कोविड सहाय्यता निधीबाबत अमिताभ बच्चनची स्पष्टोक...

कोविड सहाय्यता निधीबाबत अमिताभ बच्चनची स्पष्टोक्ती : ‘मला पैसे मागायला लाज वाटते’ (Big B On Raising Covid-19 Relief Funds ‘It’s Embarrassing To Ask For Donations’)

करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी काही लोक आपापल्या परीने मदतीचा हात पुढे करत आहेत. बॉलिवूड कलाकारांनी त्यात पुढाकार घेतला आहे. सलमान खान, अक्षयकुमार, सोनू सूद हे कलाकार लोकांना गरजेच्या वस्तू पुरवत आहेत. तर अनुष्का शर्मा, प्रियंका चोप्रा अशा कलाकारांनी गरजूंच्या मदतीसाठी सहाय्यता निधी अभियान सुरू केले आहे. बिग बी अमिताभ बच्चन देखील करोनाग्रस्त आणि गरजू लोकांची होताहोईस्तो मदत करत आहेत. मात्र देणगीच्या मुद्यावरून त्याने जे उद्‌गार काढले आहेत, त्याबद्दल लोक त्याची खूपच तारीफ करत आहेत.

मी विचारलं नाही… मी दिलं…

कोविड – १९ च्या संदर्भात जी काही मदत चालली आहे, त्यामध्ये करत असलेल्या प्रयत्नांचे ताजे वृत्त तो नियमितपणे देत आहे. आपण लोकांची कशा प्रकारे मदत करत आहोत, ते ब्लॉगवरून त्याने लिहिले. त्याचबरोबर या सहाय्यता निधीसाठी मी लोकांची मदत मागत नाही, असं लिहून तो म्हणतो, ‘मदतीसाठी निधी गोळा करण्याचे काम निश्चितच प्रशंसनीय आहे. पण मी हे कधीच करणार नाही. कारण मला पैसे मागायला लाज वाटते. मर्यादित साधनांद्वारे जे शक्य आहे, ते मी करतो आहे. मी माझे व्यक्तीगत पैसे दान केले आहेत. ते अभियानाद्वारे जेवढे पैसे जमले असतील, त्याच्या जवळपास आहेत. मी विचारत बसलो नाही… मी दिलं.’ आतापावेतो आपण २५ कोटी रुपये एकट्याने दान केले आहेत, असे अमिताभने सांगितले.

जिथे शक्य असेल, तिथे मी देतो…

अमिताभने पुढे असं लिहिलं आहे की, ‘माझे या दृष्टीने प्रयत्न आणि केलेले दान याबाबत मी ब्लॉग पोस्ट वर लोकांनी माझी तारीफ करावी म्हणून लिहित नसतो. तर त्याच्याने मी लोकांना आश्वस्त करू इच्छितो की, खरोखरीच माझी मदत लोकांपर्यंत पोहचत आहे. इथे केवळ पोकळ आश्वासने दिली जात नसून जिथे शक्य असेल तिथे मी देतो… माझी साधने मर्यादित आहेत… पण कुणाकडून धनाची मागणी करणे मला लज्जास्पद वाटते.’

सामाजिक हिताच्या जाहिरातींसाठी मी पैसे मागितले नाहीत

अमिताभने पुढे हेही स्पष्ट केलं की, सामाजिक हिताशी संबंधी ज्या जाहिरातपटात मी काम केले, त्याबद्दल मी काहीच मानधन मागितले नाही. नजरचुकीने जर असं काही घडलं असेल, तर मी माफी मागतो.

कोविड मदत निधीमध्ये काही दिले नाही म्हणून ट्रोलर्सनी त्याला लक्ष केले…

बिग बी ने कोविड मदत निधीमध्ये काही दान दिलं नाही, म्हणून गेल्या काही दिवसांपासून त्याला ट्रोल केले जात होते. माझा बोलण्यावर विश्वास नाही, असं म्हणत अमिताभने ट्रोलर्सना उत्तर दिले आहे. तरी पण कदाचित या ट्रोलर्सना उत्तर देण्यासाठी म्हणूनच अमिताभने आपल्या ब्लॉगवर, पहिल्यांदाच आपण कोविड निधीसाठी काय दान केले, त्याची माहिती दिली असावी.
अमिताभची ही कृती त्याचे चाहते व हितचिंतकांना खूपच आवडली आहे. अन्‌ त्याने जे पाऊल उचलले आहे, त्याची स्तुती करत आहेत.