्झाच्या हस्ते डॉ. मंजुळा पूजा...

अभिनेत्री दिया मिर्झाच्या हस्ते डॉ. मंजुळा पूजा श्रॉफ यांच्या पुस्तकाचे प्रकाशन (Bollywood Actress Dia Mirza Releases The Book ‘Success Mantras And Musings’ On The Life Of Edupreneur Dr. Manjula Pooja Shroff)

बॉलिवूडची अभिनेत्री, मॉडेल, निर्माती आणि सामाजिक कार्यकर्ती दिया मिर्झा हिने ‘सक्सेस मंत्राज्‌ ॲन्ड म्युजिंग्ज्‌’ या इंग्रजी पुस्तकाचे मुंबईत प्रकाशन केले. अहमदाबाद येथे कोलोरेक्स फाऊंडेशन या संस्थेतर्फे शैक्षणिक संस्थांची स्थापना व त्या यशस्वीरित्या चालविणाऱ्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंजुळा पूजा श्रॉफ यांच्या चढउतारांनी भरलेल्या जीवनाचे चित्रण करणारे हे पुस्तक आहे.

या संदर्भात दिया मिर्झा म्हणाली की, ‘अनेक समस्या जीवनात आल्या तरी धाडसी पावले उचलत वाटचाल करणाऱ्या डॉ. श्रॉफ या सर्वांसाठी प्रेरणा आहेत. यातील बराचसा मजकूर मला जवळचा वाटतो. त्यातील काही अनुभवांनी तर माझ्या मनाला स्पर्श केला आहे. आजकाल लोक पूर्ण पुस्तक वाचत नाहीत पण हे पुस्तक पूर्ण वाचावं असं आहे. एवढंच नव्हे तर कोणतेही पान उघडून वाचलं तरी तुम्हाला खिळवून ठेवेल.’ लाल गर्द साडी व लांब हाताचा ब्लाऊज परिधान केलेली दिया टवटवीत दिसत होती.

हे पुस्तक अहमदाबादच्या प्रसिद्ध पत्रकार अनुरिता राठोर जडेजा यांनी लिहिले असून त्यांनी डॉ. श्रॉफ यांच्याबाबत चकित करणारी माहिती दिली. डॉ. मंजुळा श्रॉफ या ओरिसाच्या राजघराण्यातील आहेत. तेथील इच्छापुरम येथील सुरंगी पॅलेस या राजमहालात त्यांचे बालपण लाडाकोडात गेले. तरीपण त्या स्वतःला सिद्ध करण्यासाठी राजमहालातून थेट अहमदाबाद येथील होस्टेलमध्ये आल्या व सर्वसामान्य स्त्रीसारखे जीवन जगत त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातून मुलांना घडविले. “त्यांच्या वेदना, त्यांच्या निवेदनातून मी अनुभवल्या. कोणत्याही खडतर प्रसंगात सदैव हसतमुख राहणे हा त्यांचा स्वभाव आहे. त्यांच्या वर्तनाने मला प्रेरणा मिळाली,” असेही अनुरिता यांनी सांगितले. “आपल्या प्रत्येकामध्ये एक आवाज दडलेला आहे. तो आपल्या अंतर्मनाचा आवाज असतो. तो मी ऐकला. खडतर जीवनाच्या वाटचालीत तुम्हीही तो ऐका. दिशा मिळेल,” असा संदेश डॉ. मंजुळा श्रॉफ यांनी या निमित्ताने तरुणाईला दिला.

“जे यश मी मिळवलं ते तुम्हीही मिळवू शकता… माझी जीवनयात्रा या पुस्तकाच्या पानापानांतून शब्दबद्ध झाली आहे, याचा मला खूप आनंद आहे,” असेही त्या म्हणाल्या. सदर पुस्तक वितस्ता पब्लिशिंगने प्रकाशित केले आहे.