चवीने नकोसा, गुणांनी हवासा कडुनिंब (Bitter By T...

चवीने नकोसा, गुणांनी हवासा कडुनिंब (Bitter By Test, But Useful For Health)

कडुनिंबाचा वृक्ष 8-10 मीटर उंच असतो. कडुनिंब पचाला हलका, चवीने कडु व तुरट असतो. कडुनिंब चवीने नकोसा वाटला तरी अनेक विकारात उपुक्त असतो. सध्या कोरोनाच्या विषाणूंचा संसर्ग होऊ नये या साठी आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्याचा सल्ला दिला जातो. आणि त्यासाठी ही कडुनिंब अतिशय उपयुक्त ठरत आहे. कडुनिंबाची पानं, फुलं, फळं, मूळ व खोड असे सर्वच भाग औषधी गुणांनी युक्त असतात. कडुनिंबाचे लाकूड बांधकामासाठी उपयुक्त असते. कारण त्याला कीड लागण्याची भीती नसते. शेतातील जमिनीत कडुनिंबाची झाडे लावण्याने जमिनीचा कस कायम राहतो, शिवाय जंतू संसर्गाला प्रतिबंध होऊ शकतो.

कडुनिबांच्या पानांचे उपयोग
– जखम होऊन जंतु संसर्ग झाला असला तर कडुनिंबाच्या पानांच्या काढ्याने जखम धुवून घ्यावी. नंतर कडुनिंबाची पानं मधासह वाटून लेप तयार करावा. हा लेप जखमेवर लावून त्यावर पट्टी बांधावी. काही दिवस रोज असं केल्याने हळूहळू जखम भरून येते.

– शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कडुनिंबाच्या पानांचा उपयोग होतो. कडुनिंबाच्या पानांचा रस खडीसाखरे बरोबर काही दिवस घेतल्याने कडकी कमी होते.
– आग होणार्‍या सुजेवर पानांचा लेप केल्याने लगेच बरे वाटते.
– नखुरडे झाले असता तुपावर परतलेला कडुनिंबाचा पाला बांधून ठेवण्याचा उपयोग होतो.
– स्नानाच्या पाण्यात कडुनिंबाच्या पाल्याचा काढा मिसळल्याने खाज कमी होण्यास मदत मिळते. त्याचप्रमाणे गोवर, कांजिण्या यांसारखे संसर्गजन्य रोगांमध्ये अंग पुसून घेण्यासाठी पानांचा काढा मिसळलेले पाणी वापरणे हितावह असते.
– विषबाधेवर, विशेषतः सापाच्या विषावर कडुनिंबाचा पालाअतिशय प्रभावी असतो.
– कडुनिंबाचा पाला वाटून तयार केलेला लहान सुपारीच्या आकाराचा गोळा, त्यात हिंग मिसळून काही दिवस नियमित सेवन करण्याने जंतांचा नाश होतो.
– कडूनिंबाची वाळलेली पाने धान्यात घातल्याने धान्याला कीड किंवा अळी लागत नाही.

कडुनिंबाच्या फळं- फुलांचा उपयोग
– कडुनिंबाची फुलं वाळवून तयार केलेले चूर्ण रोज रात्री गरम पाण्याबरोबर घेण्याने शौचास साफ होते व शक्ती वाढण्यास मदत होते.
– कडुनिंबाची फुलं वाटून तयार केलेला लेप पापणी व डोळ्यांच्या आसपास लावण्याने नेत्र रोग बरे होतात.

– तापावर कडुनिंबाच्या सालीचा काढा घेण्याची पद्धत आहे. ताप येणे बंद झाले तरी नंतर चांगली भूक लागेपर्यंत व तापामुळे आलेली अशक्तता भरून येईपर्यंत असा काढा घेत राहणं हितावह असतं.
– कडुनिंबाच्या काडीने दात घासल्यास दात जंतुविरहित होतात आणि किडत नाहीत. दातांना बळकटी येते.
– कडुनिंबाच्या फळांचा रस काढून, त्याचा वापर तेल काढण्यासाठी केला जातो. त्या तेलाचा उपयोग सांधे दुखी कमी होण्यासाठी करतात; त्याचबरोबर केसांची वाढ उत्तम होते.
– कडुनिंबाच्या रसामुळे मधुमेह रोग नियंत्रित करता येतो. कडूनिंबाची पान जखमेवर कुटून लावल्याने जखम लवकर बरी होते.
– कडूनिंबाची पाने, खोड हे पित्तनाशक आहे. रोज सकाळी कडूनिंबाचा काड्या चघळल्यास पित्त कमी होते.
– कडुनिंब हे जंतुनाशक तसेच रक्त शुद्ध करते, थकवा दूर करण्यासाठी, मूत्र विकारावर, ताप कमी करण्यासाठी कडुनिंबाच्यारसाचा उपयोग केला जातो.
– कडुनिंब हे खोकला, कफ या आजारांवर गुणकारी आहे.
– कडुनिंबाची एक काडी रोज खाल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते.