बिग बॉसमधून बाहेर पडलेल्या रोहितला माफ करण्याबा...

बिग बॉसमधून बाहेर पडलेल्या रोहितला माफ करण्याबाबत रुचिरा जाधवने केले मोठे विधान(Big Boss Fame Ruchira Jadhav Gives Big Statement About Forgiveness Of Her Boyfriend Rohit Shinde)

सध्या मराठी बिग बॉस सीजन 4 ची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. यावेळी या शोमध्ये अभिनेत्री रुचिरा जाधव आणि डॉ. रोहित शिंदे हे खऱ्या आयुष्यातील कपल सहभागी झाले होते. प्रेक्षकांकडूनही या जोडीला खूप पसंती मिळाली. मात्र शेवटी हा असा खेळ आहे ज्यात  भांडण-तंटे प्रचंड प्रमाणात होतात. खेळाच्या सुरुवातीला गोडी गुलाबीने चाललेला रोहित-रुचिराचा प्रवास अचानक कुठेतरी वादाच्या कचाट्यात सापडला. त्यांच्यातील मतभेद वाढत गेले.

आणि अशातच अचानक अनपेक्षितपणे रुचिरा खेळातून बाद झाली. रुचिराने घराबाहेर पडल्यावर आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन रोहितला अनफॉलो केले. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये बराच गदारोळ झाला.

पुढे काही दिवसांनी रोहितही खेळातून बाद झाल्यामुळे घराबाहेर आला. दोघेही घराबाहेर येऊनही एकमेकांना भेटले नाहीत. किंवा त्यांच्यासंबधी कोणतीच पोस्ट न आल्याने एका चाहत्याने कमेंटमध्ये रुचिराला समजवण्याचा प्रयत्न केला. त्यात त्याने लिहिले की, “लव्ह यू रुचिरा… तू वैचारिक मुलगी आहे, याची मला जाणीव आहे. तू रोहितमुळे दुखावली गेलीस, पण तो एक खेळ होता असा विचार करुन हे सर्व सोडून दे. रोहितबरोबर आयुष्यातील नवीन प्रवासाला सुरुवात कर. काही गोष्टी गुंतागुंतीच्या करण्यापेक्षा त्याला माफ कर. तो असा पुन्हा कधीही वागणार नाही. तो त्याच्या चुकांमधून नक्कीच शिकेल. तू या गोष्टींचा सकारात्मक पद्धतीने विचार करशील याची मला खात्री आहे”

चाहत्याच्या या कमेंटवर रुचिरानेही आपले मत व्यक्त करत त्याला सडेतोड उत्तर दिले. ती म्हणाली, “तुम्हाला माझ्याबद्दल वाटणारी काळजी आणि प्रेमासाठी तुमचे खरंच खूप आभार. एखाद्याला माफ करणं ही खरच खूप मोठी गोष्ट असते. माफ करणं म्हणजे खऱ्या प्रेमाचे लक्षण मानले जाते. यात एका माणसाला त्याची चूक समजते आणि तो माफी मागतो, तर दुसरा व्यक्ती हा त्याला प्रेमापोटी माफ करतो. पण जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याची चूक मान्यच नसेल तर किंवा त्याने काय चूक केलीय हेच त्याला माहिती नसेल तर अशावेळी काय करावे?

बरं जे घडलंय त्याची तीव्रता जे दिसलंय त्यापेक्षा १०० पटीने जास्त आहे २४ तासांमधील १ तास भाग दाखवला जातो. बरं माझ्यासाठी ३ वर्षात समजलेला लाईफ पार्टनर विरुद्ध ६ आठवड्यात दिसलेला नवा चेहरा इतकं साधं वाटणारं कठीण गणित आहे. बरं ते सोडवण्यासाठी मी समर्थ आहे. पण एक स्त्री म्हणून जे अडथळे येतात ते दुर्दैवाने कोणत्याही स्त्रीला चुकलेले नाहीत. पण मी एवढंच म्हणेन की स्वाभिमान कधीच सोडायचा नाही. आपण जर सत्याच्या बाजून असू तर कधी डगमगायचं सुद्धा नाही. आपण नेहमीच स्वत:वर विश्वास ठेवायला हवा आणि त्याबरोबर देवावरही. बाकी माझा कान्हा सांगतो तसं… हर बात समझाना सदा संभव नही सखी, समय समझायेगा… आणि माझ्या त्यावर विश्वास आहे”, असे तिने म्हटले आहे.

रुचिराची ही कमेंट सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहेत. तसेच रोहित-रुचिराचे चाहतेही त्यांनी एकत्र येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.