बायकोला फसवून बहकलेले बॉलिवूडचे नवे-जुने अभिनेत...

बायकोला फसवून बहकलेले बॉलिवूडचे नवे-जुने अभिनेते (Bollywood Actors Who Cheated On Their Wives With Other Women But Luckily Got A Second Chance)

बॉलिवूडचे बरेच अभिनेते भ्रमर वृत्तीचे असतात. लग्नानंतर देखील ते दुसऱ्या स्त्रीशी भानगडी करतात. बायकोला फसवितात. मात्र बऱ्याचशा बायकांनी त्यांना ताळ्यावर आणून आपला संसार सावरला आहे. पाहूया असेच काही बहकलेले बॉलिवूडचे नवे-जुने अभिनेते –

दिलीप कुमार

दिलीप कुमार आणि सायरा बानू यांच्या प्रदीर्घ सांसारिक जीवनाचा आणि त्यांच्या प्रेमाचा आदर्श नेहमीच समोर ठेवला जातो. पण हेच दिलीपसाहेब, सायराशी लग्न झाल्यानंतरही बहकले होते. सायरा बानूने दिलीपकुमारशी निकाह लावला तेव्हा ती २२ वर्षांची होती, तर दिलीपसाहेब होते ४४ वर्षांचे. मात्र दिलीपकुमार आणि असमा या पाकिस्तानी महिलेचे प्रेमप्रकरण आणि दुसरे लग्न या बातमीमुळे सगळीकडे गोँधळ उडाला होता. मात्र हे दुसरं लग्न फार काळ टिकलं नाही. कारण असमा त्याला धोका देत होती. हे जाणून देखील सायरानं दिलीपसाहेबांची साथ सोडली नाही.

राज कपूर

शो मॅन राज कपूरचं लग्न त्याच्या १९ व्या वर्षीच झालं होतं. तेव्हा त्याची बायको कृष्णा हिचं वय होतं फक्त १६ वर्षं. या लग्नानंतर राज कपूरचं, नर्गिससोबत असलेलं प्रकरण सदैव चर्चेत राहिलं. एकत्र काम करत राहिल्यानं त्यांचं प्रेम जुळलं. राज-नर्गिस ९ वर्षे लिव्ह – इन- रिलेशनशिपमध्ये राहिले. तो विवाहित असल्याने नर्गिसशी लग्न करू शकला नाही. नंतर त्याचं नाव वैजयंती मालाशी देखील जोडलं गेलं. पण अखेरीस त्याला आपल्या संसारात परत यावं लागलं.

राज बब्बर

स्मिता पाटीलशी लग्न करून राज बब्बरने आपली बायको नादिराला घटस्फोट दिला. पण स्मिता अकाली मृत्यू पावली. तेव्हा राज बब्बर पुनश्च आपल्या पहिल्या पत्नीकडे परत गेला. अन्‌ नादिरानं त्याला स्वीकारलं.

आदित्य पंचोली

आदित्य पंचोली आणि कंगना रनौत यांचे प्रेमप्रकरण सगळ्यांना ठाऊक आहे. दिलेल्या मुलाखतीत कंगनाने जाहीर केलं होतं की, आदित्यने तिला कशी मारहाण केली होती आणि पोलिस स्टेशनात त्याच्याविरुद्ध तक्रार करून आपली सुटका करून घेतली होती. कंगनाशीच नव्हे, तर आदित्यचे नाव बऱ्याच मुलींशी जोडलेलं आहे. एवढं असून देखील त्याची बायको झरीना वहाबने त्याची साथ सोडली नाही.

मिथुन चक्रवर्ती

एके काळी बातम्या अशा होत्या की, मिथुन चक्रवर्ती आणि श्रीदेवी यांनी गुपचुप लग्न लावलं होतं. तेव्हा मिथुनचं लग्न झालं होतं. आणि त्याची पहिली बायको योगिता बाली त्याच्या समवेत राहत होती. त्याने योगिताला घटस्फोट काही दिला नाही हे बहुधा श्रीदेवीला रुचलं नसावं. तिनं कालांतरानं मिथुनशी संबंध तोडून टाकले.