बिग बॉस १५ फिनाले : बिग बॉसच्या अंतिम सोहळ्याची...

बिग बॉस १५ फिनाले : बिग बॉसच्या अंतिम सोहळ्याची विजेता बनली देखणी तेजस्वी प्रकाश (Bigg Boss 15 Winner: Tejasswi Prakash Lifts The Trophy)

छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा सर्वाधिक लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त समजला जाणारा शो आहे. सध्या बिग बॉस हिंदीचे १५ वे पर्व सुरु होते. यंदाच्या १५ व्या पर्वातील बिग बॉस हिंदीचा विजेता कोण ठरणार? यासाठीची दर्शकांची उत्सुकता कालपर्यंत शिगेला पोहोचली होती.  अंतिम निर्णयाकडे अनेकांचे लक्ष लागले होते. अखेर काल बिग बॉस हिंदीच्या १५ व्या पर्वाच्या विजेत्याची घोषणा झाली. देखणी अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ही यंदाच्या बिग बॉस हिंदीच्या १५ व्या पर्वाची विजेती ठरली. तेजस्वीला बिग बॉसची ट्रॉफी आणि ४० लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले आहेत.

काल बिग बॉसच्या १५ व्या पर्वाच्या महाअंतिम सोहळा रंगला. बिग बॉसच्या या पर्वात सहभागी झालेले सर्व स्पर्धक या कार्यक्रमावेळी उपस्थित होते. यावेळी सर्वच स्पर्धकांनी नृत्याविष्कार करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. बिग बॉसच्या टॉप ६ मध्ये तेजस्वी प्रकाश, शमिता शेट्टी, करण कुंद्रा, रश्मी देसाई, प्रतीक सहजपाल आणि निशांत भट्ट हे स्पर्धक पाहायला मिळाले. त्यातून तेजस्वी प्रकाश, प्रतीक सहजपाल आणि करण कुंद्रा हे तिघेजण टॉप ३ स्पर्धक ठरले.

यातील प्रतीक आणि तेजस्वीने टॉप २ मध्ये प्रवेश केला. त्यानंतर अखेर सूत्रसंचालक अभिनेता सलमान खानने तेजस्वी प्रकाशला यंदाच्या बिग बॉसची विजेती म्हणून घोषित केले. तर प्रतीक हा या शोचा रनरअप ठरला. काल रात्री उशिरा बिग बॉसच्या यंदाच्या पर्वाच्या विजेत्याचे नाव जाहीर करण्यात आले. बिग बॉस १५ ची ट्रॉफी जिंकल्यानंतर तेजस्वी प्रकाशने कुटुंब आणि चाहत्यांचे आभार मानले. त्यासोबत तिने करण कुंद्राचेही आभार मानले.

तसं पाहिलं तर यंदा हिंदी बिग बॉसच्या १५ व्या पर्वास प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे टीआरपीच्या स्पर्धेत बिग बॉस मागे पडल्याचे पाहायला मिळाले. तसेत या शोला रंजक बनवण्यासाठी अनेक ट्विस्टही पाहायला मिळाले.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम