‘मुलगी झाली हो’ मालिकेत साजिरी आणि ...

‘मुलगी झाली हो’ मालिकेत साजिरी आणि शौनकच्या लग्नाची धामधूम (Big Fat Wedding In ‘Mulagi Zaali Ho’ Serial)

‘मुलगी झाली हो’ या स्टार प्रवाहवरील मालिकेत लवकरच प्रेक्षकांना साजिरी आणि शौनक यांच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळणार आहे. साजिरी-शौनकला आशीर्वाद देण्यासाठी स्टार प्रवाहच्या कुटुंबातील कलाकार आणि झिम्मा सिनेमाच्या टीमची उपस्थिती असल्याने हा लग्नसोहळा रंगतदार असणार आहे.

अनेक संकटांचा सामना केल्यानंतर अखेर साजिरी आणि शौनक विवाहबंधनात अडकणार आहेत. मालिकेतल्या या लग्नसोहळ्यासाठी साजिरी म्हणजेच अभिनेत्री दिव्या पुगांवकर खूपच उत्सुक आहे. लहानपणापासून ज्याचं स्वप्न पाहिलं त्या शौनकशी विवाह होत असल्यामुळे तिचं स्वप्न पूर्ण होणार आहे. या विवाहसोहळ्यासाठी साजिरीचा लूक खास डिझाईन करण्यात आला आहे.

मेहंदी, संगीत, हळद आणि लग्नातला लूक फायनल होईपर्यंत बऱ्याच लूक टेस्ट घ्याव्या लागल्या आहेत. नववधूच्या रुपात स्वत:ला पाहिल्यानंतर दिव्याला खरंच तिचं लग्न होतंय असं वाटत असल्याचं तिनं म्हटलं आहे. त्यामुळे मी आणि मुलगी झाली हो मालिकेची संपूर्ण टीम या खास विवाहसोहळ्यासाठी अतिशय उत्सुक आहोत.

गेल्या अनेक दिवसांपासून दर्शकांनाही साजिरी आणि शौनकच्या लग्नाची उत्सुकता होती. साजिरी आणि शौनकला आशीर्वाद देण्यासाठी स्वाभिमान, सहकुटुंब सहपरिवार, आई कुठे काय करते, फुलाला सुगंध मातीचा आणि सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकांमधील कलाकार खास हजेरी लावणार आहेत. यासोबतच मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादचे जज सचिन पिळगांवकर आणि सूत्रसंचालक सिद्धार्थ चांदेकर आणि अवनी जोशी यांची देखील या लग्नसोहळ्याला खास उपस्थिती असणार आहे. स्टार प्रवाहच्या परिवारासोबतच लवकरच भेटीला येणाऱ्या झिम्मा सिनेमाच्या टीमनेही खास हजेरी लावत साजिरी आणि शौनकला त्यांच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. रविवार २१ नोव्हेंबरला दुपारी १ आणि सायंकाळी ७ वाजता साजिरी-शौनकचा विवाहसोहळा प्रेक्षकांना पहायला मिळेल.