‘बिग बॉस’ मधील सोनाली पाटील आहे पिस्तूल गर्ल! (...

‘बिग बॉस’ मधील सोनाली पाटील आहे पिस्तूल गर्ल! (Big Boss Contestant Sonali Patil Is Real Life Pistol Girl)

‘वैजू नंबर १’ या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली वैजयंती म्हणजेच आपली लाडकी सोनाली पाटील सध्या बिगबॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात तुफान कल्ला करत आहे ! बिगबॉस मराठीच्या घरातील तिचा वावर आणि खेळातील सहभाग पाहता तिने अल्पावधीतच लोकांच्या मनात आपले स्थान निश्चित केले आहे. सोनाली खऱ्या आयुष्यात राज्यपातळीवर नेमबाजी स्पर्धेत यशस्वी कामगिरी केलेली एक पिस्तूल गर्ल आहे. सोनाली जर अभिनेत्री झाली नसती. तर नक्कीच एक यशस्वी नेमबाज बनली असती असे तिचे निकटवर्तीय सांगतात.

उत्कृष्ट नेमबाज होण्यासाठी सोनालीने खूप संघर्ष केला आहे. कोल्हापूरमधील गोंडोली गावातील शेतकरी कुटुंबात वाढलेल्या सोनालीला नेमबाजीच्या सरावासाठी पिस्तूलची आवश्यकता होती. मात्र, घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे पिस्तूल खरेदी करणे शक्य नव्हते. तसेच ज्या ट्रेनिंग सेंटरमध्ये ती नेमबाजीचा सराव करत होती, तिथे देखील तिला पिस्तूल चालवण्यासाठी अतिरिक्त वेळ उपलब्ध होत नव्हता. नेमबाजीमध्ये सर्वप्रथम पिस्तूलचे वजन हाताळता येणं गरजेचं असतं, कारण पिस्तूलचे वजन १ किलोग्रॅमहून अधिक असल्यामुळे, पिस्तूल चालवताना त्याचा हातासोबत समतोल आवश्यक असतो. सोनालीला हे चांगलेच ठाऊक होते. त्यामुळे पिस्तूलच्या वजनाचा दगड हातात धरून ठेवत, तिने आपली होल्डिंग कॅपेसिटी वाढवली. ज्यामुळे ट्रेनिंग दरम्यान सोनालीला अगदी चपखलपणे पिस्तूल घेऊन इतरांच्या तुलनेत अधिक पेलेट मारणे शक्य झाले.

पूर्वतयारी आणि योग्य अंमलबजावणीच्या जोरावर सोनालीने अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवल्या. प्रतिकूल परिस्थितीमधून योग्य मार्ग काढून लक्ष्य साधता येते, हे तिने सिद्ध करून दाखवले. सोनालीची हीच जिद्द आणि चिकाटी पुढे तिला यशस्वी अभिनेत्री बनण्यापर्यंत घेऊन गेली.

अलिकडेच संपलेल्या ‘देवमाणूस’ या मालिकेतही शेवटी शेवटी येऊनही तिने चांगली बाजी मारली. छोटी तरीही महत्त्वपूर्ण भूमिका तिच्या वाट्याला आली अन्‌ तिने ती यशस्वीरित्या निभावली. आपल्या घरापासून, नातलगांपासून दूर राहावं लागल्यानंतर बिग बॉसच्या घरातील अगदी दुसऱ्याच दिवशी सोनाली आपल्या वडिलांच्या आठवणीने भावूक झाली होती. सोनालीचे वडिल हयात नाहीत. तिचा अभिनयतक्षेत्रातील प्रवास सुरू झालेला पाहण्यासाठी ते नव्हते, याबाबतची खंत सोनालीने व्यक्त केली होती. मात्र आता ती बिगबॉस मराठीच्या घरात बऱ्यापैकी रुळलेली दिसते. प्रत्येक टास्कला ती जिद्दीने आणि चिकाटीने सामोरे जाताना दिसते. येथील तिचा संघर्ष तिला विजेतेपदापर्यंत पोहोचवतो का ते वेळच ठरवेल.