‘बिग बॉस’च्या घरात भारती सिंगच्या छ...

‘बिग बॉस’च्या घरात भारती सिंगच्या छोट्याशा गोलाची धमाकेदार एन्ट्री, चाहत्यांना मिळेल मनोरंजनाचा जबरदस्त डोस (Bigg Boss 16 Bharti Singh And Haarsh Limbachiyaa’s Son Gola Meets Host Salman Khan; Bhaijaan Gifts Him His Trademark Bracelet)

‘बिग बॉस १६’चा आगामी भाग जबरदस्त असणार आहे, जिथे दर्शकांना मनोरंजनाचा जबरदस्त डोस मिळणार आहे. चाहत्यांना हा शो खूप आवडतो.  सध्या ‘बिग बॉस १६’ शेवटच्या टप्प्यावर आहे. त्यामुळे स्पर्धकांमध्ये तसेच दर्शकांमध्येही या कार्यक्रमाबद्दलची उत्सुकता वाढत आहे. त्यातच आता बिग बॉसच्या घरात टीव्हीची सुप्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंगची ग्रँड एन्ट्री होणार आहे.  नेहमीप्रमाणे ती तिच्या विनोदाने घरातील सदस्यांना गुदगुल्या करेल.

बिग बॉसच्या या नव्या एपिसोडमध्ये कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचियासोबतच आणखी एक खास पाहुणा आला आहे. या खास पाहुण्याने प्रेक्षकांसोबतच सलमानचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. हा चिमुकला पाहुणा अर्थातच भारती आणि हर्षचा मुलगा लक्ष्य अर्थात गोला आहे.

भारतीने तिचा मुलगा लक्ष्यला सलमान खानच्या भेटीला आणलं आहे. बिग बॉसच्या मंचावर आल्यानंतर भारतीला सलमानने दिलेलं जुनं वचन आठवतं आणि ती म्हणते, “सलमान भाईची सगळी वचनं लक्षात आहेत. त्यांनी मला सांगितलं होतं की, माझ्या मुलाला ते लाँच करतील”.

यानंतर भारती गोलाला स्टेजवर आणते आणि लक्ष्यला उचलून थकल्याने ती लगेच त्याला सलमानच्या हातात सोपवते आणि सलमान त्याला उचलून घेतो.

यावेळी लक्ष्यला सलमान त्याचं मौल्यवान ब्रेसलेट भेट म्हणून देतो आणि हर्षलाही लोहढीची खास भेट देतो. सलमानच्या हातात एक ब्रेसलेट नेहमीच पाहिलं जातं. ते ब्रेसलेट सलमानसाठी खूप खास असल्याचं म्हटलं जातं. यानंतर भारती मस्करीत सलमानला म्हणते, “तुझं पनवलेचं फार्महाऊस तू कधी रिकामं करणार आहेस?” हे ऐकताच सलमानसह सर्वजण हसू लागतात.

या शोमध्ये भारती एका कागदावर सलमानची सहीसुद्धा घेते. “तुझं पनवेलचं फार्महाऊस आता तू माझ्या मुलाच्या नावावर केलं आहेस” असं म्हणत ती तो कागद दाखवते. सलमान आणि भारती यांच्यातील मस्करीचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही हसू अनावर झालं आहे.

(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)