बिपाशा बासु आणि करण सिंह ग्रोवरने सोशल मीडियावर...

बिपाशा बासु आणि करण सिंह ग्रोवरने सोशल मीडियावर केली आई-बाबा होणार असल्याची घोषणा, शेअर केले बेबी बंपचे फोटो (Bipasha Basu-Karan Singh Grover Announce Her First Pregnancy With Maternity Shoot, See Photos)

काही दिवसांपासून सोशल मीडियावर बिपाशा बासु गरोदर असल्याच्या चर्चा होत होत्या पण बिपाशा आणि करण दोघांपैकी कुणीही याबाबत अधिकृत माहिती दिली नव्हती. अखेर बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) आणि करण सिंग ग्रोव्हर (Karan Singh Grover) यांनी ते आई-बाबा होणार असल्याची घोषणा केली आहे. दोघांनीही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन बिपाशाच्या बेबी बंपचा फोटो शेयर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

बिपाशा आणि करन यांच्या लग्नाला ६ वर्षे झाली आहेत. आता ते पालक होणार असल्याने हल्लीच त्यांनी मॅटरनिटी फोटोशूट करून घेतले आहे. या मॅटरनिटी शूटमध्ये बिपाशा आपलं बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत बिपाशाने एक कॅप्शन दिली आहे, त्यात तिने लिहिलंय, ‘नवी वेळ, नवी सुरुवात आणि नवा प्रकाश आमच्या आयुष्यामध्ये आला आहे. आम्ही दोघांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली आणि तेव्हापासून आम्ही फक्त दोघंच आहोत. एकमेकांवरच खूप प्रेम करायचं हे थोडं आता अयोग्य वाटलं. म्हणून आता लवकरच आम्ही दोनाचे तीन होणार आहोत. लवकरच आमचं बाळ आमच्याबरोबर असेल आणि आमचा आनंद द्विगुणीत होईल.’

पुढे आपल्या चाहत्यांचे आभार मानत ती म्हणते, ‘तुम्ही आमच्यावर बिनशर्त प्रेम केल्याबद्दल, तुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद, त्या कायमच आमच्या सोबत असतील. आमच्या जीवनाचा एक भाग बनल्याबद्दल धन्यवाद.. लवकरच आमच्यासोबत एक जीव जोडला जाणार आहे ते म्हणजे आमचं बाळ.. दुर्गा दुर्गा’ तिच्या या शब्दांवरून बिपाशाला झालेला आनंद आपल्या लक्षात येतो.

या सुंदर फोटोंमध्ये बिपाशाने सफेद रंगाचे शर्ट आणि करणने सेफद शर्ट आणि काळी पॅन्ट घातली आहे. एका फोटोमध्ये करण बिपाशाच्या बेबी बंपचे चुंबन घेताना दिसत आहे.

बिपाशा आणि करण यांच्या या फोटोंना सेलिब्रिटींनीदेखील चांगलाच प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. नीलम कोठारीने, ‘सो अमेझिंग’ असं लिहिलं आहे, तर राजीव अडतिए याने, ‘Omggggggggggg… मला खूप आनंद झाला आहे,’ असे म्हटले आहे.

बिपाशा आणि करण दोघांच्याही चेहऱ्यावर आई-बाबा होणार असल्याचा आनंद ओसंडून वाहत आहे. बिपाशा आणि करणची भेट २०१५ मध्ये ‘अलोन’ च्या सेटवर झाली. आणि इथेच दोघांमध्ये आधी मैत्री, त्यानंतर प्रेमाचं नातं फुललं. २०१६ मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली होती. आणि लग्नानंतर सहा वर्षांनी बिपाशा आणि करणने आई बाबा होण्याचा निर्णय घेतला असून अखेर आज ही गोड बातमी दिली.