बिग बॉस १५ फेम तेजस्वी प्रकाशचं मराठीत पदार्पण...

बिग बॉस १५ फेम तेजस्वी प्रकाशचं मराठीत पदार्पण; अभिनय बेर्डेसोबत करणार काम (Bigg boss 15 fame Tejasswi Prakash debut in Marathi Film starring opposite Abhinay Berde)

हिंदी मालिकेतील लोकप्रिय चेहरा आणि बिग बॉस १५ ची विजेती अभिनेत्री तेजस्वी प्रकाश मराठी सिनेमातून पदार्पण करत आहे. तिच्यासोबत मराठी सिनेमातील चॉकलेट बॉय अभिनय बेर्डे नायक म्हणून झळकणार आहे. अभिनय आणि तेजस्वी ही फ्रेश जोडी असलेल्या ‘मन कस्तुरी रे’ या सिनेमाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये समुद्र किनारी स्कुटरवर अभिनय आणि तेजस्वी यांचा रोमँटिक अंदाज दिसून येत आहे आणि त्यांचा हा लूक नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

“जसा पोस्टरचा लूक फ्रेश आहे, तसाच फ्रेश लूक संपूर्ण सिनेमात पाहायला मिळणार आहे. हा एक युथफुल सिनेमा आहे”, असं दिग्दर्शक संकेत माने यांनी सांगितले आहे. संकेत माने यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच सिनेमा आहे.

तेजस्वी प्रकाशनं बिग बॉस संपल्यानंतर लगेचच एकता कपूर निर्मित ‘नागिन ६’ च्या शूटिंगला सुरुवात केली होती हे अनेकांना माहीत असेल पण आता तिचा पहिला-वहिला मराठी सिनेमा भेटीस येतोय हे ऐकून मात्र निश्चितच आश्चर्य वाटेल. कारण मराठी असूनही तिनं आतापर्यंत अनेक हिंदी मालिकांत काम केलेलं आहे. मराठमोळ्या तेजस्विनीने ‘संस्कार- धरोहर अपनों की’, ‘स्वरागिनी- जोडे रिश्तों के सूर’, ‘पहरेदार पिया की’, ‘सिलसिला बदलते रिश्तों का’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. बिग बॉस १५ मुळे तिला सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली. तेजस्वी अचानक मराठी सिनेमात दिसणार यामुळे आता जोरदार चर्चा रंगली आहे. तर ती सध्या काय करते, अशी ही आशिकी आणि रम्पाटनंतर अभिनयच्या नव्या रोमँटिक सिनेमाची त्याच्या चाहत्यांना उत्सुकता आहे. लॉकडाऊन नंतरचा अभिनयचाही हा पहिलाच चित्रपट आहे.

तेजस्वीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘मन कस्तुरी रे’ या सिनेमाचा पोस्टर शेअर केला आहे. यावर तिचा बॉयफ्रेंड करणने कमेंट करत सिनेमासाठी उत्सुक असल्याचं लिहिलं. लवकरच या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख समोर येईल. इमेन्स डायमेन्शन एंटरटेन्मेंट अॅन्ड आर्टस, वेंकट आर. अट्टिली आणि मृत्यूंजय किचंबरे यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. प्रेमाची एक अनोखी कहाणी मांडणाऱ्या या सिनेमाचे संपूर्ण चित्रीकरण मुंबईत झाले आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम