आपला मराठी बिग बॉस… परत दार उघडणार (Bigg ...

आपला मराठी बिग बॉस… परत दार उघडणार (Bigg Boss Marathi 3 To Launch Soon)

कायम वादातीत तरीही प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचवणारा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे बिग बॉस. बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा पुन्हा एकदा ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याकडेच सोपवण्यात आली आहे.

छोट्या पडद्यावर जेवढ्या आवडीने कौटुंबिक मालिका पाहिल्या जातात, त्याहीपेक्षा जास्त आवडीने ‘बिग बॉस’ हा कार्यक्रम पाहिला जातो. या कार्यक्रमातील स्पर्धकांचे वागणे, बोलणे, एकमेकांवर ते करत असलेली कुरघोडी, कोण बरोबर कोण चूक यावर प्रेक्षकही तितक्याच तावातावाने चर्चा करताना दिसतात. त्यामुळे या कार्यक्रमाचं एक पर्व संपलं की पुढील कार्यक्रम कधी सुरू होतोय, याची उत्सुकता प्रेक्षकांना असते. प्रेक्षकांची ही उत्सुकता आता लवकरच संपणार आहे. कारण बिग बॉस हिंदी पाठोपाठ आता बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाचीही घोषणा करण्यात आली आहे.

दार परत उघडणार आणि एकच आवाज घुमणार

कलर्स मराठीने इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘बिग बॉस मराठी ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगत व्हिडीओ देखील शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले की, ‘दार परत उघडणार आणि एकच आवाज घुमणार, कारण येतोय बिग बॉस ३. लवकरच कलर्स मराठीवर…’ त्यामुळे आता हा कार्यक्रम लवकरच सुरू होणार हे नक्की झाले आहे.

‘बिग बॉस मराठी’ चे पहिले पर्व १५ एप्रिल २०१८ रोजी प्रसारित झाले होते. या पहिल्या पर्वामध्ये अभिनेत्री मेघा धाडे विजयी ठरली होती. त्यानंतर दुसऱ्या पर्वामध्ये शिव ठाकरेने बाजी मारत ‘बिग बॉस मराठी २’ चा किताब जिंकला होता. बिग बॉस मराठीची ही दोन्ही पर्व प्रचंड गाजली होती. प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाल्याने या कार्यक्रमाचे तिसरे पर्व येणार हे नक्की होते. परंतु ते कधी याची उत्सुकता सर्वांनाच होती. ‘बिग बॉस मराठी ३’ची अधिकृत घोषणा झाल्यामुळे ते कधी पासून प्रसारित होणार, कोण कोण स्पर्धक त्यात सहभागी होणार, त्यांना काय काय टास्क दिले जाणार याकडे आता सर्व प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

महेश मांजेरकरच करणार सूत्रसंचालन

अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी देखील ‘बिग बॉस मराठी ३’ संदर्भात एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी ‘त्याच्यासोबत मी परत येतोय… तुम्ही तयार रहा’ असे म्हटले आहे. त्यामुळे ‘बिग बॉस मराठी ३’चे सूत्रसंचालन पुन्हा एकदा महेश मांजरेकर करणार आहेत, हे नक्की झाले आहे.