महाराष्ट्राचं भरतपूर कुंभारगाव! (Bird Sanctuary...

महाराष्ट्राचं भरतपूर कुंभारगाव! (Bird Sanctuary of Maharashtra)

कुंभारगाव माहीत नसलेला पक्षिप्रेमी किंवा बर्डिंग करणारा फोटोग्राफर किमान महाराष्ट्रात तरी नसावा. उजनी जलाशयाचा समृद्ध किनारा लाभलेलं आणि पुण्यापासून अवघ्या दोन तासांवर असलेलं कुंभारगाव म्हणजे पक्षिप्रेमींसाठी महाराष्ट्रातलं जणू भरतपूरच! बर्डिंगसाठी एक मोठी आनंद पर्वणीचं!
कुंभारगावला (भिगवणला) येणारे रोहित (फ्लेमिंगो) आणि इतरही स्थलांतरित पक्षांबद्दल कधीपासून मी खूप काय काय ऐकून आणि वाचून होतो. पैठणला येणार्‍या पक्षांशी मी गेल्या डिसेंबरलाच गट्टी करून आलो होतो. पण कुंभारगावला जायचा योग मात्र जुळून यायचा होता. आणि आज कॉलेज मित्र, रवी देशमुखनेच अचानक त्याबद्दल विचारल्यानंतर मलाही हा चान्स सोडायचा नव्हता.

कुंभारगाव माहीत नसलेला पक्षिप्रेमी किंवा बर्डिंग करणारा फोटोग्राफर किमान महाराष्ट्रात तरी नसावा. उजनी जलाशयाचा समृद्ध किनारा लाभलेलं आणि पुण्यापासून अवघ्या दोन तासांवर असलेलं कुंभारगाव म्हणजे पक्षिप्रेमींसाठी महाराष्ट्रातलं जणू भरतपूरच! बर्डिंगसाठी एक मोठी आनंद पर्वणीचं! ठरल्यानुसार शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता आम्ही कुंभारगावातल्या ‘क्रांती फ्लेमिंगो पॉइंट’ला पोहोचलो होतो. गाडीतून खाली उतरताच उन्हाचा दाह किती जीवघेणा आहे,हे लक्षात आलं.
झाडाखाली सावली बघून रवीने गाडी लावली. एकाला एक लागून आठ खोल्या समोर दिसत होत्या. त्यापुढे मोठं अंगण. सात-आठ झाडं आजूबाजूला. गावातलीच चार-पाच तरणी-ताठी पोरं सावलीत एकीकडे गप्पा करत बसली होती. त्यातच दत्ताभाऊ आणि नितीन डोळेही होते. दोघं मिळून कुंभारगावात बर्ड गाइडचं काम करतात. दोघांच्या हाताखाली अभिषेक, राहुल, छोटा राहुल अशी जवळ जवळ आठ-दहा जणांची टीमच आहे. येणार्‍या जाणार्‍या पर्यटकांना बोटीने फिरवून आणायचं आणि पक्षांबद्दल माहिती पुरवायची, हे काम ही पोरं करतात. दत्ताभाऊ स्वत: एक चांगले पक्षिमित्र आहेत. बाकी पोरंही त्यांच्या मुशीतच हळूहळू तयार होत आहेत.

त्यांच्या घरापासून एखाद कोसावर उजनी जलाशय नजरेस येत होता. दुपारचा एक वाजला होता आणि एवढ्या उन्हात लगेचच बर्डिंगसाठी जाण्यात काहीच अर्थ नव्हता. त्यामुळे थोडा आराम करून आम्ही तीन वाजता बाहेर पडलो ते खास धाविक या पक्षांसाठी! हा पक्षी सहसा मुरमाळ लाल जमिनीमध्ये असतो. ते ठिकाण कुंभारगावापासून जवळ जवळ वीसेक किलोमीटर अंतरावर पळसदेव शिवाराच्या जरा पुढे होतं. बाभळीची खूप सारी झाडं असलेला परिसर होता तो! बर्ड गाइड अभिषेक आमच्यासोबत होताच. अर्धा तास आम्ही शांततेनं तिथं वॉच केलं; पण धाविकचा कुठंच पत्ता नव्हता. आमचा उत्साह दम तोडायला लागलाच होता की, एवढ्यात स्टेअरिंगवर असलेला रवी एकदम बोलून उठला, “समोर बघ चिंकारा!” आम्ही दोघंही बघतो तर काय, तीन सुकुमार चिंकारे सहा-सातशे फुटांवरून मस्त रमत गमत चालले होते. बहुधा ती चिंकार्‍याची फॅमिली असावी. ते अवचित दिसल्याच्या आनंदात गाडीतूनच मिळेल ती छायाचित्रं आम्ही क्लिक केली. रवीची व्रोटा (गाडी) नवीन असल्याचा फायदा आम्हाला झाला होता. गाडीचा आवाज जवळ जवळ नव्हताच! इतक्या लांब आल्याचं चीज झालं होतं. होणारी संध्याकाळ आपल्याला यापेक्षाही मोठी मेजवानी देणार यात शंकाच नव्हती.

लाजवाब रोहित
पुढचा स्टॉप होतं उजनी जलाशय. साडेचार वाजले होते. बोटीत बसलो. आज आधी रोहित पक्षाला कॅमेर्‍यात कैद करायचं आमच्या डोक्यात होतं. त्यानुसार अभिषेकने जलाशयात दूरवर दिसणार्‍या रोहित पक्षांच्या समूहाच्या दिशेने बोट न्यायला सुरुवात केली. शेकडो रोहितांची ती चहल-पहल लांबूनही लाजवाब दिसत होती. उजनी जलाशयाने सफेद फुलांची शुभ्र माळच गळ्यात घातली आहे की काय, असं वाटत होतं. नकळत कविश्रेष्ठ वा.रा. कांत यांचं, ‘बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात, भेट आपुली स्मरते काय तू मनात…’, हे विरह काव्य मला आठवून गेलं आणि शब्दांचे ते चळ कुण्या दुरावलेल्या जिवलगाच्या आठवणींनी मन भिजवू लागलं. मिनिट-दोन मिनिटंच! कारण जलाशयात इतरही काही स्थलांतरित पक्षी, छोटा शराटी, चिखली तुतारी, ठिपकेवाला तुतवार, गळाबंद पाणलव, शेकाट्या, वारकरी असे सगळेच कसे मिळून मिसळून मुक्त संचार करताना आसपास दिसत होते. त्याचं ते एकत्रितपणे विहार करणं मनाला सुखावून जात होतं.

जसं जसं आम्ही पुढे पुढे जात होतो नावांची जंत्री वाढतच होती. काय पाहू अन् किती पाहू? असं आम्हाला झालेलं. रवीसारखा निष्णात फोटोग्राफर सोबतीला असल्यानं मलाही एक वेगळंच स्फुरण चढलं होतं. छान छान फोटोंनी मनाच्या तारा कशा झंकारल्या जात होत्या. यात भरीस भर म्हणून ढळणारी सांजही रोहित पक्षाबरोबर क्लिक करता आल्याने मन कसं तृप्त तृप्त झालं होतं. पश्‍चिमेशी हितगुज करत समोरच्या पहाडांवर लुप्त होणार्‍या आणि उजनी जलाशयाला आपल्या सहस्र किरणांनी सोनेरी रूप बहाल करणार्‍या भानूचं, शांत-शीतल रूप त्या वेळी फारच विलोभनीय दिसत होतं. धरती आणि अंबराला जोडून ठेवणारा चंद्रासारखाच हाही एक दुवाच! दुपारी अंगाची काहिली करणारा भानू हाच होता ना? असा प्रश्‍न पडावा इतकं त्याचं जलाशयातलं बिंब मनोहारी दिसत होतं. आपल्या चैतन्याने अवघा निसर्ग भारून टाकणार्‍या भानूचं ते रूप बोटीतून खाली उतरल्यावरही आम्ही टिपतच होतो.
दुसर्‍या दिवशी पुलाच्या पलीकडल्या बाजूने फोटोग्राफी करायचं ठरवून सकाळी साडेसहालाच आम्ही पुन्हा जलाशयाकडे निघालो. अभिषेकने आज विरुद्ध बाजूच्या किनार्‍यावरून बोट घेतली. फार लांब जायचंच नव्हतं. सात-आठ मिनिटांतच आम्ही समोरच्या किनार्‍याला जमलेल्या पक्षांच्या मेळ्यापर्यंत पोहोचलो होतो. बघतो तर काय; इथंही काळ्या डोक्याचा कुरव, राखी बगळा, चक्रवाक, चित्रबलाक, सुरमा, कांडेसर, भुवई बदक, कंठेरी चिखल्या, मुग्धबलाक बर्‍याच पक्षांची शाळा भरली होती. बाजूलाच दोन-तीन मच्छी पकडणार्‍या बोटीही होत्या. छोट्याशा तराफ्यावर बसूनही काहींचं मासे पकडणं चालू होतं. पाण्यातले मासे पकडण्यासाठी झेपावणारे पक्षी पाहण्याची मजा काही औरच होती. फार तीक्ष्ण नजर असते पक्षांची! त्यांची अ‍ॅक्शन फोटोग्राफी करताना खरा कस लागतो छायाचित्रकाराचा! बरेचदा चांगले स्नॅपही मिस होतात. फोटोग्राफी ही दृश्य कला आहे, यात चॅलेंजही तेवढेच आहे! मात्र एखादा अप्रतिम शॉट मिळाल्यानंतरचं समाधान कुबेराच्या संपत्तीपेक्षाही नक्कीच जास्त आहे. हे सगळं चालू असतानाच आमची नजर सारखं कुणाला तरी शोधत होती. आणि पुढच्या काही मिनिटांतच ती माझ्या नजरेस पडली… सागरी घार! हो… तीच होती ती!! दिसल्यावरही बराच वेळ हुलकावणी देत राहिली. मात्र एक वेळ अशी आलीच की, ती स्वत:च जवळ आली, एका बगळ्यावर झपटलीही! पण बगळाही मोठा वस्ताद! बगळ्याने तिची डाळ काही शिजू दिली नाही.

नाव सार्थ करणारा चित्रबलाक
त्यानंतर फारच जवळून बघता आला तो चित्रबलाक. मोठ्ठी लांब सोनेरी चोच, डोक्याचा भाग नारिंगी-गुलाबी, पंखांवर आणि पोटाखालच्या भागावर मेहंदी चितारल्यासारखी काळी नक्षी, शेपटीच्या भागाकडे विविधरंगी चट्टे-पट्टे! पायालाही गुलाबी रंगाची झाक. आकर्षक अशा त्याच्या रंगांमुळे मला तो फ्लेमिंगो इतकाच आवडला. आणि त्याचं चित्रबलाक हे नाव किती सार्थ आहे, हेही लक्षात आलं. राखी बगळाही काही कमी देखणा नव्हता. सोनेरी काजळ घातल्यासारख्या डोळ्यांभोवती काळ्या कडा, फिकट गुलाबी चोच, पांढर्‍या डोक्यावर छोट्याशा तुर्‍यासारखी मागे लोंबलेली काळी शेंडी! जिराफासारखी उंच मान, मानेवर जपानी भाषेत सुलेखन केल्यासारखी नक्षी आणि सिक्स पॅक कमावलेल्या एखाद्या बॉडी बिल्डरसारखे पीळदार स्नायू… छान उठावदार वाटला मला त्याचा तो लूक!
पक्षांच्या सुमधुर सहवासानं मन भरलं होतं; पण किनार्‍यालगतचं हिरवं गवताळ पठार आम्हाला केव्हापासून खुणावत होतं. सकाळी बोटीत बसायच्या आधी काही छोटे पक्षी तिथं आमच्या नजरेत आले होते. बोटीतून उतरलो तशी आपसूकच आमची पावलं त्या पठाराकडे वळली. पिवळा धोबी आणि पाणभिंगरीचे काही चांगले फोटो तिथं आम्हाला मिळाले. नंतर गाडीतूनच पाणभिंगरी या पक्षाचे मीलनाचे दोन दुर्मीळ असे लाँग शॉट मला मिळाले. रवी स्टेअरिंगवर असल्याने त्याच्याकडून मात्र ते मिस झाले. छायाचित्रणातलं क्षणाक्षणाचं महत्त्व पुन्हा एकदा जाणवून गेलं!

कुंभारगावतून निघता निघता डोक्यात आलं, एवढे सगळे स्थलांतरित पक्षी इथं येतात आणि त्यांना पाहण्यासाठी हजारो पर्यटक या कुंभारगावाला भेट देतात. म्हणूनच दत्ताभाऊ आणि नितीनसारख्या गावातल्या कितीतरी तरुणांची पोटापाण्याची सोय होते, त्यांना रोजीरोटी मिळते. दत्ताभाऊ आजही अभिमानाने सांगतात ही त्यांच्या गुरुजींची देन आहे. निसर्ग माणसाला वेगवेगळ्या रूपात निव्वळ देतच आलाय. इथंही तोच देतोय, इथं येणार्‍या या खगांच्या रूपात! दरवर्षी हजारोंच्या संख्येनं भरणार्‍या खगांच्या या मेळ्यामुळेच हे कुंभारगाव, महाराष्ट्राचं भरतपूर म्हटलं जातं ते काही उगाच नाही!
– मनोहर मंडवाले