‘बिग बॉस १६’मध्ये सलमान खानच्या जाग...

‘बिग बॉस १६’मध्ये सलमान खानच्या जागी ‘ही’ सेलिब्रिटी करणार शोचं सूत्रसंचालन (Bigg Boss 16 Not Karan Johar But This Popular Celebrity To Replace Salman Khan For Some Weeks In The Show)

बिग बॉस १६ ची लोकप्रियता आणि वाढत्या टीआरपीमुळे निर्मात्यांनी यंदाचा सिझन चार आठवड्यांनी वाढवला आहे. त्यामुळे जानेवारीत संपणारा हा शो आता १२ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

बिग बॉस हा शो सुरू झाल्यापासून ते आत्ता सोळाव्या पर्वाचेही सूत्रसंचालन बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात सलमान खान करत आहे. छोट्या पडद्यावरील सर्वांत वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय असा हा शो १०५ दिवस सुरू असतो. या शोसाठी आधीच स्पर्धक आणि सूत्रसंचालकासोबत एक करार केला जातो. या करारानुसार स्पर्धक आणि सूत्रसंचालकाला १०५ दिवसांत शोसाठी वेळ देणं बंधनकारक असतं. मात्र बिग बॉस १६ ची लोकप्रियता आणि वाढत्या टीआरपीमुळे निर्मात्यांनी यंदाचा सिझन चार आठवड्यांनी वाढवला आहे. त्यामुळे जानेवारीत संपणारा हा शो आता १२ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

बिग बॉसचा शो आणखी काही दिवसांनी वाढवल्याने होस्ट सलमान खान त्याचा अधिक वेळ या शोला देऊ शकत नसल्याचं कळतंय. चित्रपटांच्या शूटिंगमुळे तो काही दिवस सूत्रसंचालन करू शकणार नाही. याच कारणामुळे शोमध्ये काही दिवस सलमानची जागा दुसरी सेलिब्रिटी घेणार आहे. मात्र बिग बॉसचा ग्रँड फिनाले होस्ट करण्यासाठी सलमान पुन्हा एकदा मंचावर येणार आहे.

सलमानच्या जागी सूत्रसंचालनासाठी याआधी निर्माता-दिग्दर्शक करण जोहरचं नाव घेतलं जात होतं. मध्यंतरीच्या काळात जेव्हा सलमान आजारी होता, तेव्हा करणने या शोच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली होती. मात्र आता पुन्हा एकदा करण नव्हे तर दुसरी सेलिब्रिटी सूत्रसंचालन करणार असल्याचं समजतंय. या सेलिब्रिटीचं नाव आहे फराह खान. बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफ, दिग्दर्शिका आणि साजिद खानची बहीण फराह खान सलमानची जागा घेणार असल्याचं कळतंय. मात्र याबद्दल अद्याप वाहिनीकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

याआधी फराह खानने बिग बॉसमध्ये सूत्रसंचालन केलं होतं. तिचा भाऊ साजिद खान बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यामुळे तिचा मार्गही मोकळा झाला आहे. फराह खान केवळ बिग बॉस १६ च नाही तर बिग बॉस ओटीटी सिझन २ चंही सूत्रसंचालन करणार असल्याची माहिती आहे.