सहस्त्रचंद्रदर्शनाच्या निमित्ताने महानायक अमिता...

सहस्त्रचंद्रदर्शनाच्या निमित्ताने महानायक अमिताभ बच्चन यांचे अभिष्टचिंतन : स्वतःबद्दल शेअर केलेले विचार मनन करण्याजोगे (Big B Amitabh Bachchan Criticises His Own Image On 80th Birthday)

“छबी किंवा इमेज या शब्दाचा मी तिरस्कार करतो. कुठल्याही अभिनेत्याची एखादी विशिष्ट प्रतिमा व्हावी, असं मला अजिबात वाटत नाही. लोक म्हणतात, असं व्हायला हवं. मला तसं वाटत नाही. मला जे काम मिळेल, ते योग्य पद्धतीने केलं जावं याकडे माझं लक्ष असतं. एखादी प्रतिमा कलाकाराची बनलीच, तर ती त्याची सर्वात मोठी दुर्बलता ठरते…” हे उद्‌गार आहेत महानायक अमिताभ बच्चन यांचे. काही वर्षांपूर्वी त्यांनी ‘लोकसत्ता’मध्ये स्वतःचे जे विचार प्रकट केले होते, त्याचा हा अंश.

ते पुढे म्हणतात, “पडद्यावर तुम्ही मला कितीतरी अशक्य गोष्टी करताना पाहिलं असेल. वीस जणांना मारताना, धावताना किंवा काहीही भन्नाट करताना, जे प्रत्यक्ष जीवनात मी कधीच करू शकत नाही.”

रोमॅन्टिक हिरो ते ॲन्ग्री यंग मॅन आणि आता जगावेगळ्या चरित्र भूमिका असा अमिताभ यांचा रुपेरी पडद्यावरील चित्तचक्षुचमत्कारिक प्रवास आहे. गेली ५० वर्षे ते मनोरंजनाच्या दुनियेत अढळ स्थान पटकावून आहेत. टेलिव्हिजन आणि जाहिरातपटांच्या दुनियेत देखील त्यांची कर्तबगारी विलक्षण आहे. चित्रसृष्टीत व खासगी जीवनातील चढउतार ताकदीने पचवून वयाच्या ८० व्या वर्षातही ते ज्या उत्साहाने काम करीत आहेत, ते पाहून चाहते म्हणतात, या सम हा! अशा या महानायकाच्या सहस्त्रचंद्रदर्शनाच्या निमित्ताने त्यांचे अभिष्टचिंतन!

(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)