आमीर खानच्या दिवाळी जाहिरातीवरून वादंग : हिंदूं...

आमीर खानच्या दिवाळी जाहिरातीवरून वादंग : हिंदूंच्या भावना दुखावल्याची खासदाराची तक्रार (BJP MP Objects Amir Khan’s Diwali Ad, Calls It Anti Hindu )

आमीर खान हा तसा कुणाच्या अध्यात ना मध्यात असलेला कलाकार. पण कधी कधी वादाच्या भोवऱ्यात तो अडकतो. वर्ल्ड कप क्रिकेट सामन्यांमध्ये टेलिव्हिजनवर दाखविल्या जाणाऱ्या एका जाहिरातीत आमीर खानने भूमिका केली आहे. त्यामध्ये तो म्हणतो की, संघ जिंकला म्हणजे जल्लोश होईल, फटाके फोडाल… पण रस्त्यावर फोडू नका. सोसायटीच्या आवारात फोडा. कारण रस्ते हे मोटारींसाठी आहेत. फटाके फोडण्यासाठी नाहीत…

सदर जाहिरात सिएट टायर्सची आहे. त्यावर भाजपा खासदार अनंत कुमार हेगडे यांनी हरकत घेतली आहे. त्यांनी सिएट टायर्स कंपनीच्या एमडी./ सी. ई. ओ. यांना पत्र दिले आहे. त्यामध्ये ते म्हणतात, आपल्या जाहिरातीत आमीर खान, रस्त्यावर फटाके फोडू नका, असे सांगतो आहे, हे चांगलं आहे. पण यावर अन्य मुद्दे उपस्थित होतात. दर शुक्रवारी रस्त्यांवर नमाज पढले जातात. तेव्हा मुसलमानांकडून रस्ता बंद करण्याबाबत देखील एक जाहिरात करा ना!

१४ ऑक्टोबरला लिहिलेल्या पत्रात अनंत कुमार म्हणतात, नमाज पढण्याच्या निमित्ताने दर शुक्रवारी रस्ता बंद होणे, नित्याचे झाले आहे. त्यामुळे फायर ब्रिगेड आणि ॲम्बुलन्सना देखील अडथळा होतो. सर्वसामान्य लोकांना त्रास होतो. अपघाताचे धोके वाढतात.

मशिदींमधून लाऊड स्पीकरवरून जी अजान दिली जाते, त्याच्याने जवळपास राहणाऱ्या लोकांना, शाळेतल्या मुलांना त्रास होतो. ध्वनी प्रदूषण होते.

तुम्ही स्वतः हिंदू आहात तरी हिंदूंच्या भावना समजून घ्या. या जाहिरातीमुळे हिंदूंच्या मनात अशांती व राग निर्माण झाला आहे. तेव्हा त्यांच्या भावनांची कदर करा.

या जाहिरातीवरून लोकांनी आमीर खानला पुष्कळ ट्रोल केले आहे. सोशल मीडियावर आपला रोष व्यक्त केला आहे. दिवाळीचे फटाके दिसतात, पण रस्त्यावर नमाज पढणारे दिसत नाहीत का, असे प्रश्न विचारले आहेत.