बिनधास्त, डॅशिंग माधुरी पवारचा ग्लॅमरस् लूक (Bo...

बिनधास्त, डॅशिंग माधुरी पवारचा ग्लॅमरस् लूक (Bold And Dashing Madhuri Pawar In Stunning Glamorous Look)

रात्रीच्या वेळेस लागणाऱ्या ‘देवमाणूस’ या थरारक मालिकेची सांगता झाली. पण अनेक माणसांचे खून करणारा तोतया डॉक्टर देवी सिंह या पात्राची छाप व मालिकेचा थरार अद्याप प्रेक्षकांच्या मनात आहे. त्याचबरोबर या क्रूरकर्मा तोतयास अद्दल घडविणारी, डॅशिंग चंदा मालिकेच्या अखेरच्या भागांमध्ये आली. अन्‌ प्रेक्षकांच्या मनात रुतून बसली आहे. ‘चंदा कोणाचीच उधारी बाकी ठेवत नाही’, हा तिचा परवलीचा संवाद होता. ही भूमिका ठसकेबाज पद्धतीने साकार करणारी अभिनेत्री आहे, माधुरी पवार!

‘देवमाणूस’ मालिकेत या डॉक्टरला सगळेच घाबरत होते. अपवाद चंदाचा. ती त्याला पुरून उरली. माधुरी पवारने हे पात्र कमालीच्या आत्मविश्वासाने आणि जोरकसपणे सादर केलं. कोण आहे ही माधुरी? ती प्रत्यक्ष जीवनात कशी आहे?

या मालिकेच्या आधी माधुरी झी टी. व्ही. च्या ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमध्ये नंदिता वहिनी झाली होती. मात्र चंदाने तिला ओळख मिळवून दिली. अन्‌ ती आता घराघरात पोहचली आहे.

माधुरी ही साताऱ्याची राहणारी आहे. ती चांगली शिकलेली आहे. कोल्हापूरच्या के. आय. टी. कॉलेजातून तिने एम.बी.ए. केलं आहे. त्यात अगदी फर्स्ट क्लास मिळवला आहे. चंदाची भूमिका गाजवल्यानंतर तिला मराठी चित्रपटांच्या ऑफर्स मिळत आहेत. ‘नादखुळा’ या साँग अल्बममध्ये ती चमकली आहे. ‘गागरा’ ही वेब सिरीज्‌ आणि ‘फांजर’, ‘फौजदार’ हे तिचे आगामी चित्रपट आहेत. अभिजीत पानसे दिग्दर्शित एका वेब सिरीज्‌मध्ये ती प्रमुख भूमिकेत आहे, जी डिसेंबरात प्रदर्शित होईल.

माधुरीची भेट झाली, तेव्हा चंदाच्या भूमिकेबद्दल बोलणे अपरिहार्य होते. ती म्हणाली, “ही भूमिका स्पेशली डिझाइन केलेली होती. झी टी.व्ही. ने त्यासाठी माझी निवड केली, ते योग्यच झाले. ही चाकोरीबद्ध भूमिका नव्हती. चंदा साकारताना मला पूर्ण स्वातंत्र्य मिळालं होतं. पात्राचा बाज पाहता, मी ती अधिक खुलवत गेले. या भूमिकेने मला मोठा चाहतावर्ग मिळाला. विशेषतः लहान मुलांना हे पात्र खूपच आवडले होते. त्याची मला पदोपदी प्रचिती येते आहे. लहान मुले माझ्यावर खूप प्रेम करतात, याचे अनुभव मला येत आहेत.”

माधुरी उत्तम डान्सर आहे. लावणी या नृत्यप्रकारात ती राष्ट्रीय स्तरावरची सुवर्ण पदक विजेती आहे. झी युवा वाहिनीवरील ‘अप्सरा आली’ या रिॲलिटी शोची ती विजेती आहे.

माधुरी वर्णानं सावळी आहे. तरीही ती या क्षेत्रात पुढे आली आहे. या सावळ्या वर्णाचा अडसर तिला आला नाही का? या प्रश्नावर काहीही लपवाछपवी न करता माधुरी म्हणाली, “आला नं. या क्षेत्रात एवढ्या गोऱ्या, चिकन्या मुली काम करत असताना; सुरुवातीला काही लोकांनी रंगावरून मला नाके मुरडली होती. मलाही थोडा काळ या सावळ्या रंगामुळे न्यूनगंड आला होता. पण मी सातारा सौंदर्य स्पर्धेत विजेती ठरले, अन्‌ माझा आत्मविश्वास वाढला. सौंदर्याची परिभाषा वेगळी असल्याची मला जाणीव झाली. भगवान श्रीकृष्ण सावळे होते, तर तू कशाला कमीपणा बाळगतेस, असं कुणीतरी मला सांगितलं. ही तुलना मला प्रोत्साहन देणारी ठरली. अन्‌ आरशात बघताना माझ्यासारखी सुंदर कोणीच नाही, असे मला वाटू लागले…”

ही सावळी माधुरी, रुपेरी पडद्यावर, फोटोग्राफ्समध्ये अतिशय सुंदर दिसते. तिच्या रूपात गावरान ठसका आहे, अन्‌ शहरी गोडवा आहे. मराठी बरोबरच हिंदी चित्रसृष्टीत – मालिकेत तिला मैदान मारायचे आहे. मात्र तिने स्वतःला काही मर्यादा आखून घेतल्या आहेत. बिकिनी, स्वीमसूट पडद्यावर घालणार नाही. अंतर्वस्त्रांमध्ये फोटो देणार नाही. अर्धनग्न किंवा नग्न दृश्ये करणार नाही, असे निश्चय तिने केले आहेत. बिकिनी घालून भूमिका करण्याच्या ऑफर्स तिला आल्या होत्या. त्या तिने नाकारल्या आहेत. मात्र प्रणयप्रसंग रंगवायला अथवा चुंबन दृश्य द्यायला तिची हरकत नाहीये. अशा या बोल्ड, डॅशिंग अभिनेत्रीने ग्लॅमरस फोटोशूट करून घेतलं आहे. त्यात तिच्या अदा व रूपरंग खुलून दिसत आहे.

श्रीदेवी ही माधुरीची आदर्श अभिनेत्री आहे. श्रीदेवीचे सदमा, लम्हे असे सर्वच चित्रपट तिने पाहिले आहेत.