माऊलीचे जन्मग्राम आपेगाव (Birthplace Of Sant Dh...

माऊलीचे जन्मग्राम आपेगाव (Birthplace Of Sant Dhyaneshwar Is The Best Choice In Religious Tourism)

 • सुधीर सेवेकर
  संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांची भावंडे जिथे जन्मली आणि जिथे त्यांचे दीर्घकाळ वास्तव्यही होते त्या आपेगाव नामक तीर्थक्षेत्राची ही सफर भाविक पर्यटकांना नक्कीच आवडेल.
  संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांची भावंडे-निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई ही जिथे जन्मली, त्या गावाचे नाव आहे आपेगाव. आपेगाव हे छोटेसे खेडेगाव, पैठण तालुक्यात (जिल्हा-औरंगाबाद) येते. ते पैठण नगरीपासून केवळ पंधराएक किलोमीटरवर पैठण – पाचोड या राज्य मार्गावर गोदातटी वसलेले आहे. ज्ञानेश्वरांशी निगडीत नेवासे (ता. अहमदनगर), आळंदी (जि. पुणे), पंढरपूर (जि. सोलापूर) ही गावे सर्वांना माहिती असतात. दरवर्षी या गावांना लाख्खो भाविक भेट देत असतात. त्या तुलनेत आपेगाव तेवढे प्रसिद्ध नाही आणि म्हणून आपेगावास भेट देणार्‍या भक्तगणांची संख्या कमी आहे. जेमतेम तीनेक हजार लोकवस्तीचे हे गाव अलीकडच्या काळात मात्र चांगले नावारूपाला येत आहे. कारण आपेगावात जाण्यासाठीचा रस्ता आता खूप चांगला झाला आहे. हा पैठण-पाचोड असा राज्यमार्ग आहे. तसेच या गावी आता आवश्यक त्या सेवासुविधाही उपलब्ध झालेल्या आहेत. म्हणून दरवर्षी भेट देणार्‍या भाविकांच्या संख्येत वाढ होते आहे.

 • ज्ञानेश्वरादी भावंडे ज्या वाड्यात जन्मली, वाढली, तो त्यांचा पिढीजात वाडा ह.भ.प. अध्यात्मविवेकी गुरुवर्य विष्णूमहाराज कोल्हापूरकर यांच्या पुढाकारातून आणि सातत्यपूर्ण प्रयत्नातून आता एका तीर्थक्षेत्रात रूपांतरित झालेला आहे. विष्णू महाराज कोल्हापूरकर यांचे गुरू ह.भ.प. रंगनाथ महाराज परभणीकर यांनी त्यांना आज्ञा केली की आपेगावला जाऊन, तिथे राहून ज्ञानेश्वरांच्या जन्मस्थळाचा जीर्णोद्धार व विकास करावा. त्याप्रमाणे विष्णू महाराज कामाला लागले. काही दशकांपूर्वीपर्यंत ज्ञानेश्वरांचे जन्मस्थान कोणते? आपेगाव की आळंदी? याबाबत वाद होता. परंतु विष्णू महाराज यांनी नागपूरच्या हायकोर्टात सबळ पुराव्यानिशी हे सिद्ध केले की ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांची भावंडे यांचा जन्म आणि बालपण हे आपेगावात गेलेले आहे. आता ज्ञानेश्वरांच्या जन्मस्थानाबाबतचा कोणताही संभ्रम राहिलेला नाही.
 • जावळे घराणे
  ज्ञानेश्वर महाराजांच्या घराण्याचे नाव जावळे. त्यांचे मूळपुरुष हरिहरपंत जावळे यांच्याकडे आपेगाव आणि आसपासच्या अन्य काही गावाचे कुलकर्णीपण वंशपरंपरेने चालत आलेले. म्हणून ते कुलकर्णी असेही आडनाव लावत. ज्ञानेश्वरांचे पणजोबा त्र्यंबकपंत जावळे, आजोबा गोविंदपंत जावळे ही सगळी ईश्वरी साक्षात्कार झालेली सत्शील आध्यात्मिक पुरुष मंडळी. याच घराण्यातील विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई या दांपत्याच्या पोटी श्रावण वद्य 8 शके 1197 गुरुवारी ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगावात झाला. त्याआधी जवळपास दोन वर्षे ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथांचा जन्म झालेला. तर कनिष्ठ बंधू सोपानदेव यांचा जन्म शके 1199 मध्ये आणि भगिनी मुक्ताबाई यांचा जन्म अश्विन शुद्ध प्रतिपदा शके 1201 शुक्रवारी झाला. अशाप्रकारे या चारी भावंडांचे जन्मस्थान आपेगाव हेच आहे. एकूणच हे जावळे घराणे हरिभक्त पारायण व आध्यात्मिक वळणाचे. देवगिरीचे किल्लेदार स्वामी जनार्दनपंत हेही ज्ञानेश्वरांच्या घराण्याचे भक्त. ज्ञानेश्वरांचे जीवनकार्य आणि त्यांच्या 21 वर्षे 3 महिने 5 दिवसांच्या आयुष्याचे चरित्र सर्वांना माहिती आहेच.
  ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद बोलविला वगैरे तथाकथित चमत्काराचे स्थळ पैठण हे आहे. तर ज्ञानेश्वरीचे कथन आणि सच्चिदानंद बाबांद्वारे तिचे लेखन या घटना नेवासे येथे घडलेल्या आहेत. ह्या स्थळांविषयीही मी स्वतंत्रपणे लिहिणार आहेच.
  29 ऑगस्ट 1975 रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मा. ना. शंकरराव चव्हाण, महसूलमंत्री डॉ. रफीक झकेरिया, शिक्षण राज्यमंत्री रामनाथजी पांडे व अन्य राज्यकर्त्यांच्या उपस्थितीत आणि वारकरी परंपरेतील ह.भ.प. धारुरकरशास्त्री, सुपेकरशास्त्री, सोनपेठकरशास्त्री, करवीर पीठाधिपती जगद्गुरू शंकराचार्य. ह.भ.प. एकनाथ महाराज देगलूकर, खंदारकर महाराज, आदी संतमहंतांच्या उपस्थितीत श्री ज्ञानेशाचा जन्म सप्तशताब्दी सोहळा श्रीक्षेत्र आपेगाव मुक्कामी थाटात आणि आनंदात साजरा झाला. त्याला हजारो वारकरी भाविक जमले होते तसेच तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचाही शुभ संदेश आला होता. या घटनेनंतर आपेगावचे महत्त्व वाढू लागले. विष्णूमहाराज कोल्हापूरकरांनंतर त्यांच्या वारसांनीही आपेगावच्या या जन्मस्थळाच्या विकासासाठी प्रयत्नांचे सातत्य चालूच ठेवले.
 • मंदिर
  जावळे घराण्याच्या या जुन्या वाड्याच्या जागी आज ज्ञानेशाचे एक सुरेख दगडी मंदिर पारंपरिक मंदिर रचनाशास्त्रानुसार तज्ञांद्वारे उभे केलेले आहे. आत साडेतीन फुटांची ज्ञानेशाची आसनस्थ मूर्ती आहे. ती दुर्मीळ अशा हस्तिदंती रंगाच्या इटालियन संगमरवरी दगडाची बनवलेली आहे. मंदिरापाठीमागूनच दक्षिण गंगा अर्थातच गोदावरी नदी वाहते. तीवर सुरेख घाट बांधण्याचे काम प्रगतिपथावर आहे. भाविकांसाठी धर्मशाळा आहे. विद्यार्थ्यांना पखवाज वादन, कीर्तन, योगाभ्यास, पारंपरिक व शालेय शिक्षणाची मोफत सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सोय आहे. अन्नछत्रालय, गोशाळा याही सुविधा आहेत.
  माऊली अर्थात ज्ञानेश्वरांच्या मूर्तींचे वैशिष्ट्य असे आहे की, एका मूर्तीत भाविकांना माऊली-बाळकृष्ण आणि पांडुरंग अशा तिन्ही रूपांचे दर्शन होते. शिवाय मंदिररचनेचे स्थापत्य शास्त्रीय वैशिष्ट्य असे आहे की, बरोब्बर कार्तिक वद्य त्रयोदशीस सूर्यकिरण माऊलीच्या चरणावर पडतात! हे बघण्यासाठी त्या दिवशी शेकडो भाविक आवर्जून या मंदिरात येतात. गतवर्षी त्या दिवशी संपूर्ण आपेगावावर ढगाळ पावसाळी वातावरण होते. सूर्यदर्शनही होत नव्हते. यंदा सूर्यकिरणे माऊलीच्या चरणावर पडणार नाहीत अशी कुजबुज सुरू झाली होती. पण जणू चमत्कारच घडला. अनपेक्षितपणे आकाशातील ढग बाजूला सरले आणि पाच मिनिटांकरता सूर्यकिरणे माऊलीच्या चरणी पडली! भाविकांचे मन आनंदाने आणि डोळे अश्रूंनी भरून आले! मंदिराच्या प्रांगणातच ज्ञानेश्वरांचे पूर्वज त्र्यंबकपंतांची समाधीही आहे. आषाढी एकादशीस इथून दरवर्षी दोन पालख्या पंढरपुरास जातात – एक असते ज्ञानेश्वर माऊलीची पालखी आणि दुसरी त्यांच्या पूर्वजांची पालखी. कारण पालखी वा वारी परंपरा ज्ञानेश्वरांच्या पूर्वजांनी सुरू केलेली आहे. यंदाचे हे सातशे सेहेचाळीसावे पालखी वर्ष आहे.
  आपेगावच्या पवित्र भूमीच्या दर्शनाने भाविकांना विलक्षण संतोषाची, शांतीसमाधानाची अनुभूती निश्चित होते. तेव्हा भाविकांनी देहू, आळंदी, पंढरपूर, नेवासे, पैठण या स्थळांसोबतचे आपेगावालाही अवश्य यावे. आणि माऊली जन्मस्थानाचे दर्शन घ्यावे!